आपल्या सर्वांचे मार्गदर्शक भीमराव गारे ग्रामविकासाला पोरकं करून गेले. त्यामुळे यंदाची दिवाळी अपूर्ण होती. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पण, त्यांच्या स्मृतिविचारांना स्मरून नाशिकच्या ग्रामविकासाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आदिवासी भगिनींसोबत भाऊबीज साजरी करून त्यांनी सुरू केलेली परंपरा अबाधित ठेवण्याचा निर्धार केला. त्यांच्या विचारकार्याचा वारसा कायम ठेवला. त्या हदयस्पर्शी भाऊबीज कार्यक्रमा विषयी...
गेल्या २३ वर्षांपासून भीमराव गारे काका यांनी सुरू ठेवलेला हा वारसा पुढे नेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी दुःख बाजूला ठेवून एकत्र येण्याचे ठरविले. दि. २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीजेच्या दिवशी ५३ बंधू-भगिनींनी सकाळी बंधारपाडा ता. सुरगाणा येथे वनवासी भगिनींबरोबर भाऊबीज साजरी करण्यासाठी निघालो. अलभ्य लाभ म्हणजे आमच्याबरोबर ‘वनवासी कल्याण आश्रम’चे अखिल भारतीय कार्यकर्ते गिरीश कुबेर व पश्चिम महाराष्ट्र प्रचार मंडळ सदस्य दिलीप क्षीरसागर हे दोघे मान्यवर होते. ‘तू चाल पुढं’ असं म्हणायला गारे यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती प्रेरणादायी होती. जयश्री गारे, प्राची गारे, प्राजक्ता गारे या उपस्थित होत्या. दुपारी आम्ही बंधारपाड्याला पोहोचलो. स्वागतासाठी गावात सर्वत्र ‘संस्कार भारती’च्या रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच गावाच्या वेशीजवळ सर्व गावकरी बंधू-भगिनी जमले होते.
स्वागतासाठी ‘शेवंती’ हा पारंपरिक वनवासी स्वागत प्रकार पाहायला मिळाला. महिलांनी औक्षणाचे ताट घेऊन, फटाके वाजवून आम्हा सर्वांचे स्वागत कार्यक्रमस्थळी केले. बंधारपाडा गावासाठी ‘सुंदर माझे घर’ ही स्पर्धा आयोजित केली होती. ‘सुंदर माझे घर’ या संकल्पनेत सर्व ७० घरांचे निरीक्षण करायचे होते. या स्पर्धेसाठी चार निकषांवर ६० पैकी गुण देऊन प्रथम तीन क्रमांक काढायचे होते. प्रत्येक निकषाला १५ गुण होते, स्पर्धेचे निकष १) परिसर, २) स्वच्छता, ३) आरोग्य, ४) धार्मिकता परिक्षणासाठी आम्हा कार्यकर्त्यांचे चार गट केले गेले. प्रत्येक गटाला दोन गटप्रमुख व प्रत्येक गटात सात ते आठ कार्यकर्ते परीक्षणासाठी गेले होते. प्रत्येक गटाला साधारणतः १७ ते २० घरे परीक्षणांसाठी होती. तसेच घर दाखविण्यासाठी प्रत्येक गटात गावातील दोन-दोन कार्यकर्ते होते. स्पर्धेच्या निमित्ताने प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन बांधले गेले होते. कारण गावकर्यांना स्पर्धेची कल्पना महिनाभर आधी दिली गेली होती.
‘सुंदर माझे घर’ ही स्पर्धा दुपारी १२.३० ते २ या वेळेत पार पाडली. प्रत्येक घरात गेल्यानंतर घरासमोर भव्य रांगोळी व तुळशी वृंदावन हे दृष्टीस पडत होते. प्रत्येक घर हे अत्यंत नीटनेटके, स्वच्छता, टापटीप, सारवलेले व कोठेही पसारा नाही, असे दिसून आले. प्रत्येकाचे स्वयंपाक घर हे घराच्या शेवटी आहे व स्वयंपाक घरात जाण्यासाठी मधल्या घरातून एक पायरी खाली उतरून जावे लागते. यामागचे कारण म्हणजे अनेक घरांत चुलीवर स्वयंपाक केला जातो व चुलीचा धूर मागच्या अंगणातून बाहेर जाऊ शकेल, म्हणून अशी रचना आहे. चार निकषांच्या आधारावर घरांचे परीक्षण केल्यावर घरातील माता-भगिनींना साडीचोळी व फराळाचे पाकीट दिले गेले व त्यांच्याबरोबर फोटो काढले गेले व घरांचे निरीक्षण झाल्यावर माता-भगिनींना कार्यक्रमस्थळी भाऊबीजेचे औक्षण करणेसाठी निमंत्रित केले गेले, ही स्पर्धा साधारण २ वाजेपर्यंत संपन्न झाली.
२ ते २.३० वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी सामुदायिक भाऊबीज वनवासी भगिनींबरोबर झाली. गावातील सर्व माता-भगिनींनी आम्हा ३० बंधूंना ओवाळले व आमच्याबरोबर असणार्या २५ माता-भगिनींनी गावातील ७० ते ८० उपस्थित बंधूंना ओवाळले, असा भावस्पर्शी हा भाऊबीज कार्यक्रम झाला.दुपारी ४ ते ६ असा मुख्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी सर्व बंधारपाडा ग्रामस्थ व आजूबाजूच्या पाड्यांचे ग्रामस्थ आले होते. साधारणतः उपस्थिती ६०० ते ७०० होती. सुरुवातीला मान्यवर गिरीश कुबेर व दिलीप क्षीरसागर यांचे स्वागत व परिचय करण्यात आला. तसेच उपस्थित असणारे मान्यवर प्रभु पाठक, भिंतघर गोशाळेचे प्रमुख, कुबेर पोपटी, दिनेश राजगिरे, महानुभवपंथीय घनश्याम या सर्वांचे स्वागत केले गेले.त्यानंतर एक तासभर मंत्रमुग्ध करणारा वनवासी चालीरिती सांगणारा वनवासी गीते असणारा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. एकूण १२ प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
१) सर्वप्रथम वीर बजरंगबलीचे रुप धारण करून आलेल्या युवकाने ‘अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला जय जय हनुमान’ या गीतावर नृत्य केले. २) उमरेमाळ या पाड्यावरील सहा कलाकारांनी तीन मुले व तीन मुली यांनी आदिवासींची परंपरा दर्शविणारे अप्रतिम असे नृत्य सादर केले. ३) बंधारपाडा गावातील कलाकार यांनी वसुबारसचे गाणे आदिवासी परंपरेनुसार सादर करून नृत्य केले. ४) बंधारपाडा गावातील सहा छोट्या बालकांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे शौर्यगीत सादर केले. ५) बंधारपाडा गावातील वेदीदळवी गृपने बंधारपाडा गावाचे वर्णन असणारे गीत चार भगिनींनी सादर केले. ६) शेतकरी ग्रुप चिंचपाडा यातील सहाजणांच्या समूहाने तीन मुले व तीन मुली यांनी शेतकरी गीत सादर करून त्यावर नृत्य केले. ७) चावडीचा पाडा या पाड्यावरील चार मुलांनी म्युझिकवर पावरी आदिवासी नृत्य सादर केले. ८) भूमिका ग्रुप माळेगाव येथील दोन मुलींनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केले. ९) जगदिश ग्रुप भिंतघर येथील आठजणांनी ढोलनृत्य सादर केले. चार मुले व चार मुली, दोन ढोलवादक व तीन गायक असा समूह होता. १०) लावरे ग्रुप चावडीचा पाडा यांनी वनवासी नृत्य सादर केले. यात पाच लहान मुले होती. ११) बंधारपाडा येथील आठ महिलांनी सप्तश्रृंगीदेवीचे गीत सादर केले. १२) जनकल्याण गोशाळा भिंतघर यांनी समूहाने अप्रतिम गीत सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ‘वनवासी कल्याण आश्रम’चे पूर्णवेळ कार्यकर्ते गिरीश कुबेर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात गिरीश म्हणाले, "आताच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आपण आपल्या संस्कृती, परंपरा यांचे प्रकटीकरण केले. वनवासी भागात येणे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या घरी येणे. आपणास असे लक्षात येत असेल की, वनवासी भागातील मुले कधीही आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवत नाहीत, हे आपण अनुभवतो. वनवासी समाजाने धर्म, संस्कृती, परंपरा जपलेली आहे. ‘तू मैं एक रक्त’ हे ‘वनवासी कल्याण आश्रम’चे बोधवाक्य आहे. देशात १२ कोटी जनजाती समाज आहे. परंतु, सर्वांची वनवासी परंपरा, संस्कृती वेगळी नाही. समरसतेचे काम हे सर्व समाजाला जोडणारे काम आहे. नगरवासी व वनवासी यांचा संपर्क सातत्याने कायम राहील, हा विचार आपण केला पाहिजे. आपण एकमेकांना समजून घेऊन या देशाला परमवैभवाला आणायचे आहे.
या मोलाच्या मार्गदर्शनानंतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला. आभारप्रदर्शन व सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. गेल्या २३ वर्षांपासून वनवासी पाड्यावर वनवासी बंधू-भगिनींबरोबर भाऊबीज साजरी करणे व एका पाड्यावर लागोपाठ तीन वर्षे भाऊबीज साजरी करण्यासाठी जाणे हा पायंडा भीमराव गारे यांनी पाडला आहे. बंधारपाड्याचे हे प्रथम वर्ष होते. अशा दिवसभराच्या भारावलेल्या वातावरणातून सायंकाळी ६ वाजता आम्ही सर्व नाशिककडे निघालो ते पुढील भाऊबीजेपर्यंत बंधारपाड्यातील भाऊबीजेच्या आठवणी वर्षभर मनात रेंगाळत ठेवण्यासाठी. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल कान्नव, योगिनी चंद्रात्रे, स्मिता जोशी, उल्का क्षिरसागर, योगीता अमृतकर, सुनिता नरगुंद, अशोकराव गवळी, मधुकर पाटील या सर्वांनी परिश्रम घेतले.
- प्रमोद मुळे
(लेखक मालेगाव जिल्हा सेवाप्रमुख आहेत.)