पराभवाच्या भयातून अरण्यरुदन!

29 Oct 2025 09:50:20

Uddhav Thackeray
 
पराभव डोळ्यांसमोर दिसू लागताच, माणसाची बोबडी तरी वळते किंवा तो सैरभैर होऊन अद्वातद्वा बरळत सुटतो. सध्या उद्धव ठाकरेंची अवस्थाही तशीच! पालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडण्यापूर्वीच निराशेने ग्रासलेल्या ठाकरे पितापुत्राने अवसान गाळलेले दिसते. त्यातूनच पित्याच्या तोंडी नेहमीप्रमाणे अभद्र, असबद्ध, असंसदीय राजकीय टीपण्ण्यांची भाषा आणि मुंबईच्या युवराजांना तर ‘महाराष्ट्राचा पप्पू’ होण्याची स्वप्ने दिवसाढवळ्या पडताना दिसतात. एकूणच काय तर निवडणुकांपूर्वीच पराभवाच्या भयातून ठाकरे पितापुत्रांचे हे अरण्यरुदन...
 
जिवंत असताना मनमानीपणे वागणार्‍या माणसाला मृत्यू समोर दिसू लागला की सारे आदर्श आणि नीतिमत्ता आठवते. जसे अधर्माने वागणार्‍या कर्णाला मृत्यू समोर दिसताच धर्म आठवला. राजकारणातही तेच आहे. निवडणुकीत पराभव होणार हे स्पष्ट दिसू लागताच पराभूत उमेदवार आणि पक्ष त्यासाठी आधीच पार्श्वभूमी तयार करतात. तसेच आपल्या जेत्याबद्दल बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप करू लागतात. मुंबई महानगरपालिका निवडणुका लवकरच होणार असून, तेथील आपली सत्ता उखडली जाणार असल्याची जाणीव उबाठा सेनेला दिवसागणिक तीव्रतेने होताना दिसते. गेली ३० वर्षे या महापालिकेत सत्ता असतानाही मुंबईकरांचे भले करणारे कोणतेच निर्णय आणि काम आपल्या नावावर नाही, परिणामी आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेतील आपली सत्ता संपुष्टात येणार असल्याची जाणीव उबाठा सेनेला झाली आहे. या आगामी पराभवासाठी सबबी तयार करण्याचे काम या पक्षाच्या नेत्यांनी सुरू केले आहे. उद्धव ठाकरे व त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी सोमवारी दोन सार्वजनिक कार्यक्रमांमधून आपल्या पराभवाची पार्श्वभूमी तयार करण्यास सुरुवात केली आहे.
 
उद्धव ठाकरे यांनी कथित निर्धार मेळाव्यात आपल्याच पाठीराख्यांपुढे आपल्या बेटकुळ्या फुगविल्या. त्यांच्या भाषणात मुद्दे नव्हते, तर शाब्दिक गुद्दे होते आणि तेही अर्थात नेहमीप्रमाणे दिशाहीन! म्हणजे ‘ईव्हीएम’, ‘व्हीव्हीपॅट’, निवडणूक आयोग हे सर्व ‘फ्रॉड’ आहे, भविष्यात लोकसभेची निवडणूक जिंकल्यास निवडणूक आयोगावर खटला भरू, मतदारयादीत हजारो बोगस मतदार, त्यांची नावे न काढल्यास निवडणूक होऊ देणार नाही, मुंबईवर दोन व्यापार्‍यांचा डोळा वगैरे वगैरे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणांमध्ये पूर्वीही ना सुसंगती होती ना ठोस मुद्दे, ना पुरावे. पण, राहुल गांधी यांच्या संगतीमुळे त्यांच्या या बेलगाम वक्तव्याला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. आपल्या शिवसैनिकांनी बोगस मतदाराला थोबडावे, असे त्यांनी म्हटले. बोगस मतदाराच्या कपाळावर ‘बोगस मतदार’ अशी अक्षरे लिहिलेली असतात का? कारण कोण बोगस आहे, हे बाहेरून कसे समजणार? पण, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी ज्या शब्दांत टीका केली, त्यावरून त्यांनी आपल्या कुटिल आणि खुनशी मनोवृत्तीचेच प्रदर्शन केले.
 
पूर्वी त्यांनी अमित शाह यांना ‘अब्दाली’, ‘औरंगजेबाच्या फौजा’ वगैरे विशेषणे बहाल केलीच होती. कालच्या सभेत मात्र त्यांनी शाह यांना ‘अ‍ॅनाकोंडा’ या विशाल अजगराची उपमा दिली. हा अ‍ॅनाकोंडा मुंबईला गिळायला आला आहे, असे ते म्हणाले. आजवर गुजरातच्या औद्योगिक प्रगतीवर मत्सरग्रस्त मानसिकतेतून उद्धव ठाकरेंनी टीका केली होतीच. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढण्याच्या औषधाची एसपायरी तारीख उलटून गेल्यामुळे आता मुंबई ही गुजराती व्यापार्‍यांना आंदण देण्याचा नवा डोस त्यांनी तयार केला आहे. पण, कुडमुड्या ज्योतिषाचे भविष्य जसे चुकते, तसेच बोगस वैदूच्या औषधाचाही कसलाच परिणाम होत नसतो. उद्धव यांच्या या आरोपांचा मुंबईकरांवर कसलाही परिणाम होणार नाही, हे दिसते.
 
मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी मानून या शहरातून कोट्यवधी रुपयांची कमाई उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने केली होती. त्या बदल्यात त्यांनी ना शहराचे ना मुंबईकराचे जीवनमान उंचावण्यासाठी काही प्रयत्न केले. उलट मुंबईचा विकास कुंठित केला. मुंबईसारख्या महानगरातील रस्ते हे दरवर्षी कसे उखडतात? शहराच्या ठराविक भागांत दरवर्षी कसे पाणी साठते? मुंबईकरांना पिण्याच्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी कोणत्याच नव्या योजना का आखल्या गेल्या नाहीत? डिसॅलिनेशन प्रकल्प हे इतकी दशके केवळ कागदावरच का राहिले? यांसारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे उबाठाकडे नाहीत. साप हा नेहमी संपत्तीवर वेटोळे घालून बसलेला असतो, अशी एक समजूत. मुंबईला आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी लुटणारे उद्धव ठाकरे हेच या शहराला वेटोळे घालून बसलेले अजगर आहेत, हे त्यांच्या अडीच वर्षांच्या राजवटीत दिसून आले. उलट, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्या काळात बंद पाडण्यात आलेला मुंबई आणि राज्याचा विकासगाडा पुन्हा कार्यान्वित केला.
 
त्यांचेच पुत्र आदित्य हेही राहुल गांधी यांच्या बिनडोक वक्तव्यांशी स्पर्धा करण्यात मागे राहिले नाहीत. राहुल गांधी यांच्याप्रमाणेच त्यांनी आता राज्यात हजारो बोगस मतदार असल्याची आवई उठविली आहे. त्याचे बोटभरही पुरावे ते देऊ शकले नाहीत, ते अपेक्षितच होते. आदित्य ठाकरे ज्या वरळी विधानसभा मतदारसंघातून गतवर्षी निवडून आले, त्या मतदारसंघात सुमारे २० हजार बोगस मतदार असल्याचा दावा त्यांनी केला. पण, या मतदारांची ही नावे आणि त्यांचा तपशील गतवर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतीलच होता. ही काही सुधारित यादी नव्हे. याचा अर्थ आदित्य ठाकरे हे याच बोगस मतदारांच्या मतांवर गतवर्षी निवडून आले, असा काढता येतो. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी खरे तर आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा. पण, ‘महाराष्ट्राचा पप्पू’ होण्याचा चंग त्यांनी बांधला असल्याने त्यांच्याकडून ही अपेक्षा करणेच चुकीचे ठरेल.
 
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील मोगलाईचा अनुभव मुंबईकरांसाठी ताजाच आहे. गोरेगाव ते कफ परेडपर्यंत धावणारी भूमिगत रेल्वे ही उद्धव यांच्या अजगरी कारभाराचे शब्दश: धावते उदाहरण आहे. आज लाखो मुंबईकर प्रवासी या मेट्रोचा आनंद घेत प्रवास करीत आहेत. त्यामुळे मुंबईतील प्रदूषण आणि रस्त्यावरील मोटारींच्या गर्दीत थोडाफार का होईना, फरक पडला आहे. पण, उद्धव ठाकरे यांनी याच सोयीच्या आणि सुखकारक प्रवासापासून आपल्याला तब्बल तीन वर्षे वंचित ठेवले, ही भावना मुंबईकरांच्या मनात या मेट्रोतून जाताना सतत तेवत असते. कोस्टल रोड आणि भूमिगत मेट्रो या दोन प्रकल्पांमुळेच मुंबई महापालिकेतील उबाठाची सत्ता उखडली जाणार आहे. त्याची जाणीव झाल्यामुळे उद्धव यांनी आतापासूनच या भावी पराभवाची सारवासारव करण्यास प्रारंभ केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0