एसटीला दिवाळी हंगामात ३०१ कोटी रुपये उत्पन्न

29 Oct 2025 15:07:16

ST 
 
मुंबई : ( ST ) यंदाच्या दिवाळी हंगामात एसटीला तब्बल ३०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे. त्या खालोखाल धुळे व नाशिक या विभागाचा क्रमांक लागतो. चांगले उत्पन्न आणल्याबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
 
यावर्षी १८ आक्टोबर ते २७ ऑक्टोबर या दिवाळीच्या १० दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी ३० कोटी याप्रमाणे तब्बल ३०१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे दिवाळी सुटीच्या परतीच्या दिवशी २७ ऑक्टोबरला ३९ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न मिळवुन या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे. एसटीच्या ३१ विभागात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने आणले असून (₹२० कोटी ४७ लाख) त्यानंतर धुळे (₹१५कोटी ६० लाख) आणि नाशिक (₹१५ कोटी ४१ लाख ) विभागाचा क्रमांक लागतो. मागील वर्षीच्या दिवाळी हंगामाच्या पेक्षा यंदा महामंडळाने तब्बल ३७ कोटी रुपये उत्पन्न जास्त आणले आहे.
 
हेही वाचा : ऐतिहासिक क्षण! राफेलमधून उड्डाण करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या द्रौपदी मुर्मू
 
अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थिती यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महामंडळाला सुमारे १५० कोटी पेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला. परंतु ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा हंगाम व सुट्ट्यांच्या कालावधीमुळे उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे प्रतिदिन ३४ कोटी रुपये याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात १०४९ कोटी रुपयाचे उत्पन्न मिळविण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले होते. तथापि, ऐन दिवाळीच्या काही मोजके दिवस सोडता दैनंदिन लक्ष गाठण्यात महामंडळाला शक्य झाले नाही. पुणे, बीड, अहिल्यानगर, अमरावती, बुलढाणा या विभागांनी मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीमध्ये चांगले उत्पन्न आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, धाराशिव यासारख्या विभागांनी मात्र अत्यंत सुमार कामगिरी केल्यामुळे महामंडळाच्या एकूण उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते.
 
 
Powered By Sangraha 9.0