मुंबई : (President Droupadi Murmu) देशाच्या तिन्ही सेनादलांच्या प्रमुख असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, (दि. २९ ऑक्टो.) पहिल्यांदाच हरियाणामधील अंबाला हवाई दलाच्या तळावरून राफेल या अत्याधुनिक लढाऊ विमानातून ऐतिहासिक उड्डाण केले. हा राष्ट्रपती म्हणून त्यांचा पहिलाच अनुभव होता. याकरिता त्यांनी विशेष फायटर पायलटचा सूट परिधान केला होता. राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंबाला हवाई दलाच्या तळावर पोहोचल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपतींनी जिप्सीमधून परेडचे निरीक्षण केले. त्यांनी सैनिकांची भेट घेतली आणि हवाई दलाच्या विविध तुकड्यांचे निरीक्षण केले. ग्रुप कॅप्टन अमित गेहानी हे राष्ट्रपतींना घेऊन जाणाऱ्या विमानाचे पायलट आहेत. सुमारे २० मिनिटे त्या विमानात होत्या.
तथापि, लढाऊ विमानांतून उड्डाण करण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रवास नव्हता. ८ एप्रिल २०२३ रोजी, मुर्मू आसाममधील तेजपूर हवाई दलाच्या तळावर सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रपती आणि राज्याच्या दुसऱ्या महिला प्रमुख बनल्या. देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील यांनी अनुक्रमे ८ जून २००६ आणि २५ नोव्हेंबर २००९ रोजी लोहेगाव येथील हवाई दलाच्या तळावरुन सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानातून उड्डाण केले होते.