स्वयंरोजगाराच्या यशोगाथांच्या माळेमध्ये आपले पुष्प ओवत, व्यवसायाच्या कल्पनेला मूर्त स्वरुप देऊन यशस्वी झालेल्या मेघा जितेंद्र पाटील यांच्याविषयी...
आज स्वयंरोजगाराचे महत्त्व वाढत आहे. तसे पाहायला गेल्यास ‘स्वयंरोजगार’ ही संकल्पना भारतीयांसाठी नवी नाही. परचक्राचा फेरा येण्याआधी भारताच्या प्रत्येक घरामध्ये स्वयंरोजगार सुरू होतेच. यांच्या बळावरच भारताच्या घराघरांतून सोन्याचा धूर निघण्याइतपत समृद्धी आली होती. मात्र, आक्रांतांच्या अनाचाराने आणि ब्रिटिशांच्या जुलमाने भारतीय समृद्धीच्या कण्यालाच पंगुत्व दिले. त्याची परिणीती म्हणजे, पुढील काळात भारताचे आर्थिक मागासलेपण! पण, आज भारत पुन्हा एकदा कात टाकून नव्या जोमाने उभा आहे. आज पुन्हा एकदा स्वयंरोजगाराचे वारे भारताच्या शहरी भागापासून, ग्रामीण भागापर्यंत जोमाने वाहत आहेत. आज देशातील प्रत्येक घरामध्ये किमान लहान प्रमाणात का असेना, स्वतःचा एकतरी व्यवसाय असावा, अशी विचारधारा रुजताना दिसते.अनेकांनी यामध्ये सक्रिय योगदान दिले आहे. या योगदानामध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक दिसते. असेच स्वयंरोजगाराच्या मदतीने स्वतःबरोबर अन्य काही महिलांच्या हाताला रोजगार देणार्या मेघा जितेंद्र पाटील यांची ही गोष्ट!
मेघा यांचा जन्म पेणमधील कासू पाटणे या गावचा. आईवडील, दोन बहिणी आणि एक भाऊ असे मेघा यांचे कुटुंब. वडील मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये कारपेंटर म्हणून काम करत असल्याने, मेघा यांच्या बालपणातील आठवणी या मुंबई आणि कासू पाटणे अशा दोन्ही ठिकाणच्या आहेत. असे असले तरीही, मेघा यांचे शिक्षण पूर्णपणे कासू पाटणे या गावातच झाले. मेघा यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. कमावणारे हात दोन आणि खाणारे आठ अशी अवस्था. अशा परिस्थितीमध्येही गृहिणी असलेल्या मेघा यांच्या आईने त्यांचा संसार सुखाचा करण्यसाठी एक बाजू समर्थपणे सांभाळली. मेघा यांना शालेय शिक्षणाबरोबर कालसुसंगत असे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासही आईवडिलांनी कायमच प्रोत्साहन दिले.
मात्र, याच काळात वडिलांची नोकरी गेली. त्यामुळे मेघा यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली. त्यावेळी जबाबदार्यांचे भान बाळगून, त्यांच्या वडिलांनी रेल्वेमध्ये वस्तू विकण्यास सुरुवात केली. याकाळात आईवडिलांचा विश्वास सार्थ ठरवत मेघा यांनी त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कला शाखेतून ‘अर्थशास्त्र’ विषयामध्ये पदवी संपादन केली आहे. त्यानंतर घरची जबाबदारी सांभाळावी, या विचाराने त्यांनी अर्थार्जनाला प्राथमिकता दिली. सुरुवातीला मुंबई आणि नंतर पेणमध्ये नोकरी करत घराचा आर्थिक डोलारा सावरण्यास हातभार लावला. या काळात स्वतःचा काही व्यवसाय असावा, असे मेघा यांना कायम वाटे. मात्र, परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य झाले नाही.
दरम्यानच्या काळात २००९ मध्ये मेघा यांचा विवाह पेणमधील उंबर्डे गावातील जितेंद्र पाटील यांच्याशी झाला. सासरची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने मेघा थोड्या सुखावल्या. मेघा यांची नोकरी सुरूच होती. मेघा यांच्या यजमानांचा व्यवसायही होताच,तरीही मेघा यांच्या मनातील स्वतःच्या उद्योगाचा विचार काही केल्या जात नसे. त्यामुळे त्यांनी काहीतरी करून पाहावे, या विचाराने घरातच त्यांनी हाती पापड तयार करून पाहिले. त्यावेळी मेघा यांना पापड उत्तम करता आले. त्यामुळे मेघा यांनी पापडनिर्मितीचे कौशल्य अधिक आत्मसात केले. पापडनिर्मिती व्यवसायातच उतरण्याचे स्वप्न मेघा पाहू लागल्या होत्या. त्यासाठी त्यांनी विविध स्तरांवरून माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना बचतगटाची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी स्वतःचा बचतगट स्थापन करून पापडनिर्मिती उद्योगाला सुरुवात केली. यावेळी बचतगटातील महिलांनाही त्यामुळे आर्थिक आधार मिळू लागला होता. दरम्यानच्या काळामध्ये शारीरिक समस्यांमुळे मेघा यांच्या यजमानांना त्यांचा व्यवसाय बंद करावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा घराचा डोलारा सांभळण्याची जबाबदारी मेघा यांच्यावरच आली.
त्यावेळी बचतगटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन उद्योग विस्तारण्याचे धोरणी पाऊल मेघा यांनी उचलले. या कर्जाच्या माध्यमातून पापडनिर्मितीला आवश्यक असलेली यंत्रे विकत घेतल्याने मेघा यांच्या उत्पादनामध्ये वाढ झाली. मेघा यांनी पापडांचा दर्जा उत्तम राखण्याकडे लक्ष दिल्याने मागणी होतीच. महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ उपक्रमाची त्यांना व्यवसायवाढीसाठी मदत झाल्याचे मेघा सांगतात. आज जवळपास २५-३० जणांच्या हाताला मेघा यांच्या व्यवसायातून रोजगार मिळाला आहे. आज मेघा यांच्याकडे ४० प्रकारचे पापड मिळत असून, अलिबाग येथील गावठी पांढरे कांदे, कडधान्येही शेतकर्यांकडून घेत त्यांची विक्री करत आहेत. मेघा यांचे यजमानही त्यांच्या या व्यवसायामध्ये मदत करतात. "आम्ही दोघे मिळूनच हा व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहोत,” असे मेघा कौतुकाने सांगतात.
मेघा यांचा नम्रपणा आजच्या तरुणाईसाठी नक्कीच एक शिकवण आहे. मेघा यांचे सासू-सासरेही त्यांना पोत्साहन देत असतात. या सगळ्यांच्या पाठिंबा आणि सहकार्यामुळेच मेघा यांना वर्षाला १२ टनांपेक्षा अधिक पापडांची विक्री करणे शक्य झाले आहे. आज त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ६० लाखांच्या घरात आहे. नजीकच्या काही वर्षांतच एक कोटींच्या उलाढालीचे स्वप्न मेघा पाहात आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये अर्धनारीनटेश्वराची पूजा केली जाते. मेघा यांचा प्रवास हा त्या स्वरुपाचीच आठवण करून देतो. देशातील स्वयंरोजगाराच्या यशोगाथांच्या माळेमध्ये आपले पुष्प ओवणार्या मेघा पाटील यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
- कौस्तुभ वीरकर