हिंदूद्वेष्ट्यांची फडफड...

29 Oct 2025 12:39:09

Hindu
 
भारतीयांची गुणवत्ता अवघ्या जगाने मान्य केली आहे. म्हणूनच आज जगातील सर्व महत्त्वाच्या कंपन्यांना त्यांची कंपनी भारतीय व्यक्तीच्या नेतृत्वात यशस्वी वाटचाल करेल, असा पूर्ण विश्वास वाटतो. म्हणूनच अनेक कंपन्यांच्या मुख्य पदी भारतीय वंशाचे नेतृत्व विराजमान आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालानुसार, आजमितीला साडेतीन कोटींहून अधिक भारतीय परदेशात वास्तव्यास आहेत. त्या देशाचे नियम-कायदे पाळत, आपली भारतीय संस्कृती जोपासत तिथे राहतात. एकट्या अमेरिकेत ५४ लाख भारतीय. त्यामुळे साहजिकच तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय भावविश्वात भारतीयांचा म्हणजेच हिंदूंचा ठसा उमटलेला दिसतो. राष्ट्राध्यक्षांच्या ‘व्हाईट हाऊस’मध्ये दिवाळी आणि इतर हिंदू सणही साजरे होतात. संसदेत संस्कृतमध्ये भाषण होते. भारतीय पंतप्रधानांच्या दौर्‍यात लाखो भारतीय एकत्र येतात. एकंदरीतच काय, तर हिंदूंनी अमेरिकेच्या सर्वसमावेशकतेत महत्त्वाचे स्थान पटकावले आहे.
 
भारतात जसे भेदाभेद निर्माण करणार्‍या जातीय शक्ती कार्यरत आहेत, तशाच अमेरिकेतदेखील अराजकवादी धार्मिक आणि सामाजिक शक्ती आहेत. ज्या सुटाबुटात मोठमोठ्या विद्यापीठांत द्वेष निर्माण करण्याचे उद्योग करतात. आधी या ताकदींना म्हणावे तसे उत्तर मिळत नव्हते; परंतु आता तिथला हिंदू समाजदेखील त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी झगडू लागला आहे. अधिक सक्रियपणे या ताकदींना तो उत्तरे देऊ लागला आहे. त्यामुळेच या ‘हिंदूफोबिक’ ताकदी संपण्यापूर्वीची शेवटची फडफड म्हणून मंदिरांवर हल्ले, विद्यापीठांमध्ये हिंदूविरोधी कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांमध्ये हिंदूंद्वेषाची बीजे पेरले जात आहेत. CoHNA ( Coalition of Hindus of North America ) या संस्थेने नोंदवलेल्या अहवालानुसार, ऑगस्ट २०२४ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान अमेरिकेत सात मोठ्या मंदिरांवर हल्ले करण्यात आले. ज्यामध्ये हनुमान मंदिर, बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिर, श्री वेंकटेश्वर बालाजी मंदिरांसारखी प्रसिद्ध मंदिरे आहेत.
 
यावर स्वामीनारायण संस्थेच्या सार्वजनिक संबंध विभागाने, "आम्ही सर्वदूर एकत्र आहोत आणि धार्मिक द्वेषाविरुद्ध सक्षमपणे उभे आहोत,” हेदेखील ठणकावून सांगितले. ‘हिंदू अमेरिकन फाऊंडेशन’नेदेखील यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, या घटना स्पष्टपणे दाखवतात की, अमेरिकन हिंदूंना ‘हिंदुत्ववादी’ म्हणून अपमानित करण्याची प्रवृत्ती अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण हल्ल्यांना खतपाणी घालते. फक्त निषेध करण्यापेक्षा निवडून आलेल्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष कारवाई करून दोषींना जबाबदार धरले पाहिजे, एवढीच यावेळेस मागणी आहे. अशा हल्ल्यांना आता प्रत्युत्तर मिळायला लागल्यामुळे हिंदूफोबियाने ग्रासलेल्या मंडळींनी त्यांचा मोर्चा विद्यापीठांत वळवून विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष निर्माण करायला सुरुवात केली.
 
दि. २७ ऑटोबर रोजी रूटगर्स विद्यापीठाच्या कायदा विभाग आणि ‘सेंटर फॉर सियुरिटी’, ‘रेस अ‍ॅण्ड राईट्स’ या संस्थेने ' Hindutva in America: - Threat to Equality and Religious Pluralism' नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये Hindutva in America या अहवालाचे सुरुवातीला सादरीकरण करण्यात आले. या अहवालानुसार काही हिंदुत्ववादी संघटनांचे अमेरिकेतील आर्थिक व सामाजिक नेटवर्क वाढत असून, त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरील धार्मिक समता आणि बहुसांस्कृतिकतेवर होत आहे, असा आरोप करण्यात आला. या कार्यक्रमाविरोधात अमेरिकेतील चार काँग्रेस सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहून चिंतादेखील व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, हिंदू धर्म हा अनेक पंथांना सामावून घेणारा, बहुविधता आणि सहिष्णुतेचे प्रतीक असलेला धर्म आहे.
 
त्यामुळे विद्यापीठांनी शैक्षणिक स्वातंत्र्य राखतानाच समुदायांमध्ये द्वेष किंवा भीती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. ’अमेरिकन हिंदूझ अगेन्स्ट डिफेमेशन’ ( AHAD ) या संस्थेने ' Hindutva and the American Dream : - Case for inclusion and Representation' असा अहवाल तयार करून उत्तर दिल्याने हिंदूफोबिक लोकांना त्यांचा कार्यक्रम एका छोट्या सभागृहात घ्यावा लागला. पण, ‘शांतिप्रिय’ नाव घेऊन जगात विद्ध्वंस करत फिरणार्‍या धर्माविरुद्ध असे कार्यक्रम घेणारे बोलणार नाहीत. म्हणूनच हिंदू धर्मावर टीका आणि हल्ले करणे त्यांना सोपे वाटते, पण आता हिंदूदेखील जशास तसे उत्तर देऊ लागल्यामुळे ‘हिंदूफोबिया’ झालेल्यांची ही शेवटची फडफड!
 
Powered By Sangraha 9.0