शहापुर-सापगाव रस्त्यासाठी दिव्यांग भिक मागणार!

29 Oct 2025 17:21:24
Disabled people
 
शहापूर : ( Disabled people ) शहापुर-सापगाव मार्गावरील रस्त्याची अवस्था गेल्या आठ वर्षांपासून अत्यंत खराब आहे. खड्डे, धूळ, चिखल आणि अपघातांचा कायमचा सिलसिला सुरू आहे. नागरिकांनी, वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन आणि ठेकेदार या दोघांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पावसाळ्यात रस्ता पाण्यात बुडतो, उन्हाळ्यात धुळीनं व्यापतो, आणि वर्षभर नागरिकांच्या सहनशक्तीची परीक्षा घेतो. या निष्काळजीपणाविरोधात अखेर दिव्यांग बांधव मैदानात उतरले आहेत.
 
शहापुर-सापगाव रस्त्यावरील या दुर्दशेचा निषेध म्हणून एकलव्य दिव्यांग फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेने 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत “भिक मागा आंदोलन” आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनादरम्यान दिव्यांग बांधव प्रत्यक्ष भिक मागणार असून, जमलेली भिक एमएसआरडीसी (Maharashtra State Road Development Corporation) च्या अधिकाऱ्यांना अर्पण करणार आहेत. “रस्ता दुरुस्तीसाठी निधी नसेल, तर आम्ही आमच्या भिकेतील पैशांनी तुमची मदत करू!” — अशा तीव्र शब्दांत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर त्यांनी प्रहार केला आहे.
 
हेही वाचा : वातावरणीय बदलावरील तोडग्यासाठी मुंबईत ‘मुंबई क्लायमेट वीक’
 
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. निलीन पांडुरंग पडवळ यांनी ठाणे जिल्हाधिकारी, शहापुर तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला या आंदोलनाबाबत अधिकृत कळवणी केली आहे. त्यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या आठ वर्षांपासून शहापुर-सापगाव रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून, नाल्याजवळील भागात तर दरवर्षी पावसाळ्यात वाहतूक ठप्प होते. अनेक वेळा प्रशासनाला लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून, विशेषतः दिव्यांग नागरिकांना प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
 
डॉ. पडवळ यांनी म्हटले आहे की, “पाच वर्षांत सातशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग बांधणारी एमएसआरडीसी, शहापुर-सापगाव रस्त्याचे दोन पॅच मारायला लुत लागली आहे. हा रस्ता दुरुस्त करण्याइतकी प्रशासनाची इच्छाशक्तीच संपली आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
 
 हे वाचलत का ? - शाळांत संपूर्ण वंदे मातरम् गायन निर्णयाचे राम नाईक यांच्याकडून स्वागत
 
रस्त्यावरील खड्डे इतके खोल झाले आहेत की, अपघातांची संख्या वाढली आहे. वाहनांचे टायर फुटणे, लोकांना इजा होणे, आणि दिव्यांगांसाठी प्रवास तर अशक्यच — हे वास्तव आता दैनंदिन झाले आहे. शहापुरच्या जनतेची निष्क्रियता आणि प्रशासनाची भावनाशून्यता यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. नागरिक वैतागले आहेत, पण आठ वर्षांपासून कोणीही रस्त्यावर उतरलो नाही, त्यामुळे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे फावले आहे.
 
डॉ. पडवळ यांनी प्रशासनाला अंतिम इशारा देत म्हटले आहे की, “जर रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू झाले नाही, तर दिव्यांग नागरिकांचा हा शांततेचा रस्ता आता क्रांतीचा मार्ग बनेल. आम्ही रस्ता दुरुस्त करणार नाही, पण तुमची झोप मात्र निश्चित उडवू.” आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यात येईल, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.
 
शहापुर-सापगाव रस्ता आज केवळ खड्ड्यांनी व्यापलेला नाही, तर तो प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं प्रतीक बनला आहे. ३० ऑक्टोबरला दिव्यांगांच्या हातातली भिक हे केवळ नाणे नसेल — तर ती या बेफिकीर यंत्रणेच्या चेहऱ्यावरचा एक जोरदार थापड ठरेल.
  
Powered By Sangraha 9.0