कथा संघर्षाची, जिद्दीची...

29 Oct 2025 12:21:08
Artist
 
अकाली मळभ दाटून यावं, तसं अचानक काळवंडलेल्या आयुष्यरूपी कॅनव्हासवर आशेचा रंगमयी कुंचला फिरवून एका मनस्वी कलावंताच्या पुन्हा नव्या उमेदीने घेतलेल्या एका विजिगीषु भरारीची अन् कलेच्या पुन्हा लाभलेल्या परीसस्पर्शाची ही एक विलक्षण कहाणी.
 
मनाच्या आकाशात आठवणींच्या पक्षांनी उंच भरारी घेतली अन् एकेक सोनेरी क्षण डोळ्यांसमोर जिवंत होत गेला. टाऊनशिपच्याआधी नाशिकला रविवार कारंजाजवळ मेन रोडला (घणकर गल्लीत) चांदवडकरांच्या वाड्यात तळमजल्यावर आमचं भाड्याचं घर होतं. त्या एवढ्याशा घरात आमचं पंचकोनी कुटुंब व इतरही काही नातलग मंडळी वास्तव्याला होते. आईवडिलांना आम्ही आक्का-दादा का म्हणायला लागलो, त्याचीही एक कहाणी होती. आमच्याबरोबर आईचा लहान भाऊ, वडिलांची धाकटी बहीण व इतरही काही आप्तमंडळी अधूनमधून वास्तव्याला होते.
 
त्यांचे आक्का-दादा म्हणजे आमचे आईबाबा मग आमच्यासाठीही आक्का-दादाच झाले. संजय घरातलं पहिलं अपत्य. सगळ्यांच्याच गळ्यातला ताईत. घरात एवढा माणसांचा गोतावळा. खूप लाड झाले त्याचे. नाशिकच्या अस्सल दुधाच्या पेढ्यांचा खाऊ तर ठरलेलाच असायचा. चांदवडकरांच्या वाड्याच्या मालकीणबाई गंगाबाई चांदवडकर. आजूबाजूला सर्वजण संजूलाच गंगाबाईचा नातू म्हणून ओळखायचे व लाड करायचे. घरातल्या अनेक नातेवाईकांच्या व आजूबाजूच्या माणसांच्या, शेजार्‍यांच्या गराड्यात मोठं झालेलं हे बालपण पुढेही आयुष्यभर माणसांच्या गराड्यात व मित्रमंडळींच्या सहवासातच रमलं.
 
माझ्या आईला भरतकाम, विणकाम, शिवणकाम, रांगोळ्या काढणं इ.ची खूप आवड होती. कलेची ती आवड सर्वच भावंडात आली असावी. लहानपणापासूनच कागदांवरच्या चित्रात रंग भरताना संजयने नंतर फोटोग्राफी, खेळ व इतरही अनेक आवडी जोपासल्या. कॉलनीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, त्याच्याच पुढाकाराने पहिल्यांदा आमच्या क्वार्टरच्या जिन्यात गणपती बसवूनच झाली. आधीपासूनच त्याचा मित्रपरिवार तसा खूप मोठा. आजूबाजूला मित्रांची भलीमोठी गँग आणि माणसांचा घरात सततचा राबता हे तर ठरलेलंच. ओझर टाऊनशिपच आमचं घर म्हणजे आठवणींची मौल्यवान खाणच. माझ्या लग्नानंतर डोंबिवलीहून दिवाळी/मे महिन्यात टाऊनशिपला आलं की, बाकी कुठे कसाही माहोल असो, आमच्याकडे १८९० मध्ये मात्र नेहमीच लग्नाचा सिझन. कारण, संजय कलाशिक्षक असला, तरी त्याच्या फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग व लग्नाच्या ऑर्डर्स वर्षभर चालू असायच्या.
 
दिवाळी-मे महिना म्हणजे तर लग्नांचा खास सिझन. लग्नऋतूच. मुलांच्या दिवाळी-मे महिन्याच्या सुट्यांमध्ये संजू आम्हाला दिसायचा, तो कधी गळ्यात कॅमेरा अडकावून फोटो ऑर्डरसाठी लगबगीने बाईकवर जाणारा, कधी खांद्यावर व्हिडिओ कॅमेरा घेऊन व्हिडिओ शूटिंग करणारा संजू, तर कधी तासन्तास बसून मेहनतीने लग्नांचे अल्बम करणारा संजू. संजयने क्लिक केलेले जुने फोटो म्हणजे आठवणींची मौल्यवान खाणच. ९०-९५च्या त्या काळात घरचा फोटोग्राफर म्हणजे काही विचारायलाच नको. मज्जाच. त्याकाळी आतासारखे अद्ययावत मोबाईल नव्हते. आमच्या कुटुंबासाठीचा तो सुवर्णकाळ अन् त्या काळच्या त्या जुन्या आठवणी अशाच त्याच्या कॅमेर्‍यात अन् अल्बममध्येच बंदिस्त झाल्या. तेव्हा मुलं लहान होती अन् आम्ही घरातले लहान मोठे सर्वजण आनंदाने ते क्षण जगत उत्साहाने एकत्र येत होतो.
 
मुलांच्या अशा कितीतरी दिवाळी-मेच्या सुट्या आम्हा मोठ्यांसाठीही अविस्मरणीय झाल्या. त्याने आम्हाला दिलेली सुंदर, मौल्यवान भेट म्हणजे, माझे व आमच्या कुटुंबाचे काढलेले छान छान क्लिक्स. या अनेक फोटोंमागे माझ्या अनेक सुंदर आठवणी, ते प्रसंग, ते दिवस दडले आहेत. या फोटोंमधले काही जिवलग आता काळाच्या पडद्याआड गेले. पण आठवणींच्या रुपात मात्र या फोटोंमध्ये बंदिस्त झाले. पण हे जुने अल्बम कधी कपाटाबाहेर निघालेच, तर मात्र तो काळ. ती माणसं अन् ते प्रसंग डोळ्यांसमोर फेर धरतात. मनाच्या अंगणात आठवणींच्या सरी दाटून येतात अन् कळत-नकळत मधली सगळी वर्षे आपोआप पुसली जातात.
 
जे. जे. स्कूलमध्ये कलाशिक्षण व धुळ्याला A.T. केल्यानंतर ओझरच्या H.A.L. हायस्कूलमध्ये ३२ वर्षे चित्रकला शिक्षक असताना अनेक विद्यार्थ्यांना त्याने चित्रकलेचे धडे दिले. आज त्याचे अनेक विद्यार्थी या कलाक्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत आहेत. रोजची दिनचर्या व्यवस्थित पार पाडताना अचानक एक दिवस नियतीने रंग पालटले अन् दि. ७ ऑक्टोबर २०१३ला बाईकवर बाहेर जाऊन आल्यानंतर रात्री जेवत असतानाच त्याला अर्धांगवायूचा जबरदस्त झटका आला आणि सुरू झाली एक संघर्षकहाणी. क्षणार्धातच शरीराची उजवी बाजू संपूर्ण निकामी झाली. रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेतल्यानंतरही सुरवातीला काही महिने अंथरुणावर खिळलेलं आयुष्य, अ‍ॅलोपथी-आयुर्वेदिक उपचारानंतर आणि वडील, पत्नी, मुलं, भाऊ व इतर नातलग-मित्रपरिवार इत्यादींच्या खंबीर पाठिंब्याने वा सहकार्याने हळूहळू घरात काठीच्या आधाराने चालण्याइतपत मार्गी लागलं. पण, त्याचं कलावंत मन आणि चित्र काढण्याची उर्मी मात्र त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.
 
मनाच्या इच्छाशक्तीने, जिद्दीने परिस्थितीवर मात केली आणि काही महिन्यांच्या सरावानंतर त्याने डाव्या हाताने चित्र काढण्याची कला अवगत केली. ‘कोरोना’ काळातही जेव्हा संपूर्ण जगाची गती मंदावली होती, तेव्हा विद्यार्थ्यांना त्याने चित्रकलेत मार्गदर्शन केलं. या चार-पाच वर्षांत ३००च्यावर चित्रं काढली. या चित्रांचं प्रदर्शन भरवायचा त्याचा मानस आहे. शारीरिक मर्यादांमुळे त्याला स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली. पायाला भिंगरी असलेली त्याची पावलं आता जरी घरात स्थिरावली असली, तरी मनाची झेप, उभारी अन् भरारी मात्र अजूनही आकाशात, नजरेपल्याडच् कायम आहे. त्याने आता डाव्या हाताने कागदावर साकारलेली चित्रच या गोष्टीचे साक्षीदार आहेत. जिद्द, इच्छाशक्ती, अथक प्रयत्न अन् दुर्दम्य आशावादाची ही कहाणी. ही आशावादी कहाणी आहे एका चित्रकाराच्या माझ्या भावाच्या संजयच्या संघर्षाची, जिद्दीची!
 
 -संध्या सरदार
 
 
Powered By Sangraha 9.0