बिग बींचं ‘ते’ वक्तव्य आणि दिलजीत दोसांजला मिळाली खलिस्तान्यांकडून धमकी

    29-Oct-2025
Total Views |

मुंबई : प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चक्क खलिस्तानी दहशतवाद्यांकडून दिलजीतला धमकी मिळाली आहे. अमेरिकेतील खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या भारतविरोधी संघटनेने - सिख्स फॉर जस्टिस (SFJ) ने १ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा गायक दिलजीत दोसांझचा कार्यक्रम बंद पडण्याची धमकी दिली आहे. पण या धमकीचं कारणंही खूपच आगळं वेगळं आहे. आणि ते म्हणजे अभिनेते अमिताभ बच्चन यांचे दिलजीतने केलेलं चरणस्पर्श.

या धमकीत त्यांनी म्हंटले की, 'बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे चरण स्पर्श करून दिलजीतने १९८४ च्या शीख नरसंहारातील प्रत्येक पीडित, प्रत्येक विधवा आणि प्रत्येक अनाथाचा अपमान केला आहे.”

दरम्यान, गायक दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमावर बंदी घालणाऱ्या संघटनेने आरोप केला आहे की, बिग बी यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी 'खून के बदले खून' या नरसंहाराच्या घोषणेसह भारतीय जमावाला सार्वजनिकपणे भडकावले होते. या घोषणे संदर्भात असा दावा करण्यात आला होता की यामुळे लोक भडकले आणि भारतातील जवळपास ३०,००० शीख पुरुष, महिला आणि लहान मुलं मारली गेली. दहशतवादी पन्नूने निवेदनात म्हटले की, 'ज्यांच्या शब्दांनी नरसंहाराचा कट रचला होता, त्यांच्या पायांना स्पर्श करून गायक दिलजीत दोसांझने १९८४ च्या शीख नरसंहारातील प्रत्येक पीडित, प्रत्येक विधवा आणि प्रत्येक अनाथाचा अपमान केला आहे'. दिलजीत काही दिवसांपूर्वी केबीसीच्या मंचावर गेला होता. यावेळी त्याने आदर म्हणून अमिताभ बच्चन यांचे चरणस्पर्श केले होते. योगायोगाने, अकाल तख्त साहिबने १ नोव्हेंबर हा दिवस "शीख नरसंहार स्मृतिदिन" म्हणून घोषित केला आहे. या धमकीवर दिलजीतने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नक्की काय आहे सिख्स फॉर जस्टिस (SFJ) संघटना

या संघटनेवर भारताने बंदी घातलेली आहे. भारतविरोधी कारवाया केल्याप्रकरणी या संघटनेवर बंदी घातलेली आहे. SFJ ही बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) देशविरोधी कारवायांसाठी बंदी घातलेली संघटना आहे. गृह मंत्रालयाच्या मते, एसएफजे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि अखंडतेसाठी हानिकारक आहे. मंत्रालयाने यापूर्वी म्हटले होते की एसएफजे पंजाब आणि इतरत्र देशविरोधी आणि विध्वंसक कारवायांमध्ये सहभागी आहे आणि भारताच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला बाधा पोहोचवण्याचा त्यांचा हेतू आहे.

अमिताभ बच्चन यांच्यावर SFJ चा राग का आहे?

अमिताभ बच्चन यांनी त्यावेळी एक वक्तव्य केलं होतं असा दावा SFJ ने केला आहे. SFJ च्या दाव्यानुसार, अमिताभ बच्चन यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी 'खून के बदले खून' अशी घोषणा देऊन लोकांना भडकावले, ज्यामुळे शीख नरसंहार झाला आणि अंदाजे ३०,००० शीख मारले गेले. मात्र, हे दावे वादग्रस्त आहेत आणि अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी अशा आरोपांचं खंडन केलं आहे. १ नोव्हेंबर हा दिवस अकाल तख्त साहिबने "शीख नरसंहार स्मृतिदिन" म्हणून घोषित केलेला आहे. आणि याच कारणाने SFJने दिलजीतच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची धमकी दिली आहे.