मुंबई (विशेष प्रतिनिधी) - साताऱ्यातील महादरे संवर्धन राखीव क्षेत्रामधून संशोधकांनी वनस्पतींच्या ३९२ प्रजातींची नोंद केली आहे (mahadare conservation reserve). यामधील १२७ प्रजाती या 'आययूसीएन'च्या लाल यादीत समाविष्ट असून ७० प्रजाती या भारताला प्रदेशनिष्ठ आहेत (mahadare conservation reserve). 'महादरे संवर्धन राखीव' हे फुलपाखरांच्या संवर्धनासाठी संरक्षित केलेले भारतातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र असल्याने या अभ्यासाच्या माध्यमातून फुलपाखरांचे सुरवंट हे खाद्य वनस्पती म्हणून वापरत असलेल्या ७२ वनस्पतींची नोंद करण्यात आली आहे (mahadare conservation reserve).
साताऱ्यातील जिल्ह्यातील दरे खु. महादरे येथील राखीव वनक्षेत्राला २०२२ साली महादरे महादरे रिसर्च ऑर्गनायझेशन (मेरी) यांच्या प्रयत्नांमुळे फुलपाखरु संवर्धन राखीवचा दर्जा देण्यात आला. पश्चिम घाट आणि दख्खन पठाराचा पूर्वेकडील भाग यांना जोडणारा महादरेचा वनपट्टा आहे. यवतेश्वर घाटाच्या मध्यापासून भैरोबा टेकडीपर्यत १०७ हेक्टर क्षेत्रावर हा वनपट्टा पसरलेला आहे. पश्चिम घाटामध्ये फुलपाखरांच्या साधारण ३४७ प्रजाती आढळतात. त्यापैकी महादरेच्या जंगलात १८१ प्रजाती दिसतात. म्हणजेच पश्चिम घाटात आढळणाऱ्या एकूण फुलपाखरू प्रजातींपैकी निम्म्यापेक्षा जास्त प्रजाती या अत्यंत छोट्याशा वनपट्ट्यामध्ये आढळून येतात. यामधून वनस्पती व त्या आधारित असणाऱ्या इतर जैव अथवा कीटक समृद्धतेचे परस्पर सहचर सुस्पष्ट होते. त्यामुळे या भागाला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्यात आला. या क्षेत्रातील वनस्पतींची पहिलीच शास्त्रीय नोंद सुनील भोईटे (मेरी), श्वेता सुतार (मेरी), जयकुमार चव्हाण (यशवंतराव चव्हाण इन्स्टीट्यूट आॅफ सायन्स) आणि श्वेता देशपांडे (डी.पी.भोसले महाविद्यालय) यांनी केली आहे. या संबंधीची शोधनिबंध नुकताच “जर्नल ऑफ थ्रेटनेड टॅक्सा" या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला आहे.
संशोधकांनी महादरेमधून वनस्पतीच्या ३९२ प्रजातींची नोंद केली आहे. यामधील पांढरी मुसळी (Chlorophytum borivilianum) या प्रजातीची नोंद आययूसीएनच्या लाल यादीत नष्टप्राय (क्रिटिकली एंडेंजर्ड) श्रेणीमध्ये आहे. ही एक दुर्मिळ भारतीय औषधी वनस्पती असून आयुर्वेदिक औषधांमध्ये तिचे महत्त्व अधिक आहे. तसेच साग, गुलाबी भुईचक्र या संकटग्रस्त (एंडेंजर्ड) प्रजातींची देखील नोंद येथून करण्यात आली आहे. तसेच बडमूग किंवा खंडाळा जंगली वाटणा (विग्ना खंडालेन्सिस) अशा लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या शेंगांच्या जंगली प्रजाती देखील या क्षेत्रामधून नोंदविण्यात आल्या आहेत. या शेंगांचे पौष्टिक आणि जैविक गुणधर्म ओळखून त्याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
येथील वनस्पतींची विविधता ही अनोखी व वैविध्यपूर्ण असून येथे फुलपाखरांना त्यांच्या वाढीच्या अळी अवस्थेतील खाद्य वनस्पती तसेच प्रौढावस्थेतील पराग वनस्पतींची मुबलक उपलब्धता असल्यामुळेच या परिसरात फुलपाखरांची देखील जास्तीची प्रजाती संख्या आढळून येत असल्याचे या अभ्यासामुळे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे एकूणच येथील फुलपाखरू विविधता जपण्यासाठी भविष्यकाळात या जंगलाचे महत्व अनन्यसाधारण ठरते. - सुनिल भोईटे मुख्य संशोधक, मेरी, सातारा.