धारणीय वेग - भय ( भाग ५ )

28 Oct 2025 11:59:05

Fear
 
धारणीय वेगांमधील पुढील मानस आवेग म्हणजे भय. प्रत्येकाला आयुष्यात विविध कारणास्तव या भयाचा सामना करावाच लागतो. तेव्हा, त्यामागची कारणे, त्याचे शारीरिक, मानसिक परिणाम याविषयी आजच्या लेखात सविस्तर जाणून घेऊया.
 
मनातील विविध भावना आणि त्यांवरील नियंत्रण हे स्वास्थ्यासाठी (केवळ मानसिक स्वास्थ्य नव्हे, तर शारीरिक स्वास्थ्यदेखील) अत्यंत महत्त्वाचे आहे. मनामध्ये भावनांचे प्रकटीकरण सातत्याने होत असते. आपल्या परिसरात घडणार्‍या घडामोडींवर मनुष्याची ही प्रतिक्रिया असते. गणपती-दिवाळीच्या सणांना मन प्रफुल्लित-आनंदी राहते. हे केवळ गणपती-दिवाळीच्या दिवसांपुरते मर्यादित नसते. कुठलाही सण चांगली गोष्ट होण्यापूर्वी (ती होणार असे जाहीर झाल्यापासून) ते होऊन गेल्यानंतरही विविध सकारात्मक भावना कमी-अधिक प्रमाणात मनात उत्पन्न होतच राहतात. उदा. लग्न ठरल्यापासून ते दाम्पत्य एकत्र राहू लागेपर्यंत किंवा टी-२० क्रिकेट मालिका घोषित झाल्यापासून अंतिम सामना होऊन गेल्यानंतरही विविध भावनांच्या रंगछटा मनात उत्पन्न होत राहतात. मन आहे, तर सभोवतालच्या बदलांवर त्याची प्रतिक्रियाही उमटणारच. पण, त्या भावनांचा अतिरेक होऊ लागला की ती व्यक्ती अस्वस्थ होते. सैरभैर होते. ‘अति तेथे माती’ अशी जी म्हण आहे, ती मनाला आणि विविध उत्कट भावनांना तंतोतत जुळते.
 
भावना उत्पन्नच होणार नाहीत, ही स्थिती केवळ मृत्यूपश्चातच शक्य आहे. जीवित अवस्थेत तीव्रतेमधील फरकाने सर्व मनुष्यजातीत भावना उत्पन्न होतच राहतात. त्या भावनांची अनुभूती, स्वीकृतीदेखील महत्त्वाची आहे. सुख जसे हवेहवेसे असते, दुःखही तसेच झेपण्याची, सहन करण्याची क्षमता प्रत्येक माणसात असते. फक्त तीव्रता-प्रखरता कमी-अधिक असू शकते.
मानसिक भावनांना धारण करणे, रोखणे याचा अर्थ त्या अनुभवूच नयेत, असा होत नाही. भावनांच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय आणि कृती हातून घडू नये, ज्याचा पुढील आयुष्यावर व स्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम होईल, असे होऊ नये. असा त्याचा गर्भित (अपेक्षित) अर्थ आहे. भावनांमुळ विशिष्ट संवेदना उत्पन्न होतात आणि तसा मूड होत जातो. स्वतःला आणि इतरांना जर त्या कृतीमुळे, मूडमुळे त्रास होणार असेल, तर त्या भावनांच्या उद्रेकाला वेळीच आवरते घेणे गरजेचे आहे.
 
भय या मानसिक भावनेबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया. भय केवळ एक मानसिक स्थिती नाही, तर भय हे विविध रोगांचे उत्पत्ति कारण (हेतू) म्हणूनही आयुर्वेदात सांगितले आहे. तसेच भयाचा वापर चिकित्सांमध्ये कसा करावा, याबद्दलही आयुर्वेदात नमूद केले आहे. त्यानिमित्ताने भय या धारणीय वेगाबद्दल वाचूया.
 
भय Fear म्हणजे - ‘अपकारक अनुसंधानजम् दैन्यम्|’ म्हणजेच, ’Fear of facing harmful things is fear.’ परीक्षेत गुण कमी पडले की घरी आई ओरडेल, ही भीती. मग निकालच लपविणे ही त्यावरील कृती. आपल्याला (क्वचित प्रसंगी आपल्या चुकीमुळे) काही शिक्षा/नुकसान/कमीपणा-पाणउतारा/अनुशासन होईल, याची भीती. भय ही मनुष्य प्राण्यातील सर्वांत प्राथमिक वृत्ती आहे. ही नैसर्गिक भावना जीवंत राहण्याची मूलतः वृत्ती आहे. ’flight or fight / escape or confront ’ या पद्धतीची प्रक्रिया सतत मनामध्ये सुरू असते. कुठल्याही प्रकारच्या ’perceived threat ’ (जाणवलेली धमकी/धोक्याची पूर्वसूचना)च्या प्रतिकारासाठी मनात उत्पन्न झालेली भावना ही ’flight or fight’ यापैकी एकात मोडते. स्वतःला/परिवारावर/समाजावर/देशावर होणार्‍या धोक्याच्या सूचनेवर मन या दोनपैकी एक पर्याय निवडते. त्याचे दाटून सामना करणे किंवा पलायन करणे (देश अस्थिर झाला आहे. मला इथे भीती वाटते इ. प्रकारची विधाने आपण वाचली-ऐकली आहेत) ही भीती धमकी, धोका/ danger वास्तविक परिस्थितीबद्दल असू शकते किंवा मनाचे त्यावर काल्पनिक ऊहापोहातून निर्मित स्थिती असू शकते.
 
भयनिर्मिती वास्तविक समस्यांवर झाली, तर खर्‍या समस्यांची तीव्रता आणि त्यावर उत्पन्न भयाची उत्कटता याचे परस्पर प्रमाण ( directly proportionate ) संबंध असणे आवश्यक आहे. पण, दर वेळेस तसेच असते असे नाही. उदा. महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही आणि आईवडील ओरडतील, ही भीती रास्त आहे. पण, मारहाण करतील, घरातून हाकलून देतील, लग्न लावून देतील, त्यापेक्षा घर सोडून पलायन करणे ही उत्कट काल्पनिक प्रतिक्रिया होय. जीवाचे बरे-वाईट करून घेणे हीदेखील टोकाचीच भूमिका होय.
 
भय ही भावना क्षणिक, तात्कालीक ( instant, temporary ) असली की ती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न त्या व्यक्तीकडून केले जातात. धमकी, संकटेही काही वेळेस नगण्य असतात आणि अशा वेळेस क्षणिक भीतीही रास्त आहे. पण, संकट नगण्य आणि भीती अति, असे असल्यास चुकीचे आहे. ही भीती मनात घर करून राहू लागली की, त्याची अनैसर्गिक irrational भयाकडे घोडझेप होते आणि मग phobias, panic fear, social anxiety disorder, post traumatic stress disorder ( PTSD ) इ.ची उत्पत्ती होऊ लागते. सतत काहीतरी वाईट घडेल, याची अनामिक भीती सतावत राहते आणि सदसद्विवेकबुद्धीचे कार्य ढासळू लागते. कुठलेच कार्य, कुठलाच निर्णय घेण्यास मन व कृती करण्यास शरीर सक्षम राहात नाही, तयार होत नाही. हात-पाय थंड पडू लागतात. शरीर-बुद्धी आपले कार्य करण्यात असमर्थ होऊ लागते व आहे त्या स्थितीत परिस्थितीत थिजून राहते. अंधाराची भीती (लहानपणी क्वचित वेळेस जरी रास्त असली) तरी पुढे जाऊन त्याबद्दल फोबिया व उपाय म्हणून प्रकाशाचा OCD 
( Obsessive Compulsive Disorder ) इथपर्यंत वाढू शकते.
 
मानसिक भावनांना वेळीच आटोक्यात करणे, रोखणे यामुळेच अत्यंत महत्त्वाचे आहे. भयामुळे बौद्धिक (बुद्धीची) कार्येपण बाधित होऊ लागतात. जसे धी-धृति-स्मृति यांचे कार्य बिघडते. ‘धी’ (आकलनशक्ती) एखादी गोष्ट समजणे, कळणे, लक्षात येणे हे ‘धी’ बुद्धीचे कार्य आहे. ‘धृति’ retain म्हणजे  करणे (धारणाशक्ती). जे काही शिकले आहे, ते लक्षात ठेवणे, ते ज्ञान धारण करणे आणि ‘स्मृति’ म्हणजे स्मरणशक्ती ( Memory ) , जे शिकलंय त्याचा योग्य वेळेस उपयोग करणे, वापर करणे. उदा: वर्षभर अभ्यास करणे, समजणे म्हणजे ‘धी’, वाचलेले पाठ केलेले लक्षात ठेवणे, धारण करणे म्हणजे ‘धृति’ आणि परीक्षेच्या वेळेस हे ज्ञान अभ्यास Recollect करून योग्य, उत्तम लिहिणे हे ‘स्मृति’चे कार्य आहे. मानसिक भावनांच्या उद्रेकामुळे प्रज्ञेचे, बुद्धीचे कार्य अनियमित होऊ लागते, प्रज्ञेचे/बुद्धीचे ग्रहणकार्य, धारणकार्य आणि पुनः Recollect करणे नीट होत नाही. सर्वच कार्येे समप्रमाणात बिघडतात असे नाही. कमी-अधिक फरक असतो. या चुकीच्या कार्याला प्रज्ञापराध (प्रज्ञा=बुद्धि अपराध=चुकीचे कार्य) यामुळे प्रज्ञाविभ्रंश होतो.
 
भयामुळेच केवळ नाही, तर विविध धारणीय आवेगांचा याच पद्धतीने शरीर-मन व बुद्धीवर परिणाम होता असतो. त्यांची कार्ये खंडित होतात आणि विविध व्याधि/आरोग्यसमस्या उत्पन्न होतात. भयामुळे विविध व्याधि उत्पन्न होऊ शकतात (म्हणजे विविध व्याधि उत्पन्न/निर्माण होण्यासाठी भय हे कारण आहे.) आयुर्वेदात भयाचा चिकित्सेतही समावेश केलेला आहे. भयांचा त्रिदोषांवरील परिणामही सांगितला आहे. या सर्व गोष्टी पुढील लेखात वाचूया.

(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
Powered By Sangraha 9.0