लोहपुरुषाची १५०वी जयंती : एकतानगरात भव्य कार्यक्रम!

28 Oct 2025 09:59:52
Sardar Vallabhbhai Patel
 
दि. ३१ ऑटोबर रोजी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५०वी जयंती अर्थात सार्धशताब्दी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यंदा सरदार पटेल यांच्या १५०व्या जयंतीचे वर्ष असल्याने, गुजरातसह देशात सर्वत्र या महापुरुषाचे स्मरण केले जाईल. त्यानिमित्ताने एकतानगरमध्ये आयोजित या ‘भारत पर्वा’विषयी...
 
भारताचे पोलादीपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार म्हणून ज्या सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते, त्यांची यंदा १५०वी जयंती असून त्यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या महापुरुषाचे स्मरण केले जाणार आहे. दरवर्षी ३१ ऑटोबर रोजी सरदार पटेल यांची जयंती साजरी केली जाते. यंदा सरदार पटेल यांच्या १५०व्या जयंतीचे वर्ष असल्याने गुजरातसह देशात सर्वत्र या महापुरुषाचे स्मरण केले जाणार आहे. स्वातंत्र्यानंतर देशातील ५६० हून अधिक संस्थाने विलीन करून देश एकसंध ठेवण्याचे महान कार्य सरदार पटेल यांनी केले होते. सरदार पटेल यांचा जन्मदिन हा ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून ओळखला जातो. सरदार पटेल यांनी देश एकसंध, एकात्म ठेवण्याचे मोठे कार्य देशाचे गृहमंत्री या नात्याने केले होते.
 
राष्ट्रीय एकता दिनानिमित्ताने सातपुडा आणि विंध्याचल पर्वत रांगांच्या मध्ये वसलेल्या एकतानगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एकतानगर गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यात आहे. एकतानगरमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सशस्त्र दल,राज्य पोलीस दल यांच्याकडून विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. तसेच सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस, सशस्त्र सीमा दल यांच्याबरोबर आसाम, त्रिपुरा, ओडिशा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, जम्मू-काश्मीर, केरळ, आंध्र प्रदेश यांची पोलीस दले सहभागी होणार आहेत. या समारंभात घोडदल आणि उंटदल सहभागी होणार आहे. यावेळी विविध प्रात्यक्षिकेही सादर केली जाणार आहेत. याप्रसंगी देशी कुत्र्यांची जी जात विकसित करण्यात आली आहे, त्यांचा समावेशही या कार्यक्रमात करण्यात आला आहे. महिला पोलीस आणि महिला पोलीस अधिकारी यांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे. पंतप्रधान मोदी यांना महिला अधिकार्‍याकडून मानवंदना दिली जाणार आहे. महिला पोलीस दलाकडून या प्रसंगी मार्शल आर्टची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. या प्रसंगी संपूर्णपणे भारतीय वंशाच्या कुत्र्यांची प्रात्यक्षिके पाहायला मिळणार आहेत.
 
या कार्यक्रमात विविध राज्यांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. तसेच विविध सुरक्षा दलांचे चित्ररथही सहभागी होणार आहेत. त्यानिमित्ताने विविधेतील एकतेचे दर्शन सर्व उपस्थितांना होणार आहे. शौर्य पुरस्कार मिळालेले सुरक्षा दलांचे जवान या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ९०० कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
 
दि. १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या काळात एकतानगरमध्ये ‘भारत पर्व’ साजरे केले जाणार आहे. त्या निमित्ताने विविध राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, आणि खाद्य मेळावे यांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबर या दिवशी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी या समारंभाची सांगता होणार आहे. वनवासी समाजाची वैभवशाली परंपरा यावर या निमित्ताने प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.
 
मोदी यांच्या हस्ते राममंदिरावर ध्वजारोहण!
 
येत्या २५ नोव्हेंबर रोजी राम विवाह पंचमी असून त्या दिवसाचे औचित्य साधून अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१ फूट उंचीच्या ध्वजाचे आरोहण केले जाणार आहे. अयोध्येतील राममंदिराचे सर्व बांधकाम पूर्ण झाल्याचे ध्वजारोहण समारंभ हे द्योतक आहे. या समारंभास भाजपचे वरिष्ठ नेते आणि हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाची अयोध्यानगरीत जोरदार तयारी सुरु आहे. श्री राम जन्मभूमी मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, ध्वजारोहण समारंभ २५ नोव्हेंबर रोजी होत असून त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आपण या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सूचित केले आहे. या ध्वजारोहण समारंभास भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शयता आहे. लक्षावधी हिंदूंच्या प्रदीर्घ काळापासूनच्या आकांक्षांची पूर्तता यानिमित्ताने होत आहे. या समारंभास हजारो भाविक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
 
राम मंदिराचे मुख्य बांधकाम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. बाहेरची भिंत, शेषावतार मंदिर, सप्त मंडपम आणि पुष्करणी याचे काम या आधीच पूर्ण झाले आहे. या समारंभाच्या निमित्ताने दि. २१ ते २५ नोव्हेंबर या काळात अयोध्या आणि काशी येथील महंतांच्या द्वारे वैदिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राममंदिर परिसरातील सर्व मंदिरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने घोषित केले आहे. भगवान श्री रामललाचे गर्भगृह, महादेव, गणेश, हनुमान, सूर्यदेव, माता भगवती, शेषावतार भगवान विष्णू ही मंदिरेही बांधून पूर्ण झाली आहेत. या प्रत्येक मंदिरांच्या शिखरावर कळस आणि ध्वज उभारण्यात आला आहे. गर्भगृहाच्या व्यतिरिक्त सात भव्य मंडपांमध्ये रामायण आणि भक्ती परंपरेतील ऋषी वाल्मिकी, ऋषी वशिष्ठ, ऋषी विश्वामित्र, ऋषी अगस्त्य, निषादराज, शबरी, देवी अहिल्या यांच्या प्रतिमा साकारण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. राममंदिर परिसरात जटायू आणि भगवान रामास सेतू उभारण्यास मदत करणार्‍या खारीची प्रतिमा उभारण्यात आली आहे. अयोध्येतील राममंदिरामध्ये २२ जानेवारी २०२४ या दिवशी रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्येमध्ये भक्तांचा ओघ सातत्याने वाढतच आहे.
 
१९४७च्या घुसखोरीच्या निषेधार्थ निदर्शने
 
पाकिस्तानने १९४७ साली काश्मीरमध्ये जी घुसखोरी केली, त्याच्या निषेधार्थ युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीने ब्रुसेल्स येथे युरोपियन पार्लमेंटसमोर जोरदार निदर्शने केली. पाकिस्तानने काश्मीरमध्ये जो अत्याचार केला, त्यामुळे या प्रगतीशील राज्याच्या सामाजिक चौकटीस तडा गेला असल्याची टीका निदर्शकांनी केली. पाकिस्तानने काश्मीरमध्ये जे आक्रमण केले, त्या २२ ऑटोबर १९४७ या दिवसांच्या स्मृती निमित्ताने या निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. जे आक्रमण करण्यात आले होते त्यास ‘ऑपरेशन गुलमर्ग’ असे नाव देण्यात आले होते. त्यावेळी सामूहिक हत्या झाल्या. अनेक घरांची नासधूस करण्यात आली, तर हजारो काश्मिरी कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. या आक्रमणामुळे काश्मीर राज्य विभागले गेलेच, पण त्याचबरोबर येथील जनतेला अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागला. तसेच राजकीय अस्थिरता राहिली ते वेगळेच! आमच्या लोकांचे हत्याकांड करण्यात आले, आमची मुले अनाथ झाली, आमच्या असंख्य महिला विधवा झाल्या, याकडेही निदर्शकांनी लक्ष वेधले.
 
पाकिस्तानची ती कृती म्हणजे मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे निदर्शकांनी म्हटले आहे. संपूर्ण पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये मानवी अधिकाराचे जे उल्लंघन झाले, त्याचा तपास करण्यासाठी एक स्वतंत्र सत्यशोधक व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी निदर्शकांनी केली. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये तेथील जनतेची जी पिळवणूक आणि गळचेपी होत आहे, याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर जाब विचारायला हवा आणि त्याबद्दल इस्लामाबादवर निर्बंधही लादण्यात यावेत, अशी मागणीया निदर्शकांनी केली. आपल्या भूराजकीय खेळासाठी पाकिस्तानने गेली ७८ वर्षे पाकव्याप्त काश्मीरचा एक प्यादे म्हणून वापर केला, असे एका निदर्शकाने सांगितले. पाकव्याप्त काश्मीर लष्करमुक्त करावे, विदेशी हस्तक्षेपापासून मुक्त करावे,अशी मागणीही यानिमित्ताने करण्यात आली.
 
Powered By Sangraha 9.0