प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीतील त्यांच्या वास्तव्य काळातील पाऊलखुणा प्रखरपणे समोर आणण्याच्या दृष्टीने नाशिकमध्ये ‘रामकाल पथ’ हा प्रकल्प सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी साकारला जाणार आहे. मात्र, घोषणा होऊन आणि पहिल्या टप्प्यातील कामांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला असतानाही, प्रशासनाच्या चालढकल करण्याच्या धोरणामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हायला बराच अवधी लागला. आतापर्यंत या प्रकल्पाचे अर्धे काम व्हायला पाहिजे होते. पण, काल-परवापासून महापालिका प्रशासनाने या बहुप्रतीक्षित प्रकल्पाच्या कामाला विलंबाने का होईना, पण सुरुवात केली.
आता सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी संपूर्ण प्रकल्प उभा राहील, यासाठी प्रशासनाला नियोजन करावे लागेल. आगामी सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रामकाल पथासाठी गोदाकाठ परिसरातील मंदिरांच्या रंगरंगोटीच्या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. यामध्ये रामायणातील आकर्षक भित्तिचित्रे साकारण्यात येणार आहेत. तसेच पंचवटी, रामकुंड, गडकरी चौक परिसरातील हनुमान मंदिर, काळाराम मंदिर, तसेच गंगा घाटावरील प्राचीन देवस्थाने या ठिकाणी रंगकाम, स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत, तर रामकुंड, सीता गुंफा व काळाराम मंदिर परिसरात रामायणातील आकर्षक भित्तिचित्रे साकारण्यात येणार आहेत.
तसेच मालेगाव स्टॅण्ड, इंद्रकुंड, काळाराम मंदिर, सीता गुंफा येथील प्रवेशद्वाराबरोबरच रामकुंड, सरदार चौक, काळाराम मंदिर आणि सीता गुफा येथे दगडी फरशा बसविण्यात येणार आहेत. रामकालपथ हा प्रकल्प नाशिकच्या सिंहस्थ महापर्वाचे महत्त्वाचे आकर्षण ठरेल. यादृष्टीने पहिल्या टप्प्यातील रंगरंगोटी आणि सौंदर्यीकरणाचे काम जोरात सुरू आहे. त्याचप्रमाणे रामकाल पथ प्रकल्पाअंतर्गत पंचवटीतील सीता गुंफा, काळाराम मंदिर, रामकुंड आणि गोदाकाठाला जोडणारा एक किमी लांबीचा वॉक-वे निर्माण केला जाणार आहे. या मार्गावर रामायणकालीन शिल्पकला, संगीत सादरीकरणे आणि वनवृत्तीसारखे पर्यावरणीय सौंदर्याची निर्मिती केली जाणार आहे. रामकाल पथ प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२६ अखेर पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत असून सिंहस्थ कुंभमेळ्याआधी धार्मिक वातावरण तयार करण्यास पोषक ठरेल, असे बोलले जात आहे.
पर्यटक फिरले माघारी
एकीकडे महापालिका प्रशासनाने ‘रामकाल पथ’ प्रकल्पाअंतर्गत येणार्या पहिल्या टप्प्यातील विकासकामांना सुरुवात झाली असताना, दुसरीकडे मात्र विशेष करून प्रकल्प जेथे आकाराला येणार आहे, त्या गोदाकाठाची स्वच्छता राखण्यात महापालिका प्रशासन कमी पडल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता, दिवाळी असल्याने देश-विदेशांतील पर्यटक आणि भाविक नाशिकमध्ये दाखल होतील, याबाबतचा अंदाज शहरातील सर्वच यंत्रणांनी वर्तवला होता. त्यामुळे ओघानेच हे पर्यटक जेथे जातील, ती पर्यटनस्थळे स्वच्छ कशी राहतील, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची निकड होती. पण, दिवाळीच्या सुटीत तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकमध्ये पर्यटनासाठी आलेल्या भाविकांची मात्र चांगलीच निराशा झाली.
शहरातील प्रमुख महत्त्वाच्या स्थळांवर पर्यटकांसंदर्भात दखलच घेतली न गेल्याने त्यांच्याकडून चांगलीच नाराजी व्यक्त केली गेली. तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटनासाठीही नाशिक चांगले स्थान असल्याने सिंहस्थापूर्वी नाशिकचे ‘ब्रॅण्डिंग’ करण्याचा प्रशासनाचा मनसुबा आहे. मात्र, सद्यस्थितीत दिवाळी सुटी सार्थकी लावण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणावर नाराजी व्यक्त केली. त्यातच रामकुंड परिसरात सुरू असलेले वस्त्रांतरगृहाचे पाडकाम रामकुंडापर्यंत पोहोचण्यास अडथळ्याचे ठरत आहे, तर दुसरीकडे पंचवटीतील प्रमुख आकर्षण असलेली सीता गुंफा कामासाठी बंद करण्यात आल्याने तिच्या दर्शनालाही भाविकांना मुकावे लागले. तेथून थेट तपोवनात गेल्यानंतर गोदावरीतील दूषित पाण्याचा दुर्गंध येत असल्याने तेथूनही भाविकांनी काढता पाय घेतला. दुसरीकडे यात्रेकरूंकडून स्थानिक रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे घेत असल्याच्या तक्रारी वाढीला लागल्या आहेत. यासाठी रिक्षाथांब्यांवर दरपत्रक लावावे, तसेच ‘नाशिकदर्शन’साठी एसटी महामंडळाच्या बसचे संपूर्ण वेळापत्रकही दर्शनी भागात लावण्याची मागणी पर्यटकांकडून होत आहे.
नाशिकचा विकास झपाट्याने व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारच्या जोडीला राज्य सरकारही पावले उचलत आहेत. गरज आहे, त्या कामांसाठी त्वरित निधी उपलब्ध करून देत मंजुरी दिली जात आहे. यामागे नाशिकचा धार्मिक विकास व्हावा आणि त्यातून स्थानिकांना रोजगार मिळावा, या अपेक्षेने शासन प्रयत्न करत असताना प्रशासन मात्र त्यात नाहक खोडा घालत आहे.
- विराम गांगुर्डे