मुंबई : (Pravin Darekar) महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून आ.प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज म्हाडा कार्यालय, गृहनिर्माण भवन येथे पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रविण दरेकर स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे व्हिजन तयार करतील ते पुढच्या विकसित महाराष्ट्रासाठी महत्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तर दरेकर (Pravin Darekar) यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरण हे आगामी काळात ऐतिहासिक काम करेल, असा विश्वास उपस्थितांना दिला.
या सोहळ्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री ऍड. आशिष शेलार, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, मुंबई उपनगर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, गृहनिर्माण व सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, माजी आमदार भाई गिरकर, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जैस्वाल, आ.प्रसाद लाड, आ. चित्रा वाघ, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई बॅंकेचे संचालक शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, यांसह मोठ्यासंख्येने सहकार, गृहनिर्माण क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : ‘उद्धव सेनेला इंगळ्या डसल्या...’ मेघा धाडेची सनसनीत टीका
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले कि, या प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबईतील गरीब माणसाला घरे मिळावीत हा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तयार केलेली सर्वांसाठी घरे या योजनेच्या माध्यमातून व देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबईतील महसूलच्या जागा, मिलच्या जागा, खासगी जागा यांचा एकीकृत विकास करण्यासाठी या प्राधिकरणाची गरज होती. या प्राधिकरणाला अनन्य साधारण महत्व आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२९, २०३४, २०४७ चा महाराष्ट्र कसा असावा, याचे प्रेझेंटेशन झाले. त्यात राज्याच्या वेगवेगळ्या १६ विभागानी विकसित महाराष्ट्राबाबत काय भूमिका असाव्यात याबाबत मुख्यमंत्र्यांनी व्हिजन तयार केलेय. हे प्रेझेंटेशन होत असताना गृहनिर्माण विभागाने काय केले पाहिजे, याची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याची योजना मंत्रिमंडळाने मंजूर केली. दरेकरांनी स्वयं/समूह पुनर्विकासबाबत संपूर्ण राज्याचा अभ्यास केलाय. त्याचाही फायदा विकसित महाराष्ट्रासाठी होणार आहे. महसूलच्या अनेक जागांवर गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. या संस्थांच्या इमारतींचा पुनर्विकास करायचा असेल तर त्यासाठी महसूल खात्याचे धोरण काय असले पाहिजे, कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत, याचा आराखडा तयार करण्याचे कामही आम्ही या प्राधिकरणाला देणार आहोत. मुख्यमंत्री फडणवीस यांचा संकल्प, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मार्गदर्शन या माध्यमातून निश्चित न्याय देण्याचं काम होईल. दरेकर विकसित महाराष्ट्र ही संकल्पना पुढे नेतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.
यावेळी स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून आ. प्रविण दरेकर म्हणाले कि, सगळ्यात मोठी बँक माणुसकीची आहे. स्वयंपुनर्विकास योजना विनाविकासक इमारत उभी करणे आहे. देवाभाऊंचे पाठबळ हेच या स्वयंपुनर्विकासाचे बळ आहे. मराठी माणसाला, मोडकळीस आलेल्या, २५-३० वर्ष झालेल्या इमारतीचा पुनर्विकास करून मोठे घर मिळेल यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरेकर (Pravin Darekar) समिती नेमली. मी तीन महिने राज्यात फिरलो. अभ्यासगटाचा परिपूर्ण असा अहवाल आम्ही सरकारला दिला. सरकारने तो अहवाल जसाच्या तसा स्वीकारला. या अहवालात प्राधिकरणाचीही मागणी केली होती, ती सरकारने मान्य केली आणि या प्राधिकरणाची जबाबदारीही माझ्यावर सोपवली. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत स्वयंपुनर्विकास ही योजना चालणार आहे. चिरंतर चालणारा हा विषय असून सरकारने याला पाठबळ देण्याची गरज आहे. माझ्या अभ्यास गटाच्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या असून त्याबाबत अध्यादेश काढावेत. आज सरकारने दिलेल्या सवलती केवळ मुंबईला लागू आहेत. या सवलती संपूर्ण राज्याला लागू करण्याची आवश्यकता आहे. या प्राधिकरणाला नियोजन प्राधिकरणाचे अधिकार असावेत, असेही दरेकर म्हणाले. मराठी माणसाबाबत केवळ बोलून चालत नाही, कृती करावी लागते. मराठी माणूस मुंबईबाहेर वसई, विरार, नालासोपारा, कसाऱ्यापर्यंत गेला. त्याची कधी काळजी केली नाही. नुसत्या गप्पा मारून चालत नाही. कृती करावी लागते आणि ती कृती देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. या योजनेच्या यशाचे खरे धनी देवाभाऊ आहेत. देवाभाऊंसारखे बळ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही द्यावे. त्यांनी या प्राधिकरणाचे पालकत्व घ्यावे. ऐतिहासिक प्राधिकरण म्हणून हे प्राधिकरण काम करेल, असा विश्वास दरेकरांनी (Pravin Darekar) यावेळी व्यक्त केला.
हे वाचलात का ? : 8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ८व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजूरी, ५० लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा
तत्पूर्वी मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या मनोगतात म्हटले कि, भाडेकरूंना महत्वाचे फायदे सुलभतेने मिळावेत याचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाडेकरूंनी, नागरिकांनी ही चळवळ मोठ्या प्रमाणावर उभी केल्यावर लक्षात आले कि विकासक जो फायदा घेतात तो मूळ राहणाऱ्या सभासदांना झाला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या माध्यमातून नागरिकाला जास्तीचा फायदा मिळून त्याला अधिकार दिला पाहिजे, हा मूलभूत विचार डोळ्यासमोर ठेवून स्वयंपुनर्विकासाला गतिमान करण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीसांनी केले. त्यामागचे सर्व श्रेय दरेकरांना आहे. सामान्य माणसाच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या भूमिकेची ही सुरुवात आहे. काही लोक मी, मुंबईकर, मुंबई या विषयावर बोलत राहतील. बोलघेवडेपणा करणारे करत राहतील पण प्रविण दरेकर, भाजपा आणि मुख्यमंत्री प्रत्यक्षात कर्मवीर म्हणून काम करत राहतील, अशा शुभेच्छाही शेलार यांनी दिल्या.
गृहनिर्माण व सहकार राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले कि, संपूर्ण जगात २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष साजरे करत असताना राज्याच्या गृहनिर्माण विभागात स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना करून त्याच्या अध्यक्षपदी दरेकरांची निवड केली, त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार व्यक्त करतो. दरेकरांनी सर्वप्रथम ही चळवळ उभी करून २२ प्रकल्प उभे केले. मुंबईतील माणसाला घर घेण्यासाठी लढा उभा करावा लागतो. त्या चळवळीत सहभागी होऊन लोकांना एकत्रित करून स्वतःच्या इमारतीचा स्वयंपुनर्विकास करण्याचे धोरण त्यांनी तयार केले. ते राज्यासमोर मांडले, राज्याने ते स्वीकारले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चळवळीचे कर्तेधर्ते दरेकरांच्या हाती सूत्रे सोपावल्याचे भोयर म्हणाले.
आजपासून मुंबईच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल
मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम म्हणाले कि, आज स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची जबाबदारी घेत असताना दरेकर यांचे २२ प्रकल्प पूर्ण झालेत. मुंबई शहरात २२ यशस्वी प्रकल्प पूर्ण करणाऱ्या प्रविण दरेकर यांच्या हातात हे प्राधिकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेय. आजपासून मुंबईच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल. येणाऱ्या काळात मुंबईतील सर्व सोसायट्या, त्यांच्या फेडरेशनला एका व्यासपीठावर आणून त्यांना स्वयंपुनर्विकासासाठी प्रेरित करून दिशा दाखविण्याचे काम प्राधिकरणामार्फत व्हावे. मुंबईतील मराठी माणसाचा स्वयंपुनर्विकास कोण घडवून आणतेय किंवा २५ वर्षापर्यंत मुंबईकराला वाळवीसारखे कुणी खाल्ले असा प्रश्न उपस्थित करत साटम पुढे म्हणाले कि, मुंबई शहरात गेल्या ११ वर्षात जे काम झालेय, क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल घडवून आणण्याचे काम देवाभाऊंच्या सरकारच्या माध्यमातून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार सुरु आहे. त्याला खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरण नक्कीच करेल.