मुंबई : ( Megha Dhade ) मागच्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे चांगलेच चर्चेत आहे. त्याला कारणही तसंच आहे. महेश यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींविषयी त्य़ांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामुळे विरोधीपक्षांकडून चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. ‘भाजप माझं घर आहे, मी मोदीजींचा भक्त आहे’ असं मत दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी माडंल होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी बरीच टीका केली. अपघात प्रकरणात सूनबाई अडकल्या आहेत, म्हणून ते अशी मुक्ताफळं उधळतायत, अशा शब्दांत किशोरी पेडणेकरांनी निशाणा साधला होता. तर महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. याप्रकरणावर अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’ची विजेती मेघा धाडेनं कोठारेंची बाजू घेतली आहे. सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहित तिने, महेश कोठारेंना पाठिंबा दर्शविला आहे.
या पोस्टमध्ये मेघाने लिहिलं आहे, ‘अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने उद्धव सेना जॉइन केली होती, तेव्हा कोणत्याही भाजप प्रवक्त्याने तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नव्हता. सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरने तर मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढवली होती, तरी कोणी आक्षेप घेतला नाही. परंतु महेश कोठारेंनी मोदींची तारीफ केली की उद्धव सेनेला इंगळ्या डसल्या. कोठारेंवर टीकेची झोड उठवली गेली. त्यांच्या मराठीपणावर देखील शंका घेण्यात आली’, असं तिने लिहिलंय.
‘हे असं झालं कारण, कोठारे जे बोलले ते मनापासून बोलले. कोणत्या तिकिटाच्या लालसेपोटी, कोणाचे पाकीट मिळवण्यासाठी ते असे बोलले नाही. एक सामान्य मुंबईकरांची जी भावना आहे, जो मुंबईकर आधी रस्त्यावर धक्के खायचा, तो आता मेट्रोत गार वाऱ्यात वेगाने प्रवास करतोय. जो मुंबईकर आधी ट्रॅफिकमध्ये अडकायचा, आता तो अटल सेतूवरून सुसाट धावतोय. त्या मुंबईकरांच्या भावनांचे प्रगटीकरण कोठारेंच्या भाषणात झाले आणि म्हणूनच उद्धव सेनेच्या पायाखालची जमीन सरकली आणि हे सत्यात देखील उतरणार आहे’, अशी टीका तिने केली आहे.
<!-- Inject Script Filtered -->
‘महेश सर तुम्ही जे बोललात ते तुमचं मत होतं , जे तुम्ही मनापासून व्यक्त केलं. आम्हा सगळ्यांना तुमच्या मताचा शंभर टक्के आदर आहे. बाकी टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. कारण ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना. छोडो बेकार की बातो को, हमे तो सच के साथ ही हैना’, असं कॅप्शनही तिने पुढे तिच्या पोस्टला दिलं आहे.
महेश कोठारे नेमकं काय म्हणाले होते?
दिवाळीच्या निमित्ताने बोरिवलीत आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात महेश कोठारे म्हणाले होते, “मी भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे. जेव्हा मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हटलं होतं की ते खासदार निवडून देत नाहीत तर मंत्री निवडून देत आहेत. आता जर या विभागातून नगरसेवक नसेल तर महापौर निवडला जाईल.” महेश कोठारे यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.