ई-उत्पादन क्षेत्राची भरारी!

28 Oct 2025 10:46:39
India
 
आयातशुल्क वाढवून भारताच्या व्यापारात आडकाठी घालण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न निष्फळ ठरलेला दिसतो. भारतातील आयफोन निर्मितीही दबावतंत्राचा अवलंब करुन बंद पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, तरीही इलेट्रॉनिस क्षेत्राने देशातील तिसरे सर्वात मोठे आणि वेगाने विस्तारणारे निर्यात क्षेत्र म्हणून स्थान पटकाविले आहे. त्याचे हे आकलन...
 
भारतातील इलेट्रोनिस वस्तूंची निर्यात सध्या तेजीत आहे. पेट्रोलियम उत्पादनांनंतर सर्वाधिक निर्यात करणारे क्षेत्र म्हणून इलेट्रोनिक क्षेत्र नावारुपास आले आहे. या कारणास्तव भारताने रशियाकडून तेल आयातही बंद करावी, असा अमेरिकेचा धमकीवजा इशारा. मात्र, त्या संदर्भातील दोन्ही देशांची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. अर्थात तसे झाले, तर दोन्ही देशांवर त्याचा प्रभाव पडण्याची शयता आहे. तसे झालेच तर भारत हा तिसर्‍या स्थानी घसरण्याची शयता व्यक्त केली जात आहे. पण, एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम उत्पादन क्षेत्राला मागे टाकून इलेट्रोनिक उत्पादनांच्या क्षेत्रात भारत आघाडी घेऊ शकतो.
 
वाणिज्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२५-२६ या वर्षातील मागील सहा महिन्यांत देशातील इलेट्रोनिक उत्पादन निर्यातीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. रशियातून होणारी तेल आयात पुढील दोन वर्षांत कमी होऊ शकते. ही बाब लक्षात घेतली तर पेट्रोलियम उत्पादन निर्यात तिसर्‍या क्रमांकावर घसरू शकते. सध्या भारत जगभरातील कित्येक देशांना पेट्रोलियम उत्पादने निर्यात करतो, तर निर्यातीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर अभियांत्रिकी उत्पादनांचा क्रमांक लागतो. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताची इलेट्रोनिक निर्यात सातव्या क्रमांकावर होती. गेल्यावर्षी पहिल्या दहा श्रेणींत सर्वाधिक वेगाने वृद्धिंगत होणारे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र होते. त्यानंतर २०२५-२६ या वर्षात प्रत्येक श्रेणीत सर्वांत वेगाने उच्चांक गाठणारे हे क्षेत्र ठरले.
 
तिसर्‍या स्थानी पोहोचल्यानंतर हिरे आणि दागिने निर्यातीला चौथ्या स्थानावर ढकलले होते. २०२१-२२ या वर्षात तयार कपडे आणि औषध निर्यातीला मागे टाकले होते. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, इलेट्रोनिक क्षेत्रातील ही वाढ एकूण ४२ टक्क्यांइतकी आहे. १५.६ अब्ज डॉलरवरुन वाढत ही निर्यात २२.२ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे, ज्यात केवळ ५० टक्के व्यापार तर ‘आयफोन’च्या निर्यातीचा आहे. ‘आयफोन-१७’चे ९ सप्टेंबर रोजी भारतात अनावरण झाले. विशेष म्हणजे, ऐन सणउत्सवाच्या पूर्वीच भारतातून एकूण ४९ लाख स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. ही आजवरची सर्वांत मोठी ‘आयफोन’ची निर्यात मानली जाते. जगभरातील ‘आयफोन’ची वाढती मागणी, भारतातील ‘आयफोन’ची लोकप्रियता, याच्या एकत्रित परिणामामुळे गेल्या वर्षांच्या तुलनेत ४७ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. भारतात ‘आयफोन’सहीत अन्य मोबाईलच्या निर्यातीत केवळ तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे मात्र, ४.८४ कोटी युनिटपर्यंत ही विक्री झाली आहे. भारतीय बाजारपेठेत आयफोनचे स्थान एकूण बाजारपेठेच्या तुलनेत दहा टक्क्यांवर आहे. एका वर्षापूर्वी ते सात टक्क्यांवर होते.
 
‘आयफोन १५’ आणि ‘आयफोन १६’ मॉडेलवर मिळणारी घसघशीत सूट तथा ‘आयफोन १७’ने ग्राहकांना आकर्षित केल्यामुळे ही वाढ शय झाली. नव्याने येणार्‍या मॉडेल आत्मसात करण्यासाठी अनेक ग्राहक उत्सुक असतात. गतवर्षीच्या तुलनेत नव्या आयफोनच्या पूर्वखरेदीत ३० टक्क्यांनी वाढ यंदा नोंदविण्यात आली होती. ‘आयफोन’ आता निमशहरी भागातही आपले स्थान मिळवण्याच्या तयारीत आहे. फक्त यंदाच्या म्हणजेच २०२५ या वर्षात आयफोनची विक्री नऊ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ही वाढ ७.६ अब्ज डॉलर (अंदाजित ६७ हजार कोटी रुपये) इतकी होती.
 
येत्या वर्षात हा आकडा एक लाख कोटींवर पोहोचल्यास आश्चर्यही वाटायला नको, अशी स्थिती आयफोन बाजारपेठेची आहे. स्मार्टफोन्स निर्यात सप्टेंबरमध्ये १.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. गतवर्षीच्या तुलनेत हा १०० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ९२३ दशलक्ष डॉलर्स इतकी निर्यात करण्यात आली. दर महिन्याला हा आकडा सरासरी ९०० दशलक्ष डॉलर इतका आहे. २०२० पासून मोबाईल उत्पादकांसाठी ‘प्रोडट लिंड स्कीम’ (पीएलआय) योजना सुरू केल्यानंतर हा फरक दिसू लागला आहे. यात प्रामुख्याने आयफोन निर्मितीचा वाटा आहे आणि अ‍ॅपल कंपनी भारतात आपली गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. गेल्याच महिन्यात पुण्यातही आयफोनचे नवे दालन खुले झाले.
 
भारतात आयफोनची वाढती मागणी आणि ही आकडेवारी ट्रम्प यांना नेमकी सलते आहे. सातत्याने ते भारताच्या आर्थिक आघाड्यांवर कुरघोड्या करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठीच ते रशियामार्गे येणार्‍या तेलावर आणि आयफोनच्या होणार्‍या निर्यातीवर अंकुश लावण्याच्या प्रयत्नात दिसतात. दरम्यान, पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत १६.४ टक्के घट झाली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्पादनांची वृद्धी ५३.३ अब्ज डॉलर्सवरुन ५९.३ अब्ज डॉलर्स इतकी पोहोचली आहे. भविष्यात इलेट्रोनिस क्षेत्राला उभारी देण्यासाठी आणि हे स्थान बळकटी करण्यासाठी आणखी नव्या धोरणांची अपेक्षा निश्चित आहे. मात्र, अद्याप गरज आहे ती भारतीतील कंपन्यांची यात भागीदारी वाढावी यासाठी.
 
साहजिकच ‘आयफोन’ला टक्कर देण्याचा प्रयत्न दीग्गज कंपन्याही करत आहेत. मात्र, उर्वरित इलेट्रोनिक उत्पादनांमध्ये ही वाढ शय आहे. ‘आयफोन’च्या निर्यातीत प्रामुख्याने चीनची असलेली आघाडी ही डोकेदुखी ठरत होती. मात्र, भारताने गुंतवणूक खेचून आणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि चीनच्या तुलनेत कमीत कमी होणारा खर्च, गेल्या काही वर्षात ‘गेमचेंजर’ ठरू शकला.असाच प्रयोग अन्य उद्योगक्षेत्रांतही करणे शय आहे. फक्त त्यासाठी गरज आहे की, त्या त्या पातळीवर दूरदृष्टिकोन बाळगणार्‍या नेतृत्वाची. उदा. ‘लेन्सकार्ट’ सध्या ७ हजार ३५० कोटींचा ‘आयपीओ’ घेऊन बाजारात उतरण्यास इच्छुक आहे. भारताचा चष्मा उत्पादनाचा थेट स्पर्धक चीन आहे. चीनहून आयात होणार्‍या फ्रेम्सची स्पर्धा भारतातील निर्मात्यांशी असणार आहे. आजघडीला भारतात ५० टक्के लोकांना चष्म्याची गरज आहे. मात्र, या तुलनेत असलेल्या सुविधा अगदी कमी आहेत. याच क्षेत्रातील गरज ओळखून ‘लेन्सकार्ट’ ‘आयपीओ’ उतरवण्याच्या तयारीत आहे. चीनच्या तुलनेत कमी खर्चात उत्पादन करण्याची लृप्ती बाजारात टिकाव लागण्यास फायदेशीर ठरणारी आहे.
 
‘चायना प्लस वन’ ही पाश्चिमात्य कंपन्यांची रणनीती भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मोबाईल वगळता सौरऊर्जा उपकरणे, टेलिकॉम क्षेत्रासाठी आवश्यक उपकरणे आणि अन्य उपकरणे या क्षेत्रातील उपकरणांच्या उत्पादन निर्यातीचा आलेख चढता आहे. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील उत्पादने, निदान-उपचारासंदर्भातील ई-साहित्य आदींचाही यात सामावेश होतो. एकेकाळी इतर देशांवर अवलंबून राहावे लागणार्‍या या क्षेत्रात भारत खर्‍या अर्थाने आत्मनिर्भर होण्याकडे कूच करत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0