मुंबई : (Gangaram Gavankar) आपल्या कसदार नाट्यकृतींतून मालवणी भाषा सातासमुद्रापार नेणाऱ्या गंगाराम गवाणकर यांचे सोमवार दि. २७ ऑक्टोबर रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि. २८ ऑक्टोबर रोजी दहिसर इथल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पडले. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्र सरकारच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या पार्थीवाचे दर्शन घेतले. दहिसर इथल्या खासगी रुगणालयामध्ये मागच्या काही दिवसांपासून गवाणकर यांच्यावर उपचार सुरु होते, अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
गंगाराम गवाणकर (Gangaram Gavankar) यांच्या लेखनीतून साकारलेल्या वस्त्रहरण नाटकाचे ५ हजारपेक्षा जास्त प्रयोग पार पडले. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर, सातासमुद्रापार लंडनमध्ये सुद्धा मालवणी मातीतील कलाकृतीचा डंका वाजला. दिवंगत गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून ते पु.ल. देशपांडे, सतीश दुभाषी अशा अनेकांनी या नाटकाचा गौरव केला. वस्त्रहरण नाटकामुळे व्यावसायिक रंगभूमीवर मालवणी बोलीभाषेला केवळ लोकाश्रयच मिळाला असे नाही, तर सांस्कृतिक प्रतिष्ठा सुद्धा मिळवून दिली. वस्त्रहरण सोबतच ‘वेडी माणसं’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’ 'वनरूम किचन' ' वात्रट मेले' या नाटकांनी देखील रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केले. नाट्यकलेवर प्रेम करणाऱ्या गंगाराम गवाणकर (Gangaram Gavankar) यांच्या निधनामुळे नाट्यसृष्टीची कधीही भरुन न निघणारी हानी झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा ; ‘उद्धव सेनेला इंगळ्या डसल्या...’ मेघा धाडेची सनसनीत टीका
बहुमुखी प्रतिभावंत नाटककाराला आपण मुकलो!
"मालवणी बोलीचा गोडवा आणि ठसका जगभर पोहोचविणारा, कोकणातील बहुमुखी प्रतिभावंत अशा साहित्यिक, नाटककाराला आपण मुकलो आहोत. वस्त्रहरण या विक्रमी नाटकासह,इतर नाट्यकृतींच्या माध्यमातून मराठी रंगभूमीसाठीचे स्वर्गीय गवाणकर (Gangaram Gavankar) यांचे योगदान सदैव स्मरणात ठेवले जाईल. अभिजात मराठीचे सौंदर्य आणि सौष्ठव मालवणी बोली आणखी ठसठशीतपणे मांडते. अशा या मालवणीची नादमाधुर्यता आणि तिचा ठसका स्वर्गीय गवाणकर यांनी आपल्या नाट्यकृतींतून जगभर पोहोचविला. त्यांच्या इतर नाट्यकृती देखील वेगळ्या धाटणीच्या आणि आशयघन राहिल्या आहेत. पौराणिक ढाच्यातील 'वस्त्रहरण' वर्तमानातील चपखल संदर्भ घेत आजही महाविक्रमी वाटचाल करीत आहे, ही त्यांच्या लेखनाची ताकद राहीली. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी, कला-साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. गवाणकर कुटुंबीय, मराठी रंगभूमी चळवळ, त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. आम्ही या सर्वांच्या दुःखात सहभागी असून, त्यांना हा आघात सहन करण्याची क्षमता मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो"
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य
हे वाचलात का ? : 8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ८व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजूरी, ५० लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा
नाट्यक्षेत्रातील जिंदादिल माणूस हरपला!
"महाराष्ट्रातल्या नाट्यक्षेत्रातील जिंदादिल माणूस म्हणून ज्यांचा परिचय असे आपले गंगाराम गवाणकर जी. त्यांच्यातला प्रामाणिकपणा, मिश्किलपणा, विनयशिलता, मनमिळाऊपणा आणि त्यांची क्रिएटिव्हिटी यामुळे त्यांना आणि त्यांच्या लेखणीला जे यश मिळालं, जी लोकमान्यता मिळाली, अन्य कोणी सहजासहजी त्या विक्रमाच्या जवळही जाऊ शकेल असे मला वाटत नाही. त्यांची नाटकं 'वस्त्रहरण', 'वात्रट मेले', 'वन रुम किचन', याबरोबर उमेदीच्या काळातील संघर्षातील नाटकांचीसुद्धा कल्पकता वेगळी आहे, व्यापकता वेगळी आहे. त्यामुळे त्याच्यावरही विश्लेषण आणि व्याख्याने होऊ शकतात. कोकणातून अनेकदा व्हिडिओ कॉल करुन कधी येतस? माका तुका माशे खाउक घालूचे हत. असं त्यांनी एकदा नाही बरेचदा सांगितले आहे. त्यांच्या गावच्या घरी मी येतो म्हणून सांगितले असताना मी जाऊ शकलो नाही, ही एकच इच्छा राहिली. आज त्यांना आदरांजली वाहताना खूप मोठी पोकळी राहिल्यासरखे वाटते आहे."
- अॅड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य