बांगलादेशचे अंतरिम प्रमुख मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्यांना ईशान्य भारत बांगलादेशचा भाग असलेला नकाशा नुकताच भेट दिला. बांगलादेशबरोबरचे संबंध व्यापार आणि संरक्षण पातळीवर अधिक दृढ करण्यासाठी, पाकिस्तानच्या ‘जॉईंट स्टाफ कमिशन’चे प्रमुख जनरल शमशाद मिर्झा यांनी नुकतीच बांगलादेशमध्ये युनूस यांची भेट घेतली. त्यावेळी युनूस यांनी भारताची खोड काढण्याचा प्रयत्न केला. अर्थात, भारताच्या भूभाग बळकवण्याविषयीचे वक्तव्य युनूस यांनी, अमेरिकेच्या दौर्यात एका कार्यक्रमातही केले होते. मात्र, सध्या जनरल शमशाद मिर्झा यांना दिलेल्या नकाशामध्ये आसाम आणि ईशान्य भारतातील काही भाग बांगलादेशाच्या सीमेत दाखवण्याचा प्रयत्न युनूस सरकारने केला आहे. हा प्रकार म्हणजे, भारतविरोधी आंतरराष्ट्रीय रणनीतीचे सूचक आहे.
युनूस यांचे हे पाऊल बांगलादेशच्या नव्या परराष्ट्र धोरणातील धोकादायक वळण दाखवते. शेख हसीना यांच्या काळात भारत-बांगलादेश संबंधांमध्ये स्थैर्य, परस्पर हितसंबंध आणि सीमावादांवरील संयम दिसत होता. मात्र, सध्या युनूस यांच्या सरकारने बांगलादेशात भारतविरोधी भावनेला खतपाणी घातले आहे. अर्थात, भारतविरोधी विचारांवरच युनूस यांनी राजसत्ता बळकावल्याने, त्यांचा भारतद्वेष नवा नाही. मात्र, युनूस यांनी असा नकाशा पाकिस्तानी लष्करी अधिकार्यांना देण्यामागे पाकिस्तान आणि अमेरिकेच्याही सूक्ष्म हितसंबंधांचे प्रतिबिंब दिसते.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाकिस्तानचे धोरण कायम एकाच मार्गाने गेले आहे. तो मार्ग म्हणजे भारताच्या विकासयात्रेत अडथळा निर्मण करणे, भारताला राजकीय, मानसिक आणि सामरिक स्तरावर अस्थिर ठेवणे. आजमितीला पाकिस्तानात आर्थिक दिवाळखोरी, राजकीय संकटे आणि सामाजिक असंतोष मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक ठिकाणी मानवी हक्कांसाठी, दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी आंदोलने सुरू आहेत. ही आंदोलने दडपण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा दले स्वतःच्याच जनतेवर अत्याचार करत आहेत. असे असताना, पाकिस्तान जनतेच्या भारतविरोधी भावनेचा उपयोग आंतरिक असंतोष झाकण्यासाठी करताना दिसतो.
बांगलादेशमधील सध्याच्या नेतृत्वानेही पाकिस्तानच्या पाऊलावर पाऊल ठेवले आहे. बांगलादेशमध्ये अहमदिया मुस्लिमांना ‘गैरमुस्लीम’ जाहीर करण्यासाठी, एक नवे आंदोलन दि. १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. बांगलादेशातील कट्टरता नेमक्या कोणत्या मार्गावर जात आहे, याचे हे बोलके उदाहरण. मात्र, या परिस्थितीमध्येही, स्वतःच्या जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देण्याऐवजी, भारताला शत्रू दाखवून राजकीय लाभ मिळवणेच या देशाच्या नेतृत्वाला महत्त्वाचे वाटते.
या प्रकरणात सर्वांत कळीची भूमिका अमेरिकेची. गेल्या दशकभरात अमेरिकेला स्पष्टपणे उमगले आहे की, भारत कधीच चीनविरोधी युद्धासाठी अमेरिकेच्या भाडोत्री सैनिकाची भूमिका स्वीकारणार नाही. भारताने आपले परराष्ट्र धोरण अमेरिकेच्या हितांपासून स्वतंत्र ठेवले आहे. अमेरिकेने भारताला त्यांच्या ‘इंडो-पॅसिफिक स्ट्रॅटेजी’च्या चौकटीत गुंतवण्याचा प्रयत्न केला खरा, पण भारताने ‘क्वाड’सारख्या मंचांवरही आपली स्वायत्त भूमिका निर्भयपणे मांडली. भारताच्या या भूमिकेमुळे अमेरिकेला चीनविरोधात वेगळे काही करण्याची गरज भासू लागली. बांगलादेशच्या आसपास एखादा लष्करी तळ असल्यास, चीन आणि भारत या दोहोंवर एकाचवेळी दबाव निर्माण करणे शक्य होईल, अशी अमेरिकेची धारणा.
त्यामुळेच अमेरिकेचा बांगलादेश नेतृत्वाला छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. भारतावर दबाव आणण्यासाठी परस्पर नकाशे बदलण्याचे प्रयत्न याआधीही झाले आहेत. नेपाळने २०२० मध्ये लिपुलेख आणि कालापानी आपल्या नकाशात दाखवले, चीनने अरुणाचलवर दावा केला, पाकिस्तानने काश्मीरवर. मात्र, प्रत्यक्षात याने काहीच फरक पडला नाही. कोणत्याही देशाचा भूभाग हा राष्ट्रीय इच्छाशक्तीने आणि सैन्यबलाने सुरक्षित राहतो. सध्या दोन्ही क्षेत्रांत भारत अधिक मजबूत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि अमेरिका यांनी त्याचा प्रत्यय घेतला आहे. त्यामुळे नकाशा बदलण्याचा हा प्रकार म्हणजे स्वतःची भारतविरोधी कंड शमवण्याचाच एक प्रकार आहे आणि बांगलादेश आणि पाकिस्तान हे एकेकाळचे शत्रूदेश एकमेकांना टाळी देत हाच प्रकार करत आहेत. त्यामुळे बांगलादेश या जुन्या खेळातील नवा खेळाडू ठरेल एवढेच!
- कौस्तुभ वीरकर