अवलिया अभिनेते सतीश शहांना मित्रांची अनोखी मानवंदना

28 Oct 2025 16:43:00

मुंबई : हिंदी आणि मराठी सिनेविश्वातले आपल्या विनोदी शैलीने सर्वांना खळखळून हसवणारे अभिनेते सतीश शाह यांचं २५ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. सतीश याचं अकाली जाणं सगळ्यांसाठीच चटका लावून गेलं. ते बऱ्याच दिवसांपासून किडनीसंबंधीत आजाराने ग्रस्त होते. त्यांचे उपचारही सुरु होते, तसेच त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती असंही म्हटलं जात होतं. पण उपचारांदरम्यानचं त्यांचं निधन झालं. सतीश यांच्यावर रविवारी म्हणजे २६ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत एस.व्ही. रोड, विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी त्यांची शोकसभा पार पडली. यावेळी साराभाई वर्सेस साराभाई मालिकेतील त्यांच्या सहकलाकारांनी गाणं गात सतीश यांची विनोदी स्टाईल जपत त्यांना मानवंदना दिली.






View this post on Instagram
















A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)



१९७८ सालापासून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मालिका, नाटक आणि सिनेमा या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली. सतीश शहांनी हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चा ठसा उमटवला. त्यांनी जवळपास २०० हून अधिक चित्रपट केले. तसेच अनेक मालिका केल्या. चित्रपटांप्रमाणेच त्यांनी मालिकांमधूनही लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. ‘सतीश हे साराभाई व्हर्सेस साराभाई’, ‘जाने दो यारों’ आणि ‘मैं हूं ना’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचले.

सतीश हे मूळ गुजराती असले तरीही त्यांची मराठीशी अगदी घट्ट नाळ जोडलेली होती. त्यांचे मराठी सिनेविश्वात अनेक मित्र होते. सतीश यांनी ज्यापद्धतीने हिंदी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली होती त्याचपद्धतीने मराठीतही मोजक्या पण उत्तम भूमिका साकारल्या. त्यांना उत्तम मराठी बोलता येत होतं. सतीश यांनी मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सतीश यांचे दोन गाजलेले मराठी सिनेमे म्हणजे गंमत जंमत आणि वाजवा रे वाजवा. या दोन्ही सिनेमात सतीश शाह झळकले होते. त्यांची भूमिका प्रेक्षकांनाही भावली होती. आजही ती प्रेक्षकांच्या मनात आहे.

‘गंमत जंमत’मध्ये अभिनेते सचिन पिळगावर यांच्या या सिनेमतून सतीश यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात पदार्पण केलं होतं. ‘गंमत जंमत’ सिनेमात विनोदी पोलिस या सिनेमात इन्स्पेक्टर फुटाणेची भूमिका त्यांनी साकारली होती. चित्रपटात मुख्य नायिका म्हणून वर्षा उसगावकर होत्या. तसेच सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ मुख्य भूमिकेत होते. या सिनेमातही त्यांची भूमिका छोटीच होती पण प्रेक्षकांना हसवणारी होती.
तर दुसरा चित्रपट ‘वाजवा रे वाजवा’ या चित्रपटातही त्यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटात अशोक सराफही मुख्य भूमिकेत होते. तर सतीश शाह यांनी या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. बाबूलाल जैन असं त्यांच्या पात्राचे नाव होते.

आजारी असतानाही आपल्या मित्रांशी ते सतत संपर्कात होते. व्हॉट्सअपवरुन ते मित्रांना नेहमी विनोदी चुटकुले पाठवायचे. त्यामुळे विनोद हा त्यांच्यात कायमच होता हे दिसून येतं. साराभाई वर्सेस साराभाई ही त्यांची मालिका प्रचंड गाजली होती. सतीश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मालिकेतल्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. यावेळी सतीश यांना अलविदा करताना कलारांनी गाणं गात त्यांना निरोप दिला.
सतीश शाह यांच्या पश्चात त्यांची पत्नी मधू आहे. सतीश शाह यांनी १९८२ मध्ये फॅशन डिझायनर मधू शाह यांच्याशी लग्न केले. सतीश आणि मधू यांना कोणतेही अपत्य नाही. आयुष्यभर या जोडप्याने एकमेकांना भक्कम साथ दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश यांची पत्नी मधू शाहदेखील आरोग्यसंबधीत समस्यांनी ग्रस्त आहेत. सतीश यांना आपल्या पत्नीची काळजी घ्यायची होती. आणि त्यासाठीच त्यांनी किडनी प्रत्यारोपनसुद्धा केले होते. पण काळापुढे ते काहीच करु शकले नाहीत. अशा अष्टपैलू अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.


Powered By Sangraha 9.0