एखाद्या वन्यप्राण्याची भीती आपण वाटण्याचे मुख्य कारण हे त्याची पूर्णपणे माहिती नसणे यामध्ये आहे. जेवढ त्याच्या जवळ जातो, तेवढे त्याचे विश्व कळायला लागते, त्याच्या मनोभूमिका कळायला लागतात आणि त्याचा उमदा स्वभाव समजू लागला की मग भीतीची जागा आदर घेतो. बिबट्याचही तसेच झाले आहे. त्याच बिबट्याविषयी आणि रत्नागिरीतील ‘बिबट्या मित्र’ चळवळीविषयी माहिती देणारा हा लेख...
रत्नागिरी जिल्ह्यात माणूस आणि निसर्गाची सीमा दिवसेंदिवस पुसट होत चालली आहे. धुक्याने वेढलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांत, विस्तृत माळरानांमध्ये आता गावकऱ्यांना सकाळच्या वेळेस शेतात बिबट्यांचे ठसे, गायब झालेली जनावरे आणि मानवी वस्तीत वावरणारा बिबट्या असे अनेक अनुभव येऊ लागले आहेत. विहिरीत पडलेल्या बिबट्यांच्या थरारक बचावमोहिमा असोत किंवा गावाच्या बाथरूममध्ये शिरलेल्या पिल्लांची दुमळ दृश्ये, रत्नागिरीत या संघर्षाने उच्च सीमा गाठली आहे. मानव-वन्यजीव संघर्षाचा हा लढा केवळ काही वेगळ्या घटनांचा संग्रह न राहता, समकालीन संघर्ष बनला आहे. परंपरा, जगण्याचा संघर्ष आणि निसर्गाच्या बदलत्या सीमारेषांची ही अनोखी सांगड आहे.
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात चार वर्षांत येथे या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, वनविभाग व स्थानिक वृत्तपत्रांनुसार 2024-25 मध्ये 350च्या आसपास पशुधनावरील हल्ल्यांच्या नोंदी झाल्या आहेत; ज्यांमुळे गावकऱ्यांना मानसिक व आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. केवळ रत्नागिरी विभागात पशुधन नुकसान भरपाईसाठी जवळजवळ 50 लाख रुपये एका वर्षात दिले गेले; तर संपूर्ण जिल्ह्यात बिबट्या व इतर वन्यजीव हल्ल्यांतील जखमी व मृत्यूंसाठी मागील चार वर्षांत जवळपास एक कोटी रुपयांपर्यंत भरपाई देण्यात आली आहे. यामुळे स्थानिक व सरकारी संसाधनांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

सततची जंगलतोड, खासगी जमिनीत झाडांची नासधूस, शेतीसाठी होणारी अतिक्रमणे आणि अधिवासाचे विघटन यांमुळे जैविक अधिवास आणि बिबट्यांचे पारंपरिक मार्गसुद्धा नष्ट झाले आहेत. परिणामी, बिबट्यांना शेतात, गावात जावे लागते; साखर ऊस, फळबागा आणि भाजीपाला यांच्या शिवारांमध्ये बिबट्यांचे नियमित दिसणे, रात्रीच्या वेळी शिकार करताना विहिरीत पडण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. एखाद्या भागातून पिंजरे लावून पकडून नेलेला बिबट्या हा त्या भागातील संघर्षाचा अंत नसून तिथून नवा संघर्ष सुरू होतो, याची जाणीव लोकांना करून देणे गरजेचे आहे.
2005 नंतर फक्त रत्नागिरीत 32 बिबटे वनविभागाने ‘रेस्क्यू’ केल्याची नोंद आहे. त्यातील 50 टक्के बिबटे हे विविध मानवनिर्मित कारणांमुळे मृत झाले आहेत. त्यात मुख्यतः रस्तेअपघात, उघड्या विहिरीत पडणे, फासकीत अडकणे अशी कारणे मुख्य आहेत. सरकारने पशुधन, पिके आणि जखमींच्या दाव्यांसाठी भरपाई वाढवली आहे. नव्या योजनांनुसार मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 25 लाख रुपये दिले जातात, तर जखमींना वाढीव भरपाई मिळते. परंतु, प्रतिशोधात्मक कृतींमुळे बिबट्यांच्या अस्तित्वाला आणखी धोका निर्माण होत आहे. या संघर्षाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’, स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि वनविभागच्या मदतीने ‘बिबट्या मित्र’ अभियान राबवत आहे. त्यात मुख्यतः GIS आधारित प्रणालीचा वापर करून जास्त हल्ले होणारे ‘हॉटस्पॉट नकाशे’ तयार करणे, कॅमेरा ट्रॅप लावून हालचालींचे निरीक्षण करणे, त्यातून शास्त्रीय माहिती गोळा करणे, लोकसहभाग वाढवून सामूहिक शिक्षण आणि बिबट्याचा संघर्ष टाळण्यासाठी प्रशिक्षण आणि नुकसानीची त्वरित भरपाई या त्रिसूत्रीतून सहजीवनाचा मंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न हे अभियान करत आहे.संघर्षाच्या मूळ कारणांवर उपाययोजना व स्थानिक लोकांना सक्षम करणे, याद्वारे बिबट्या आणि माणूस यांच्या ग्रामीण परिसंस्थेत समरसता साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

GIS अधिवास मॅपिंग
प्रगत स्पॅटियल विलेषण साधने, सॅटेलाईट प्रतिमा आणि प्रत्यक्ष सर्वेक्षण यांचा एकत्रित वापर करून जंगल, वस्ती, बफर झोन आणि वन्यजीव कॉरिडॉर यांचे बारकाईने मॅपिंग केले जाते. त्यामुळे हरित कॉरिडॉर डिझाईन आणि जोखमीच्या ठिकाणी त्वरित हस्तक्षेप सुलभ होतो.
ट्रेल कॅमेरा सर्व्हिलन्स नेटवर्क
मोशन-सेन्सर ट्रेल कॅमेरे 50 चौ.किमी संघर्षप्रवण क्षेत्रांमध्ये लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे बिबट्यांच्या हालचालींचे सतत निरीक्षण करतात. त्यामुळे बिबट्यांच्या हालचालींचे मार्ग आणि वेळ ओळखता येते. यामुळे धोका असलेल्या भागांत सौरदिवे, फेन्सिंग आणि बिबट्याच्या फिरस्तीचे वेळापत्रक बनवून त्या काळात मानवी हालचाली टाळणे सुलभ करता येते.
तत्काळ इशारा आणि प्रतिसाद प्रणाली
कॅमेरा डेटासह एकत्रित करण्यात आलेली माहिती समाजमाध्यमांच्या वापरातून गावकऱ्यांना आणि बचावपथकांना त्वरित इशारा देते; जेणेकरून अचानक घडणाऱ्या घटनांचा धोका कमी करता येईल. बिबट्या वावर क्षेत्रामध्ये विशेष काळजी घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करता येईल.
‘बिबट्या मित्र’ चळवळ
‘बिबट्या मित्र’ हा रत्नागिरी जिल्ह्यात मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी राबवला जाणारा एक महत्त्वाचा सामाजिक आणि संरक्षणात्मक उपक्रम आहे. या अभियानातून स्थानिक गावकऱ्यांना निवडून विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांना ‘बिबट्या मित्र’ म्हणून ओळखले जाईल. हे ‘बिबट्या मित्र’ गावात बिबट्याच्या हालचाली, हल्ले किंवा घटनांची नियमित नोंद करू शकतील. फोटो, साक्षी, निवेदन गोळा करतील आणि वनविभागाला भरपाईसाठी त्वरित माहिती पोहोचवतील आणि जनता व वनविभाग यांच्यातील दुवा बनतील.
समुदाय सहभाग आणि शिक्षण
गावकरी ‘बिबट्या मित्र’ म्हणून प्रशिक्षित केले जात आहेत. हे मित्र घटनानोंदी करतील, प्रशासन आणि लोकांमधील संवाद सुलभ करतील. शाळांमधील घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांतून चित्रफीत, नाटके, सादरीकरण यांद्वारे वन्यजीव चर्चा सुरू होऊन भयाचे रूपांतर आदरात आणि पुढची पिढी संवर्धनासाठी सक्षम करण्यासाठी याची मदत होईल.
घटना नोंदणी आणि भरपाई
प्रत्येक हल्ला किंवा प्रेडेशन ‘बिबट्या मित्र’ स्वयंसेवक व वनअधिकाऱ्यांकडून ठराविक फॉर्म व छायाचित्र पुराव्यावर आधारित नोंदवला जाईल. ठसे किंवा कॅमेरा फूटेजद्वारे नुकसान व बिबट्याचा संलग्नता पडताळणी करून पीडित कुटुंबांना जलद व योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच दुर्गम भागामध्ये मोबाईल, इंटरनेट अशा सुविधा नसल्यामुळे हल्ल्याच्या आणि नुकसान भरपाईच्या नोंदी वेळेत न झाल्यामुळे भरपाई न मिळून संघर्ष वाढतो. अशा ठिकाणी ‘बिबट्या मित्र’ नेटवर्क उपयोगी पडू शकेल. वनविभागाकडे असणाऱ्या मानवी संसाधनाची कमतरता भरून येण्यासाठी ‘बिबट्या मित्र’ हे स्वयंसेवक उपयुक्त ठरतील.
इतर प्रमुख वैशिष्ट्ये
जास्त धोकाग्रस्त गावांत टॉर्च, सौर दिवे अशी संरक्षणात्मक संसाधने व पशु हानी टाळण्यासाठी फेन्सिंगच्या किट्सचे वितरण करून जे रात्रीच्या वेळी सुरक्षा करू शकेल. रत्नागिरीच्या जंगलात आणि गावात आता भीतीतून निर्माण झालेली बिबट्याची ओळख हळूहळू एका जाणिवेत रूपांतरित होत आहे. एकीकडे जंगल कमी झाले, तर दुसरीकडे माणसाची उपस्थिती वाढली आणि या दोहोंत हरवलेला बिबट्या आता पुन्हा दिसू लागला आहे. त्याची उपस्थिती म्हणजे केवळ धोका नव्हे, एक चेतावणी आहे की आपण संतुलन विसरलो आहोत. त्यामुळे संघर्षाला उत्तर देताना सहजीवन हीच पुढची दिशा आहे. जेव्हा गावकरी, संशोधक आणि वनविभाग एकत्र येऊन त्याच्याकडे भीतीच्या नव्हे, तर समजुतीच्या नजरेतून पाहतील, तेव्हाच हा चक्रव्यूह तुटेल ‘बिबट्या शत्रू’ नाही, तो या भूमीच्या निसर्गाचा अविभाज्य भाग आहे, मूल निवासी आहे, राखणदार आहे. त्याच्यासह जगायला शिकणं हीच खरी मानवी संस्कृती आहे.
- प्रतीक मोरे
(लेखक देवरुखच्या ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चे कार्यकारी संचालक आहेत.)
7798233243