मुंबई : (Shreyas Iyer Injured) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बॅकवर्ड पॉइंटवरून मागे धावत झेल घेत असताना भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर गंभीर जखमी झाला आहे. बरगड्यांच्या दुखापतीमुळे झालेल्या अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्याला उपचारासाठी सिडनी येथील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
दुखापत कशी झाली?
श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक-फलंदाज ॲलेक्स कॅरीचा जबरदस्त झेल घेत त्याला बाद केले. मात्र, बॅकवर्ड पॉइंटवरून मागे धावताना झेल घेतल्यानंतर तो मैदानावरच जोरात कोसळला. डाव्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्याला तत्काळ सिडनीच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अय्यरवर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्याच्या तब्येतीमधील सुधारणेनुसार, त्याला २ ते ७ दिवसांपर्यंत ऑब्झर्वेशनखाली ठेवण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.
BCCIकडून श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत अपडेट
BCCIने श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत अपडेट देताना म्हटले की, "श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत २५ ऑक्टोबर २०२५ ला झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान डाव्या बरगडीच्या खालच्या भागावर धक्का बसून दुखापत झाली. तपासणीसाठी त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. स्कॅनमध्ये त्याच्या धमनीला (spleen) किरकोळ जखम झाल्याचे आढळून आले आहे. सध्या तो वैद्यकीय देखरेखीखाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे आणि तो हळूहळू सुधारणा होत आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमकडून, सिडनी व भारतातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने, त्याच्या दुखापतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. भारतीय संघाचे डॉक्टर सध्या सिडनीमध्येच राहून श्रेयसच्या रोजच्या रिकव्हरीचा आढावा घेणार आहे."
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी श्रेयस अय्यरला भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावत चांगली कामगिरी केली. तथापि, श्रेयस अय्यरची सध्याची प्रकृती पाहता पुन्हा क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.