मराठी अभिनेत्याने गळफास घेत संपवलं जीवन

    27-Oct-2025
Total Views |

मुंबई : गेले काही दिवस सातत्याने सिनेविश्वातून वाईट बातम्या समोर येत आहेत. मागच्या महिन्यात अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. त्यानंतर अभिनेत्री संध्या, बॉलिवूड अभिनेते गोवर्धन असरानी, सतीश शाह यांचंही निधन झालं. तर आता आणखी एका नवोदीत मराठी अभिनेत्याने आपलं जीवन संपवलं आहे. अभिनेता सचिन चांदवडेने आत्महत्या केली आहे. वयाच्या २५व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. सचिनने एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. लवकरच सचिनचा चित्रपट देखील प्रदर्शित होणार होता.

सचिन चांदवडेचा आगामी सिनेमा ‘असुरवन’ हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. परंतु सिनेमाचे प्रदर्शन तोंडावर असताना सचिनने स्वतःचे जीवन संपवले आहे. त्याच्या अचानक जाण्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. सचिनने २३ ऑक्टोबर रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी पुढे नेण्यास सांगितले. त्यानंतर धुळे येथील रुग्णालयात सचिनवर उपचार सुरु होते. मात्र, २४ ऑक्टोबर रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान सचिनचा मृत्यू झाला. सचिन हा मुळचा जळगाव जिल्ह्यातील परळाचा रहिवासी होता.

पेशाने सचिन हा सॉफ्टवेअर इंजिनीअर होता. पुण्यातील आयटी पार्कमध्ये काम करत असताना त्याने अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मृत्यूच्या काही दिवस आधीच, सचिनने सोशल मीडियावर आपल्या अपकमिंग मराठी चित्रपट ‘असुरवन’चे पोस्टर शेअर केले होते. सचिन रामचंद्र अंबट दिग्दर्शित या चित्रपटात पूजा मोइली आणि अनुज ठाकरे यांच्यासोबत सचिन मुख्य भूमिकेत आहे.

सचिनने ‘जम्तारा २’ या नेटफ्लिक्स क्राईम सीरिजमध्ये काम केले आहे. या सीरिजने त्याला ओळख मिळवून दिली. या प्रकरणी परळा पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’चा गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही. कुटुंबीय आणि ‘असुरवन’च्या निर्मात्यांनी अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. सचिनच्या अकाली निधनाने सिनेविश्वातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.