भारताच्या अवकाश स्वप्नांचा शिल्पकार...

27 Oct 2025 12:00:26

Dr. Eknath Vasant Chitnis
 
आज ‘इस्रो’च्या अनेक पराक्रमांची चर्चा जगभरात होते. त्यांच्या अनेक मोहिमा जगाला नवा पाठ शिकवणार्‍या असतात. याचे श्रेय देशाकडे अल्पधन असतानाही अवकाश क्षेत्रात भरारी घेण्याचे स्वप्न पाहणार्‍या धुरिणांना जाते. डॉ. एकनाथ वसंत चिटणीस हे त्यापैकीच एक! वयाची शंभरी पार करणार्‍या या ध्येयवेड्या देशप्रेमी शास्त्रज्ञानाचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा...
 
शतकपूर्ती करणारी माणसं क्वचित दिसतात आणि त्यात आयुष्यभर देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत असणारी माणसं त्याहूनच विरळ. विज्ञान देशाला प्रगतिपथावर नेतं आणि जगाला त्यासाठी झटणार्‍या व्यक्तींची आणि त्यांच्या कामाची नोंद घ्यावीच लागते. ‘इस्रो’सारख्या संस्थेत महत्त्वाचा सहभाग असणारे ‘पद्मभूषण’ डॉ. एकनाथ चिटणीस हे त्यांपैकीच एक. ‘इस्रो’ आणि डॉ. चिटणीस यांचे अतूट नाते. डॉ. विक्रम साराभाई यांच्यासह भारतीय अवकाश कार्यक्रमाची सुरुवात करणार्‍या पहिल्या काही शास्त्रज्ञांमध्ये. डॉ. चिटणीस यांची गणना करता येईल. भारतातील पहिला दूरसंचार उपग्रह ‘इन्सॅट’, कम्युनिकेशन सटेलाईट, दूरदर्शन आणण्यासाठी केलेला साईट प्रयोग, थुंबा आणि श्रीहरीकोटा या दोन्ही रॉकेट प्रक्षेपण केंद्रांच्या जागेची निवड करण्यात. त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. ‘स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर’चे संचालक आणि पी. टी. आय.चे अध्यक्ष ही पदेही त्यांनी भूषविली.
 
कोल्हापूरमध्ये दि. २५ जुलै १९२५ रोजी जन्मलेल्या एकनाथ चिटणीस यांची कर्तृत्व भरारी गगनाला गवसणी घालणारीच होती, पण भारताच्या वैज्ञानिक उत्कर्षामध्येही त्यांनी महत्त्वाचा अध्याय लिहिला म्हणणे, अधिक सयुक्तिक ठरेल. १९५२ साली पुणे विद्यापीठातून ‘एमएससी फिजिस (इलेट्रॉनिस)’ विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या चिटणीसांची, ‘यूपीएससी’मधून निवड होऊन ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये ५०० रुपयांची नोकरीची ऑफर मिळाली. पण काही माणसं आपण काहीतरी वेगळे आणि उत्तम करावे, या ध्येयाने पछाडलेली असतात. त्यांच्या रक्तातच एक वेड असतं. ही वेडी माणसंच त्या त्या क्षेत्रात आर्थिक त्रैराशिकं न मांडता, क्रांती घडवून आणतात. चिटणीसांनीही ती ५०० रुपयांची हाती सहज आलेली नोकरी सोडून, १०० रुपये शिष्यवृत्ती देणार्‍या त्यावेळच्या ‘हॉट टॉपिक’ असणार्‍या ‘कॉस्मिक रे’वरील संशोधनाला प्राधान्य दिलं आणि डॉ. विक्रम साराभाई यांच्यासोबत, ‘फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी’मध्ये (पी. आर. एल. अहमदाबाद) काम करायचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षी तर ते १०० रुपये मिळणंही शय नव्हतं, म्हणून महाविद्यालयांमध्ये अध्यापन केले. १९५२ सालची ही गोष्ट, त्यावेळी विक्रम साराभाई यांच्याबरोबर अनेक शास्त्रज्ञ ‘कॉस्मिक रेज’वर काम करीत होते. प्रचंड वेगात हे किरण येतात कुठून आणि कसे, हे शोधण्यात ते मग्न होते.
 
१९४५ साली ऑर्थर लार्क यांनी वर्ल्ड वाईड कम्युनिकेशन कसे शय होईल, यावर एक पेपर लिहिला होता. साधे पुणे ते दिल्ली एवढ्या अंतरासाठीही दर ५० ते ७० किमी अंतरावर रिले बसवावे लागतात. पण सॅटेलाईट ३६ हजार किमी उंचीवर असतानाही पृथ्वीचा एक तृतीयांश भाग पाहू शकतो, असे फक्त तीन सॅटेलाईट अवकाशात सोडले, तर पूर्ण जगाशी कम्युनिकेशन शय होईल. १९४५ साली मांडलेली कल्पना. १२ वर्षांनंतर दि. ४ ऑटोबर १९५७ रोजी रशियाने ‘स्फुटनिक’ नावाचा सॅटेलाईट पाठवला, पण तो कम्युनिकेशन सॅटेलाईट नव्हता. १९५२ साली अमेरिकेने सॅटेलाईट कम्युनिकेशन सुरू केले; पण ‘डायरेट रिसेप्शन’ ही कल्पना भारताने सर्वप्रथम कार्यरत केली. अमेरिकन नेव्हीचा सोलर एस रे सॅटेलाईट, गॅमा रे अ‍ॅस्ट्रॉनामी सॅटेलाईट जो डाटा गोळा करायचे, तो मॉनिटर करून निष्कर्ष काढायचे काम भारत करत होता.
 
अहमदाबादमधील ‘एम. जी. सायन्स इन्स्टिट्यूट’च्या चार-पाच खोल्यांमध्ये, पी. आर. एल.ने आपले काम चालू केले. पुढे पी. आर. एल.ची स्वतंत्र दोन मजली इमारत होऊन, १९६० साली सॅटेलाईट टेलिमेट्री स्टेशन सुरू झाले. भारताला साऊंडिंग रॉकेट्स देऊन अमेरिका, रशिया, फ्रान्ससारख्या देशांनी मदत केली. पण त्यासाठी तळ उभा करणे आवश्यक होते. १९६२ साली ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ची स्थापन झाली. तिथे डॉ. विक्रम साराभाई चेअरमन, तर डॉ. चिटणीस हे मेंबर सेक्रेटरी होते. डॉ. रामनाथन यांचाही सहभाग होता. (डॉ. सी. व्ही. रामन यांचे शिष्य आणि माझे मामा खगोलभौतिक शास्त्रज्ञ डॉ. पी. व्ही. कुलकर्णी पी. आर. एल. अहमदाबाद यांचे हे दादागुरू)
 
पी. आर. एल.मधील शास्त्रज्ञांच्या पुढाकाराने अनेक ग्राऊंड बेस प्रयोग सुरू केले; कारण त्याचा नवीन असलेल्या स्पेस टेनोलॉजीला उपयोग होणार आहे आणि त्याचमुळे आपले संशोधनकार्य पुढे जाणार आहे, याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच सॅटेलाईट स्टेशन स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. तारे किंवा सूर्यापासून जसे एस रे येतात, तसे ‘गॅमा रेज’ही येतात. त्यांचा शोध घेण्यासाठी अमेरिकेने सॅटेलाईट पाठवला होता. अमेरिका भारताच्या विरुद्ध ठिकाणी असल्याने जेव्हा अमेरिकेत दिवस असेल, तेव्हा भारतात रात्र असणार. त्यामुळेच भारतात जर सॅटेलाईट स्टेशन तयार केले, तर स्वतः सॅटेलाईट पाठवण्याचा खर्च न करताही त्यावर अभ्यास करता येईल, यासाठी बाहेरचे देशही मदत करतील. अवकाश विज्ञानावर काम करणारे परदेशी वैज्ञानिक तिथे येतील आणि कामाचा आवाका वाढेल, ही दूरदृष्टी ठेवूनच डॉ. विक्रम साराभाई, डॉ. चिटणीस आणि चमुने त्यासाठी जागा शोधली.
 
सोलार सायकल ११ वर्षांची असते. सन १९६२ ते १९६४ या काळात खटडध-खपींशीपरींळेपरश्र र्टीळींश र्डीप धशरी म्हणजे, सूर्यामुळे कामात येणारे अडथळे खूप कमी प्रमाणात येणारा हा काळ. या काळात संशोधन करून रशिया, फ्रान्स अमेरिकेची मदत मिळवली. तसेच पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याकडूनही पाठबळ मिळवले. पुढे इंदिरा गांधींनीही या कामात मदत केली. डॉ. चिटणीस यांनी ’चखढ’ बरोबरच्या संयुक्त प्रकल्पात, कोडाईकनाल इथे दोन वर्षे काम केल्याने ’चखढ’ मध्ये त्यांना खास निमंत्रण मिळाले आणि पुढील तीन वर्षे तिथेही डॉ. चिटणीस यांनी काम केले. पण पुढे डॉ. विक्रम साराभाई यांनी विचारल्यामुळे, ते १९६१ साली परत भारतात आले. जेव्हा अमेरिकन मित्रांना त्यांनी ‘स्पेस रिसर्चसाठी चाललो,’ असे सांगितले, तेव्हा ‘ज्या देशात खाण्यासाठी पुरेसे अन्न नाही, त्या देशाला या क्षेत्रात काम करून काय उपयोग,’ अशी विचारणा झाली. पण ‘आमचे काम हे अमेरिकेच्या उद्देशाहून वेगळे असेल, देशहितासाठी असेल. हिंदुस्थानाच्या प्रगतीसाठी असेल,’ असे ठामपणे उत्तर त्यांनी दिले.
 
१९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि पुढे १५ वर्षांनी जेव्हा १९६२ साली चीनने भारतावर हल्ला केला, तेव्हा तीन महिन्यानंतरही अवघ्या २०-२५ टक्के लोकांनाच युद्ध सुरू झाल्याचे समजले होते. इतर ७५-८० टक्के लोक, संपर्क अभावामुळे याबाबत अनभिज्ञच होते. यावरून या संपर्कसाधनांची आवश्यकता किती मोठ्या प्रमाणात होती, याची कल्पना येईल. सॅटेलाईट टीव्हीमुळे हा कम्युनिकेशन गॅप भरून काढता येईल, असा विचार डॉ. चिटणीस आणि टीमने मांडला. तो पंतप्रधान नेहरू यांना पटवून देण्यासाठी, दिल्लीच्या ८० खेड्यांत ‘कृषिदर्शन’ हा कार्यक्रम दाखवण्यात आला आणि त्यात मिळालेले यश पाहून, मध्यमवर्गीय लोकांसाठी फक्त करमणुकीचे साधन म्हणून वापरायला टीव्हीची काय आवश्यकता? हा विचार बदलण्यास मदत झाली. मग आपोआपच सरकारकडून आर्थिक पाठबळही मिळाले.
 
भारतात ’अर्थ स्टेशन’ तयार झाले, त्याला युएनडीपीकडून एक दशलक्ष डॉलर्सची ग्रँटही मिळाली. इतर विकसनशील देशांनाही, याबाबत प्रशिक्षण देण्याचे आश्वासनही भारताने दिले आणि समाजात उत्क्रांती होत गेली. समुद्र, मायक्रोवेव्ज यांसारखे अडथळे दूर करून जर आपले कम्युनिकेशन सॅटेलाईट बेस्ड केले तर कसे फायदेशीर ठरेल, हे इंदिरा गांधींना पटवून देण्यात यश आले. आज हव्या त्या ठिकाणी आपल्याला नेटद्वारे पोहोचता येते. ही खरंच फार मोठी उत्क्रांती घडवून आणली. ‘इस्रो’च्या जडणघडणीत डॉ. चिटणीस यांचा सहभागही उल्लेखनीयच असाच. आज जगाच्या नकाशावर भारताला अवकाश विज्ञानात विशेष स्थान आहे. भारताने चांद्रयान पाठवलेच, पण जे अमेरिका, फ्रान्स, रशिया, जपान यांसारख्या देशांना जमले नाही ते मंगळयानही पहिल्याच प्रयत्नात पाठवून, भारताने आपली प्रगतीही सिद्ध केली. भारताने दि. ५ नोव्हेंबर २०१३ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळकेंद्रावरून मंगळयान पाठवले होते. तत्कालीन अभियंता (आणि नंतर भारताचे सन्माननीय राष्ट्रपती) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या निवडप्रक्रियेत आणि त्यांच्या मार्गदर्शनातही डॉ. चिटणीस यांचा मोलाचा सहभाग होता. अत्यंत हुशार अशा या व्यक्तीमधील असामान्य प्रतिभेला ओळखून, डॉ. चिटणीस यांनीच डॉ. विक्रम साराभाई यांना निवड करण्याचा सल्ला दिला होता.
 
झठङची एक परंपरा आहे. ज्यावेळी एखादा वैज्ञानिक निवृत्त होतो, तेव्हा शेवटच्या दिवशी त्यांच्या सन्मानार्थ एका दिवसाची लेपषशीशपलश ठेवली जाते. त्या वैज्ञानिकाने केलेल्या कामाबद्दल आणि त्या क्षेत्रातील इतर प्रगतीबद्दल चर्चा होते, मग त्या वैज्ञानिकास त्यांच्या शोधनिबंध आणि इतर कामाचे एक पुस्तकच बनवून भेट दिले जाते. डॉ. चिटणीस यांनी दि. २५ जुलैला शंभरी पार केली, तेव्हाही दि. २६ जुलैला त्यांच्या सन्मानार्थ एक दिवसाचा असाच शैक्षणिक कार्यक्रम पुण्यात आयोजित केला होता. ‘आयुका’, ‘इस्रो’, पी. आर. एल. अहमदाबाद, पुणे मुंबई अशा विविध ठिकाणांहून दिग्गज आले होते. माझे भाग्य असे की, माझे मामा डॉ. प्रभाकर वासुदेव कुलकर्णी हे सुद्धा पी. आर. एल.मध्ये इन्फ्रारेड लॅबोरेटरी सुरू करण्यात अग्रगण्य होते. त्यांच्या ‘अ‍ॅरो ऑफ माय टाईम’ या आत्मचरित्राचा भावानुवाद ‘माझ्या कालशराचा प्रवास’ या नावाने नुकताच प्रकाशित झाला; तो भावानुवाद मी केल्याने, त्यासंदर्भात पी. आर. एल. ‘इस्रो’, ‘आयुका’मधील काहीजणांचा उत्तम परिचय झाला. त्यामुळे हा कार्यक्रमही मला ऑनलाईन पाहता आला, हे खरोखरच परमभाग्य.
 
क्षेत्र वेगळे असले, तरीही आपला संशोधनाचा वारसा मुलाकडे देऊन, डॉ. चिटणीस वडील म्हणूनही यशस्वी झाले. डॉ. चेतन चिटणीस या त्यांच्या सुपुत्रासही याचवर्षी त्यांच्या मलेरियावरील संशोधनाबद्दल ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन, सन्मानित करण्यात आले आहे. पॅरिसच्या ‘पाश्चर इन्स्टिट्यूट’मध्ये मलेरिया पॅरासाईट बायोलॉजी आणि वॅसिन युनिटचे प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. डॉ. एकनाथ चिटणीस असामान्य आयुष्य जगले आणि सुवर्णाक्षरांनी आपले नाव भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात कोरले. आपल्या कर्तृत्वामुळे अशा व्यक्ती अमरच होतात. त्यांच्याप्रमाणेच प्रामाणिकपणे सन्मार्गावरून चालत आपापल्या क्षेत्रांत सतत कार्यरत राहणे आणि देशकल्याणाबरोबरच मानवकल्याणासाठी प्रयत्नशील राहणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
डॉ.संगीता गोडबोले

(लेखिका बालरोगतज्ज्ञ, गीतकार, कवयित्री आहेत.)
९८२०३५४७३४
Powered By Sangraha 9.0