नावीन्याचा शिल्पकार

27 Oct 2025 13:09:59

तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि नेतृत्व या तिन्ही क्षेत्रांचा संगम साधत, तीन दशकांहून अधिक काळ उद्योगविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे गजानन प्रल्हाद नलगे यांच्याविषयी...

उद्योगजगतामध्ये काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांची कारकीर्द म्हणजेएक प्रेरणादायी प्रवास. गजानन नलगे हे असेच एक नाव. त्यांनी तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि नेतृत्व या तिन्ही क्षेत्रांचा संगम साधत, तीन दशकांहून अधिक काळ उद्योगविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी जगातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नेतृत्वाची भूमिका पार पाडली.

मूळचे साताऱ्याचे असणारे गजानन नलगे यांचे शालेय शिक्षण मात्र दादर येथे पूर्ण झाले. गजानन यांचे वडील भारतीय रेल्वे सेवेत असल्यामुळे दादर येथील स्टाफ क्वार्टरमध्येच त्यांचे वास्तव्य. गजानन यांनी रुईया महाविद्यालयातून विज्ञान शाखेत अकरावी-बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर, पुढे व्ही. जे. टी. आयमधून, 1984 मध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवीही प्राप्त केली. 2000 मध्ये ‌‘सीमेन्स‌’ कंपनीच्या प्रायोजकत्वाखाली, बंगळुरु येथील आय. आय. एम.मधून व्यवस्थापन विषयाचे शिक्षण घेतले. या शिक्षणाचा त्यांना पुढे आयुष्यात अनेक ठिकाणी उपयोग झाला.

अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण होताच, कॅम्पस मुलाखतीतून त्यांनी ‌‘सीमेन्स‌’ या बहुराष्ट्रीय कंपनीत प्रशिक्षणाथ अभियंता म्हणून करिअरची सुरुवात केली. पुढील 22 वर्षांच्या काळात त्यांनी रिजनल हेड पदापर्यंत मजल मारली. त्यानंतर त्यांनी ‌‘अरेवा टी ॲण्ड डी‌’ या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये इंडस्ट्री सेगमेंट हेड म्हणून, तर जनरल केबल कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट-मार्केटिंग म्हणून भूमिका बजावली. पुढे ‌‘केबल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया‌’मध्ये, वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष, तसेच केईसी इंटरनॅशनलमध्ये आंतरराष्ट्रीय व्यवसायप्रमुख म्हणूनही नेतृत्व केले. यादरम्यानच त्यांनी मध्य पूर्व, आशिया आणि युरोप या भागांतील मोठ्या वीजप्रकल्पांवरही प्रत्यक्ष काम केले आहे. नलगे यांच्याच नेतृत्वाखाली केईसी इंटरनॅशनलने सौदी अरेबिया, कतार, कुवेत, यूएई आणि सिंगापूरसारख्या देशांमध्ये, उच्चदाब वीजवाहिनी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले.

इतकेच नाही, तर गजानन यांना भारतातील केबल उद्योगातील ‌‘टर्नअराऊंड स्पेशालिस्ट‌’ म्हणून ओळखले जाते. 2011 मध्ये त्यांनी ‌‘केबल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया‌’ला तोट्याच्या गर्तेतून बाहेर काढले आणि केवळ एका वर्षातच कंपनीला नफ्यातही नेले. ‌‘फिनोलेक्स जे-पॉवर सिस्टम्स प्रा.लि.‌’ या जपानी संयुक्त उपक्रमाचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. कंपनी सलग सहा वर्षे तोट्यात होती; परंतु नलगे यांनी फक्त दीड वर्षातच तिला पुन्हा नफ्यात आणले. प्रशिक्षणाथ अभियंता ते यशस्वी मुख्य कार्यकारी अधिकारी असे आपल्या करिअरचे एक मोठे वर्तुळ त्यांनी पूर्ण केले आहे.

याकाळात त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक बळकट होत गेला. वर्ष 2019 मध्ये गजानन यांनी स्वतःची कंपनी ‌‘एनजकॉन‌’ची स्थापन केली. ही कंपनी भारतातील उच्च दाब केबल आणि मेट्रो प्रकल्पांसाठी केबल सोल्युशन्स पुरवते. ‌‘एनजकॉन‌’ने जागतिक दर्जाच्या कंपन्या ‌’फेल्प्स डॉज इंटरनॅशनल ‌’आणि ‌’प्रिस्मियन ग्रुप‌’ यांच्यासोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. आज ही कंपनी ‌‘एल ॲण्ड टी‌’, ‌‘सीमेन्स‌’, ‌‘अल्स्टॉम‌’, ‌‘हिताची एनज‌’ तसेच, राज्य वीज मंडळे ‌‘एमएसईटीसीएल‌’, ‌‘टीएनईबी‌’, ‌‘आरव्हीपीएनएल‌’ अशा मोठ्या ग्राहकांना सेवा पुरवते. ‌‘एनजकॉन‌’चे ध्येय म्हणजे विश्वास, गुणवत्तेची हमी आणि ऊर्जा क्षेत्रात उत्कृष्टतेचा सातत्यपूर्ण शोध!

गजानन हे ‌‘इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स‌’ आणि ‌‘इन्स्टिट्यूशन ऑफ व्हॅल्युअर्स‌’ चे मानद फेलो सदस्य आहेत. ते सरकारमान्य प्लांट आणि मशिनरी व्हॅल्यूअर असून, अनेक औद्योगिक प्रकल्पांना मार्गदर्शन करतात कामाच्या व्यतिरिक्त ते फिटनेसप्रेमीही आहेत. त्यांनी आजवर सात अर्ध-मॅरेथॉन (21 किमी) पूर्ण केल्या आहेत.

सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी ‌‘आदित्य आरोग्य मंगलम ट्रस्ट‌’ची स्थापना केली. गजानन यांच्या पत्नी डॉ. नीलम यांचीही या संपूर्ण प्रवासात गजानन यांना मोलाची साथ लाभली. गरजू रुग्णांना मदत करण्यात आणि त्यांच्यावर योग्य उपचार व्हावे, यासाठी नलगे दाम्पत्य सर्वतोपरि सहकार्य करतात. नलगे त्यांच्या या संस्थेद्वारे ‌‘पाणी फाऊंडेशन‌’, तसेच ग्रामीण भागातील शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम यांना नियमित मदत केली जाते. आज गजाजन ‌’स्वतंत्र संचालक‌’ या पदासाठी ‌’मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स‌’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तयारी करत आहेत. तसेच शेअर मार्केटमध्येही रस असल्याने, त्याविषयाकडेही अत्यंत बारकाईने त्यांचे लक्ष असते. गजानन म्हणतात की, “जीवनात यश हे अनुभवातूनच मिळते. नेतृत्व हे प्रभावी निर्णयक्षमतेतून आपली छाप पाडते. तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःमध्ये सुधारणा करण्याची तयारी ठेवत असाल, तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. उलट समोरून लोक तुमच्या कार्याची दाखल घेऊन तुमच्याकडे येतात. ‌‘वर्ल्ड इज अपॉर्च्युनिटी.” कधीकधी एखाद्या व्यक्तीचा प्रवास हा केवळ यशोगाथा नसतो, तर तो अनेकांना नवजीवन देणारा अध्याय ठरतो. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात आपला मोलाचा सहभाग देणाऱ्या गजानन नलगे यांना, भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’च्या अनेकानेक शुभेच्छा!

Powered By Sangraha 9.0