मुंबई (अक्षय मांडवकर) - संशोधकांनी उजनी जलाशयामधून गोड्या पाण्यातील माशांच्या ५६ प्रजातींची नोंद करतानाच ब्रम्हपुत्रा आणि गंगा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या मत्स्यप्रजाती देखील प्रथमच उजनीतून नोंदविण्यात आल्या आहेत (Ujani reservoir). यानिमित्ताने उजनीच्या मत्स्यवैविध्याचा दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा वैज्ञानिक अभ्यास करण्यात आला आहे (Ujani reservoir). नोंद केलेल्या ५६ प्रजातींपैकी आठ प्रजाती या कृष्णा नदीखोऱ्याला प्रदेशनिष्ठ असून सहा प्रजाती या 'आययूसीएन'च्या लाल यादीत समाविष्ट आहेत (Ujani reservoir).
भीमा नदीवरील उजनी धरण हे अत्यंत महत्त्वाचे मानवनिर्मित पाणथळ क्षेत्र आहे. पक्षी स्थलांतराच्या मध्य आशियाई उड्डाण मार्गावरुन स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांसाठी हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राला 'महत्वपूर्ण पक्षी क्षेत्रा'चा (आयबीए) दर्जा दिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षात या पाणथळ क्षेत्रात परदेशी मत्स्यप्रजातींनी आपले बस्तान बसवले आहे. या पार्श्वभूमीवर उजनीतील मत्स्य विविधतेचा आढावा घेण्यासाठी डॉ. रणजीत मोरे (इंदापूर महाविद्यालय), गणेश मारकड (मॉडर्न कॉलेज, पुणे), डॉ. विनोद काकडे (दिवेकर कॉलेज, वरवंड) आणि प्रा. डॉ. जीवन सरवडे (प्राचार्य,इंदापूर महाविद्यालय, इंदापूर) यांनी संयुक्तपणे अभ्यास केला. उजनीतील मत्स्यप्रजातींचे सर्वेक्षण करुन त्यांनी लिहिलेला शोध निबंध नुकताच “जर्नल ऑफ थ्रेटनेड टॅक्सा" या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला आहे.
उजनीतील मत्स्यप्रजातींचे सर्वेक्षण हे सर्वप्रथम १९९० साली सिंग आणि याझदानी (भारतीय प्राणी सर्वेक्षण केंद्र, पुणे) यांनी केले होते. या सर्वेक्षणात त्यांना ४० प्रजाती आढळून आल्या होत्या. त्यांनतर त्यांनीच २००२ साली केलेल्या अभ्यासात ५४ प्रजातीची नोंद झाली होती. त्यानंतर सरवदे आणि खिल्लारे यांनी २०१० साली केलेल्या अभ्यासात माशांची संख्या ६० एवढी नोंदविण्यात आली होती. त्यानंतर उजनी धरणातील माशांवर कोणीही आतापर्यंत वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केलेला नव्हता. त्यानंतर एप्रिल २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत पार पडलेल्या सर्वेक्षणात संशोधकांना जलाशयात ३९ वंश, १८ कुल आणि १२ गणातील माशांच्या प्रजाती आढळल्या. तर 'पारआंबसिस लाला' ही गंगा व ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात आढळणारी आणि 'गॅगेटिक लीफफीश' ही गंगेच्या खोऱ्यात आढळणारी प्रजात प्रथमच उजनी जलाशयात आढळल्याची नोंद संशोधकांनी केली आहे. तर परदेशी प्रजातींमधील दक्षिण अमेरिकन ‘सकरमाउथ’ मासा, तिलापिया (चिलापी) आणि मांगूर या प्रजाती स्थानिक माशांवर विपरीत परिणाम करत आहेत. याशिवाय अतिप्रमाणात होणारी मासेमारी, पर्यटन, वाळू उपसा, औद्योगिक सांडपाणी व प्रदूषणामुळे जलाशयातील परिसंस्थेवर ताण वाढत आहे. काही डोंगरी प्रवाहात आढळणाऱ्या स्थानिक माशांच्या प्रजाती आता उजनी धरणातून लोप पावत आहेत.
महत्वपूर्ण नोंदी
जगात केवळ भारतामध्ये सापडणाऱ्या 'कोलूस बार्ब' (Hypselobarbus kolus) 'पेनिस्युलर आॅस्टियोब्रामा' (Osteobrama peninsularis), 'भीमा आॅस्टियोब्रामा' (Osteobrama vigorsii) आणि 'नुक्ता' (Schismatorhynchos nukta) या प्रजाती या सर्वेक्षणामधून नोंदविण्यात आल्या. यामधील 'नुक्ता' ही प्रजात 'आययूसीएन'च्या लाल यादीत 'संकटग्रस्त' (एन्डेंजर्ड) प्रजात म्हणून नामांकित करण्यात आलेली आहे. 'पिरापिटिंगा' (Piaractus brachypomus) ही प्रजात सर्वेक्षण काळात कमी संख्येत आढळली, तर 'मोझांबिक तिलापिया' (Oreochromis mossambicus) ही परदेशी प्रजात सर्वाधिक संख्येने आढळली. तर यापूर्वीच्या सर्वेक्षणात आढळलेल्या लोच प्रजातीमधील 'शिस्टुरा डेनिसोनी', 'गुंटिया लोच', 'नेमाचेलस बोटिया' या प्रजाती आणि काही डोंगरी प्रवाहात आढळणाऱ्या 'मलबार बारील' (Barilius bakeri), 'भारतीय हिल ट्राउट' (Barilius bendelisis) आणि 'डे बारील' (Barilius evezardi) या प्रजाती आताच्या सर्वेक्षणात आढळून आल्या नाहीत.
उजनीत नोंदवलेल्या स्थानिक व संकटग्रस्त प्रजातींचे संवर्धन, परकीय माशांवर नियंत्रण आणि मत्स्यव्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना हवीत. या अभ्यासामुळे उजनी जलाशयातील मत्स्यवैविध्याचे अद्ययावत चित्र समोर आले असून भविष्यातील जैवविविधता व मत्स्यसंवर्धन धोरणांसाठी हा महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. - डॉ. रणजित मोरे, संशोधक