ॲमेझॉन नेटवर्क औटेज : एक डिजिटल संकट

    26-Oct-2025
Total Views |

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असल्याचे म्हटले जाते. आज तंत्रज्ञानाच्या प्रभावाने जग जवळ आले आहे, हाताच्या बोटांवर लाखोंचे व्यवहार होत आहेत. यातूनच या तंत्रज्ञानावरचे मानवाचे अवलंबित्वही वाढत आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या दिवशी या तंत्रज्ञानात मानवी अथवा नैसर्गिक कारणांना बाधा निर्माण होते, तेव्हा मानवी आयुष्यावर त्याचा विपरीत परिणाम दिसतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, ॲमेझॉन कंपनीच्या डेटा सेंटरमधील बिघाडाचा जागतिक व्यापारावर झालेला परिणाम. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर या नव्या डिजिटल संकटाचा आणि त्यावरील उपाययोजनांचा घेतलेला आढावा...

एकविसाव्या शतकाची सुरुवात होऊन आता 25 वर्षे झाली आहेत; तरीही गेल्या 15 ते 20 वर्षांत ज्या वेगाने बदल झाले, तितके बदल त्याआधी कधीच झाले नव्हते, असे म्हणता येईल. संगणक, इंटरनेट त्यानंतर आलेला स्मार्टफोन या त्रिकूटामुळे महानगरांपासून खेड्यांपर्यंत सर्वांच्याच जीवनात फरक पडला. संगणक आणि संगणकीय प्रणाली पूवप्रमाणे फक्त सांगकाम्या न राहिल्या नसून, मानवी व्यवहार जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची क्षमता त्यांना दिली जात आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे, अनेक क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी परिवर्तन होणार आहेत. आपल्या आसपासच्या डिजिटल विश्वाची सतत उत्क्रांती होत राहणार असल्याने, या तंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोगदेखील वाढताना दिसणार आहेत. हे एक असे युग आहे, जिथे तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रात वाढता आहे. या युगात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापरही आपल्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक व्यवसाय व व्यक्ती पूर्णपणे डिजिटल तंत्रावर अवलंबून आहेत. बँकिंग, ई-कॉमर्स, सोशल मीडिया, गेमिंग, स्ट्रीमिंग, उद्योगांचे क्लाऊडआधारित ऑपरेशन्स यापैकी बऱ्याच गोष्टी, ऑनलाईन अवलंबून आहेत. रोटी, कपडा, मकाननंतर इंटरनेट व डिजिटल उपकरणे या अत्यावश्यक गरजा बनल्या आहेत. अशा परिस्थितीत जर डिजिटल सेवा ठप्प झाल्या, तर मानवाला मनस्ताप व नुकसान हे दोन्ही नक्कीच सहन करावे लागेल. असेच काहीतरी ऐन दिवाळीत घडले. ‌‘ॲमेझॉन वेब सर्व्हिस औटेज‌’ हेच त्या संकटाचे नाव. ‌‘औटेज‌’चा अर्थ आहे, सेवा किंवा पुरवठा तात्पुरता खंडित होणे किंवा उपलब्ध नसणे.

दि. 20 ऑक्टोबर या दिवशी एक मोठी गोष्ट घडली. अमेरिकेतील पूर्वेकडच्या व्हर्जिनिया भागातील एका मुख्य डेटा सेंटरमध्ये काहीतरी समस्या निर्माण झाली. हे डेटा सेंटर ‌‘ॲमेझॉन‌’ कंपनीच्या वेब सेवेचे एक मोठे केंद्र आहे. या केंद्रातील इंटरनेट पत्त्यांची माहिती देणारी यंत्रणा(डीएनएस प्रणाली) अचानक काम करेनाशी झाली. ही अडचण एका माहितीचा साठा ठेवणाऱ्या मोठ्या डेटाबेस सेवेच्या संपर्क खुणांपर्यंत (API endpoints) पसरली. परिणामी अनेक सॉफ्टवेअर ॲप्स, वेबसाईट्स आणि इंटरनेट जोडणी असलेली साधनांचे कामकाज बंद पडले. सेवा थांबण्याचा हा काळ जवळजवळ 15 तास चालला. याचा परिणाम एका देशापुरता नव्हता, तर संपूर्ण जगालाच तो जाणवला. बँकिंग, मनोरंजन, वस्तूंची खरेदी-विक्री आणि सरकारी खात्यांची कामे अशा अनेक महत्त्वाच्या सेवा यामुळे खोळंबल्या. या आउटेजचा आपल्या देशातही मोठ्या प्रमाणावर प्रभाव जाणवला.

ई-कॉमर्स व पेमेंट गेटवे : ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम, रेझरपे यांसारख्या प्लॅटफॉर्मच्या कार्यात व्यत्यय आला.

क्लाऊडवर अवलंबून उद्योग : बरेच भारतीय स्टार्टअप्स ॲमेझॉन क्लाऊडवर अवलंबून असल्यामुळे, त्यांचे ग्राहक सेवा आणि व्यवहारही ठप्प झाले.

उत्सव काळात दिसलेला परिणाम : हा प्रसंग दिवाळीच्या दिवशीच घडल्यामुळे ऑनलाईन खरेदी, स्ट्रीमिंग आणि डिजिटल पेमेंट्सवरही मोठाच परिणाम दिसून आला.

नेटवर्क औटेजची सामान्य कारणे

हार्डवेअर बिघाड - रूटर्स, स्विचेस, सर्व्हर किंवा डेटा केबल्समधील दोषामुळे सेवेत अडथळा येतो.
कॉन्फिग्रेशनमधील चुका - चुकीच्या अपग्रेड्स, फर्मवेअर, बग्स किंवा डीएनएस सेटिंग्जमधील त्रुटींमुळेही सेवेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

सायबर हल्ले - डिनायल ऑफ सर्व्हिस (डिओएस) हल्ल्यांमुळे, नेटवर्क अतिभारित होते आणि काम करणे बंद होते.

विद्युतपुरवठ्यातील अडथळे - डेटा सेंटरमधील युपीएस किंवा जनरेटर निकामी झाल्यासही सेवा बंद पडतात. मानवी त्रुटी - कॉन्फिग्रेशन किंवा ऑटोमेशन स्क्रिप्ट्‌‍समधील चुकांमुळेही मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो.

नेटवर्क औटेज टाळण्यासाठीच्या उपाययोजना

आजच्या काळात इंटरनेट सेवा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. या सेवा अचानक थांबणे हा मोठाच धोका आहे. यामुळे आर्थिक नुकसान आणि कामाची प्रचंड हानी होऊ शकते. अशा सेवा थांबण्यापासून बचाव करण्यासाठी, काही सोपे उपाय खालीलप्रमाणे आहेत.

1. दुप्पट व्यवस्था (कंट्रोलड रिडंडंसी ) ठेवणे:

सर्वांत महत्त्वाचा उपाय म्हणजे, प्रत्येक गोष्टीची दुप्पट व्यवस्था ठेवणे. कुठल्याही भारतातील घरी जर दहा पाहुणे जेवायला बोलवले असतील, तर गृहिणी 20 लोकांचा स्वयंपाक करतात. याबाबतीतही हेच तंत्र अवलंबावे.

नेटवर्क मार्ग : एकाच वेळी दोन किंवा त्याहून अधिक इंटरनेट सेवा पुरवठादारांकडून (आयएसपी) जोडणी घ्यावी. जर एका कंपनीची सेवा बंद पडली, तर लगेच दुसऱ्या मार्गाने काम सुरू ठेवता येते.

हार्डवेअर नेटवर्क यंत्रसामग्री: सर्व्हर, राऊटर आणि स्विच यांसारखी महत्त्वाची यंत्रे अतिरिक्त ठेवावी लागतात. एक यंत्र बिघडल्यास, दुसरे आपोआप काम सुरू करते. याला ‌‘फेलोवर सेफ्टी व्यवस्था‌’ म्हणतात. याच कारणासाठी वाहनात स्टेपनी टायर असते.

डेटा सेंटर: शक्य असल्यास माहिती साठवणारे केंद्र (डेटा सेंटर) एकाच ठिकाणी न ठेवता, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली पाहिजेत. यामुळे, एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती (भूकंप किंवा पूर) आल्यास, दुसऱ्या ठिकाणाहून सेवा सुरू ठेवता येते.

2. नियमित देखरेख आणि तपासणी

नेटवर्क सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी त्याची नियमित देखरेख करणेही अत्यंत आवश्यक आहे. स्वयंचलित प्रणाली : नेटवर्कमधील प्रत्येक घटकावर सतत लक्ष ठेवणारी स्वयंचलित साधने वापरावी लागतात. यामुळे मोठी समस्या येण्यापूवच लहान त्रुटी ओळखता येतात आणि त्या लगेच दुरुस्तही करता येतात.

यंत्रणा अद्ययावत ठेवणे : सर्व सॉफ्टवेअर आणि उपकरणे वेळेवर अद्ययावत अपडेट केली पाहिजेत. जुन्या तंत्रज्ञानात अनेक त्रुटी असतात, यामुळेच सेवा बाधित होण्याची शक्यताही वाढते.

वीजपुरवठा : नेटवर्क उपकरणांसाठी अखंड वीजपुरवठा यंत्रणा आणि जनरेटर असणे अनिवार्य आहे. विजेच्या अनियमिततेमुळे सेवा थांबणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते.

3. सुरक्षितता आणि प्रशिक्षण

केवळ तांत्रिक उपाय पुरेसे नाहीत; मानवी घटक आणि सुरक्षितता यावरही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
सायबर हल्ला संरक्षण : नेटवर्कवर होणारे सायबर हल्ले सेवा थांबवण्याचे मोठे कारक आहेत. यासाठी मजबूत फायरवॉल आणि सुरक्षितता प्रणालीचा वापर करणे आवश्यक आहे.

कर्मचारी प्रशिक्षण : नेटवर्क चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांना अडचणी आल्यावर नेमके काय करायचे, याचे स्पष्ट ज्ञान असणे आवश्यक आहे. तशी नियमावलीच तयार करावी.
नियोजन: सेवा बाधित झाल्यास काय करायचे, याचे नियोजन (Disaster Recovery Plan) तयार ठेवावे. कर्मचाऱ्यांनी या नियोजनानुसार वेळोवेळी सराव करणेही गरजेचे आहे.

या ॲमेझॉन नेटवर्क औटेजने हे सिद्ध केले की, डिजिटल अर्थव्यवस्थेत स्थैर्य राखण्यासाठी फक्त एका तंत्रज्ञानपुरवठादारावर अवलंबून राहणे घातक ठरू शकते. भविष्यातील सुरक्षेसाठी कंपन्यांनी विविध क्लाऊड पुरवठादार, डेटासेंटर क्षेत्रे आणि डीएनएस व्यवस्थापन वापरून, स्वतःची डिजिटल संगणकव्यवस्था अधिक सशक्त सक्षम ठेवणे, हेच खरे शहाणपण ठरेल.

- दीपक शिकारपूर
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)
[email protected]