माय सन - दक्षिण आशियातील शिवकाव्य

    26-Oct-2025
Total Views |

प्राचीन काळामध्ये भारत हा समृद्ध होता आणि अनेक देशांशी त्याचा व्यापार चालत असे. त्यामुळे अनेक देशांमध्ये आपल्याला आजही भारतीय संस्क़ृतीच्या खुणा आढळतात. काही देशांमध्ये तर भारतीय संस्कृतीचा प्रभाव तेथील राजसत्ता आणि जनमानसावरदेखील पडला. असाच एक देश म्हणजे व्हिएतनाम होय! या व्हिएतनाममधील भारतीय संस्कृतीची ओळख असलेल्या ‌‘माय सन‌’चा घेतलेला मागोवा...

माय सन! नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभी राहते ती दाट जंगलांनी आणि हिरव्यागार डोंगरांनी वेढलेली एक शांत दरी. पण, या शांततेच्या कुशीतच हजारो वर्षांपूव चंपा साम्राज्याची धगधगणारी संस्कृती फुलली होती. हे स्थळ आज My Son Sanctuary म्हणून ‌‘युनेस्को‌’च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. पण, त्याचे मूळ इतके प्राचीन आहे की, ते आपल्याला भारताशी आणि हिंदू धर्माच्या आध्यात्मिक परंपरेशी जोडते.

व्हिएतनामच्या मध्य भागातील क्वांग नाम (Quang Nam) प्रांतात असलेले ‌’माय सन‌’ हे एकेकाळी, चंपा साम्राज्याची धार्मिक राजधानी होते. चंपा लोकांचा उगम सुमारे दुसऱ्या शतकात झाला आणि त्यांनी इ.स. चौथ्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत, दक्षिण व्हिएतनाम ते मध्य लाओसपर्यंत आपले राज्य विस्तारले.

‌‘चंपा‌’ हा शब्द संस्कृत ‌‘चंपक‌’ या फुलावरून आला आणि त्यांच्या संस्कृतीत भारतीय प्रभाव इतका खोलवर रुजलेला होता की, त्यांची राजभाषाही संस्कृत हीच होती. त्यांनी विष्णु, शिव, देवी आणि इतर हिंदू देवतांची उपासना केली. त्यांच्या मंदिरांची बांधणी भारतीय शिल्पशास्त्रानुसारच झाली होती.

‌’माय सन‌’ म्हणजे सुंदर दरी. पण, प्राचीन काळात हे स्थान ‌‘मेई सॉन‌’ किंवा ‌‘मेई सून‌’ अशा नावांनीही ओळखले जात असे. इ.स. चौथ्या शतकात राजा भद्रवर्मन पहिला याने इथे, भगवान शिवाला अर्पण केलेले पहिले मंदिर बांधले. त्याने या देवतेला ‌‘भद्रेश्वर‌’ असे नाव दिले. हे नावच भारतातील पारंपरिक शिवनामांशी साधर्र्म्य दर्शवते. पुढील अनेक शतकांमध्ये विविध चंपा कुळातील राजांनी इथे नवनवीन मंदिरे बांधली. इथे जवळपास 70 हून अधिक विटांच्या मंदिरांचे अवशेष आढळतात. ही मंदिरे केवळ धार्मिकच नव्हती, तर ती सर्व राजसत्तेचे, कला आणि स्थापत्य कौशल्याचे प्रतीकही होती.

‌’माय सन‌’मधील मंदिरे दाट जंगलात पसरलेल्या डोंगरांमध्ये विटांनी बांधलेली आहेत. आश्चर्य म्हणजे, या विटांमध्ये कोणत्याही प्रकारचा चुन्याचा वापर केलेला नाही. संशोधक आजही त्या विटांना एकत्र जोडण्यासाठी वापरलेल्या सेंद्रिय मिश्रणाचे रहस्य शोधत आहेत. प्रत्येक मंदिरात मुख्य देवालय म्हणजे गर्भगृह, पुढे अंतराळ आणि मंडप अशी पारंपरिक भारतीय रचना दिसते. काही मंदिरांभोवती प्रदक्षिणा मार्गही आहे. मंदिरांचे प्रवेशद्वार अलंकारिक आहेत, त्यावर नाग, किन्नर, गणेश, नंदी, अप्सरा आणि विविध देवतांची कोरीव शिल्पे आहेत. या शिल्पांमध्ये शिवाच्या विविध रूपांचे दर्शन घडते; ज्यामध्ये नटराज, लिंगरूप, तसेच उमा-महेश्वराचीही प्रतिमा आहे. काही ठिकाणी विष्णुचे दशावतार, ब्रह्मदेव आणि देवीच्या प्रतिमाही कोरलेल्या आहेत. विटांच्या भिंतींवर कोरलेले शिल्पांकन इतके सूक्ष्म आहे की, त्यावर प्रकाश पडताच दगड जिवंत झाल्याचा भास होतो.

माय सनच्या मंदिरांची रचना आणि शैली पाहिली, तर ती दक्षिण भारतातील पल्लव आणि चोल कालीन मंदिरांशी असलेले नाते सांगते. विशेषतः, कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिराची आठवण करून देणारी काही मंदिरेही इथे आहेत. या मंदिरांची दिशा, प्रमाण आणि कोरीव रचना पाहून लक्षात येते की, चंपा शिल्पकारांनी भारतीय वास्तुशास्त्राचे ज्ञान आत्मसात केले होते. त्यांनी अगदी आकाशरेषा, ग्रहस्थिती आणि सूर्याच्या दिशेनुसार मंदिरांची उभारणी केली.

भारत आणि व्हिएतनामचा सांस्कृतिक संबंध सुमारे दोन हजार वर्षांपूवपासूनचा आहे. समुद्री व्यापारमार्गांद्वारे भारतीय व्यापारी आणि साधू दक्षिण आशियात पोहोचले. त्यांनी बौद्ध आणि हिंदू विचारांची बीजे इथल्या भूमीत पेरली. चंपा राजांनी स्वतःला शैव मानले आणि त्यांनी भारतातील पवित्र स्थळांचे अनुकरण केले. भद्रेश्वर हे नाव स्वतःच ‌‘भद्र‌’ (शुभ) आणि ‌‘ईश्वर‌’ (भगवान शिव) या संस्कृत शब्दांपासून आलेले आहे. इथे मिळालेले संस्कृत शिलालेख, ‌‘ॐ नमः शिवाय‌’ अशी शिलालेखीय अभिव्यक्ती, तसेच ‌‘देवव्रत‌’, ‌‘हरिहर‌’, ‌‘शंभू‌’ अशी नावे या भारतीय प्रभावाचे स्पष्ट द्योतक आहेत.

माय सन हे केवळ स्थापत्याचेच नव्हे, तर धार्मिक विधींचेही केंद्र होते. इथे शैव साधू, यो0गी आणि पुरोहित वास्तव्यास असत. महाशिवरात्री, संक्रांती आणि इतर धार्मिक सण इथे मोठ्या थाटात साजरे होत. येथील सर्व मंदिरे सुगंधी धूप, पुष्पमाला आणि दीपांनी उजळलेली असत. ‌‘लिंग‌’ आणि ‌‘योनि‌’ यांच्या प्रतीकातूनच सृष्टीचक्राचे प्रतिनिधित्व केले जात असे आणि हा संकल्प पूर्णपणे भारतीय तत्त्वज्ञानावरच आधारित होता.

माय सनचे वैभव सुमारे नवव्या शतकांपर्यंत टिकले. इ.स. नवव्या ते 13व्या शतकादरम्यान या ठिकाणी, नवनवीन मंदिरे बांधली गेली. परंतु, 13व्या शतकात चंपा साम्राज्यावर ख्मेर आणि नंतर व्हिएतनामी राजांनी आक्रमणे केली. या युद्धांमुळे मंदिरे उद्ध्वस्त झाली. आज माय सन हे व्हिएतनाममधील सर्वांत महत्त्वाचे पुरातत्त्व स्थळ आहे. ‌‘युनेस्को‌’ने 1999 साली या परिसराला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. आता इथे संरक्षण आणि पुनर्स्थापनेची कामे सुरू आहेत. स्थानिक मार्गदर्शक आजही पर्यटकांना सांगतात की, माय सन म्हणजे व्हिएतनामचे काशी. कारण, जसे भारतात काशी ही शिवाची पवित्र नगरी आहे, तसेच माय सन ही चंपा साम्राज्याची देवभूमी होती. 19व्या शतकात फ्रेंच पुरातत्त्वज्ञांनी माय सनचा पुनर्शोध लावला. त्यानंतर 20व्या शतकात इथे उत्खनन झाले. दुर्दैवाने, व्हिएतनाम युद्धादरम्यान (1969 साली) अमेरिकन बॉम्बहल्ल्यांमध्ये अनेक मंदिरे नष्ट झाली. तरीही उरलेले अवशेष आजही त्या सुवर्णयुगाची साक्ष देतात.

माय सनच्या मंदिरांची एक खास वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्यात केलेला सँडस्टोन आणि विटांचा मिश्र वापर. यामध्ये काही भाग कोरलेला आहे, तर काही भाग जोडलेला आहे. प्रत्येक मंदिराला आपली स्वत:ची एक वेगळीच शैली आहे. या मंदिरांची ‌‘ग्रुप जी‌’ आणि ‌‘ग्रुप ए‌’ अशी विभागणी करण्यात आली असून, ‌‘ए1‌’ हे मंदिर सर्वांत प्रभावी मानले जाते. या मंदिराचे शिखर तीन स्तरांमध्ये वाढत जाते, अधोभाग पृथ्वीचे प्रतीक, मध्यभाग मानवी जगाचे आणि शिखर दैवी आकाशाचे प्रतिनिधित्व करतो.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) व्हिएतनाम सरकारसोबत करार करून, इथल्या काही मंदिरांच्या पुनर्बांधणीचे कार्य हाती घेतले आहे. भारतीय शिल्पतज्ज्ञ आणि पुरातत्त्वज्ञांनी इथल्या मूळ बांधकाम शैलीचा अभ्यास करून, त्याचे संवर्धन सुरू केले आहे. हे कार्य भारत-व्हिएतनाम सांस्कृतिक सहकार्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरले. माय सन हे फक्त एक पुरातत्त्व स्थळ नाही, तर भारताच्या आध्यात्मिक वारशाची परदेशातील प्रतिकृती आहे. या विटांमध्ये, या शिल्पांमध्ये आणि या भग्न मंदिरांमध्ये अजूनही दडलेले आहेत; चंपा राजांच्या स्वप्नांचे प्रतिबिंब, भारतीय स्थापत्यकलेचे तेज आणि ‌‘ॐ नमः शिवाय‌’चा नाद.

अनेक भारतीय पर्यटकांसाठी व्हिएतनाम हा एक महत्त्वाचा आणि आवडीचा भाग आहे. 2024 साली भारतातून पाच लाखांपेक्षा जास्त प्रवासी या देशात गेले आहेत; पण त्यातल्या अगदी मोजक्याच लोकांनी या ठिकाणी भेट दिली. तुम्ही व्हिएतनाममध्ये जाणार असाल, तर या जागेला भेट द्यायला अजिबात विसरू नका.

- इंद्रनील बंकापुरे
7841834774