ऑपरेशन सिंदूरच्या यशामागील नेतृत्व

    26-Oct-2025   
Total Views |

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ हा देशाच्या गैरवाचा मानबिंदू ठरला. भारतीय सैन्याच्या अजोड कामगिरीने सारे जगच विस्मित झाले. मात्र, यामागे एका मोठ्या नियोजनाची जोडही महत्त्वाची होतीच. मोहिमेतील प्रत्येक बारकावे लक्षात घेणे, जागतिक स्तरावरून वाढणारा दबाव या सगळ्याला भारतीय रणनीतीकारांनी समर्थपणे तोंड दिले. त्यामुळेच ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ एक यशोगाथा ठरले. याच यशोगाथेतील रणनीतीकारांच्या योगदानाचा घेतलेला आढावा...

ऑपरेशन सिंदूर‌’मध्ये परराष्ट्रमंत्री, ‌‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ‌’, ‌‘चीफ ऑफ आम स्टाफ‌’, ‌‘चीफ ऑफ एअर स्टाफ‌’ आणि ‌‘डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स‌’ यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. दि. 17 ऑक्टोबर रोजी नाशिक येथील ‌‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड‌’मध्ये, देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‌‘एचएएल‌’चेही कौतुक केले. ते म्हणाले, “नुकत्याच राबवलेल्या ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’दरम्यान, ‌‘एचएएल‌’ने पूर्णक्षमतेने आणि 24 तास सेवा देऊन मोलाची भूमिका बजावली.” याबद्दल राजनाथ सिंह यांनी ‌‘एचएएल‌’चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदनही केले.

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’मध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होते. त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाला ठाम भूमिका आणि रणनीतिक आधार दिला. यामुळेच जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा अधिक बळकट झाली.

राजकीय भूमिका आणि ठाम संवाद

डॉ. जयशंकर यांनी ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ दरम्यान, भारतासमोर असलेले जागतिक राजकारणाचे आव्हान अतिशय सक्षमपणे हाताळले. त्याचवेळी त्यांनी ‌‘दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता‌’ ही भारताची भूमिकाही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुस्पष्टपणे मांडली. त्यांच्या या कामगिरीमुळे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी गटांना रोखण्यासाठी जागतिक सहमती मिळवली. तसेच जयशंकर यांच्या नेतृत्वाखालीच ‌‘ट्रायलबे‌’सारख्या बहुपक्षीय मंचांवरही भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर संदेश दिला. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ‌‘क्वाड‌’, ‌‘ब्रिक्स‌’ यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक संस्थांकडून भारताला पाठिंबा मिळवण्यात जयशंकर यांच्या अनुभवाचा देशाला लाभ झाला.

परराष्ट्र धोरणातील ठोस निर्णय

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’नंतर, सिंधू जल कराराला स्थगित देणे, पाकिस्तानच्या दहशतवादी समर्थनावर कठोर भाष्य करण आणि हल्ल्याचे सूत्रधार शोधण्यासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या सर्व निर्णय प्रक्रियेत डॉ. जयशंकर यांची भूमिका निर्णायकच होती. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीसमोर ठोस शिफारसी ठेवल्या.

जागतिक सहमती आणि माहितीचे व्यवस्थापन

डॉ. जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रालयातील विचार विमर्श समितीसमोर स्पष्ट केले की, भारतीय सैन्याने स्ट्राईक केल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांमध्येच, पाकिस्तानला याची कल्पना देण्यात आली होती. कोणत्याही पाश्चिमात्य मध्यस्थीशिवाय हा लढा ‌‘द्विपक्षीय‌’ पद्धतीने निर्णायक झाला. ‌‘संयुक्तराष्ट्र सुरक्षा परिषदे‌’मध्येही भारताची भुमिका मांडण्यात जयशंकर त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. टीआरएफ या दहशतवादी गटाला जागतिक स्तरावर दहशतवादी म्हणून घोषित करण्यातही जयशंकर यांचे योगदान महत्त्वाचे होते.

प्रभाव आणि परिणाम

डॉ. जयशंकर यांच्या नेतृत्वामुळेच भारताने दहशतवादाविरुद्धच्या कठोर कारवाईवेळी, आत्मनिर्भर परराष्ट्र धोरण राबवले, पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर दबाव वाढवला आणि भारताचे सार्वभौमत्वही अधोरेखित केले. ‌‘मोदी नॉर्मल‌’ (संवाद आणि दहशतवाद एकत्र शक्य नाही) असा नवा राजनैतिक दृष्टिकोनही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केला.

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’मध्ये ‌‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ‌’ जनरल अनिल चौहान यांचे योगदान

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’मध्ये ‌‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ‌’ जनरल अनिल चौहान यांचा महत्त्वपूर्ण आणि निर्णायक वाटा होता. त्यांनी स्पष्ट केले की, ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ हा दहशतवादाला थांबवण्याचा भारताचा एक प्रयत्न होता. या मोहिमेचा मुख्य उद्देश पाकिस्तानमधून भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करणे हा होता.

जनरल चौहान यांच्या माहितीनुसार, हे ऑपरेशन रात्री 1 ते 1.30 या वेळेत आखण्यात आले, जेणेकरून जीवीताची हानी टाळता येईल. त्यांनी या कारवाईला ‌‘नवीन प्रकारच्या युद्धाची सुरुवात‌’ मानले आहे. या युद्धात उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून पाकिस्तानवर निर्णायक वार करण्यात आला. यामध्ये जमीन, आकाश, समुद्र आणि सायबर क्षेत्रातही भारताच्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. जनरल अनिल चौहान यांनी काळजीपूर्वक नियोजन, तंत्रज्ञानाचा उत्तम वापर आणि उच्चस्तरीय सहकार्य व नेतृत्वाद्वारे या मोहिमेला यशस्वी केले. त्यांनी आधुनिक आणि प्रभावी युद्धकौशल्य राबवून, भारतीय सैन्याच्या सामरिक क्षमतेचीही उंची वाढवली.

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’मध्ये ‌‘चीफ ऑफ आम स्टाफ‌’ जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे योगदान

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’मध्ये ‌‘चीफ ऑफ आम स्टाफ‌’ जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे योगदान महत्त्वाचे होते. त्यांनी या ऑपरेशनच्या योजना, रणनीती आणि अंमलबजावणीचे नेतृत्व केले. ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ एक ग्रे झोनमध्ये झालेले युद्ध होते, जे पारंपरिक युद्धापेक्षा वेगळे आणि अनपेक्षित परिस्थितींनी भरलेले होते. या ऑपरेशनची तुलना त्यांनी बुद्धिबळ खेळाशी केली. कारण, प्रत्येक स्तरावर पुढील चालींचा आणि शत्रूच्या प्रतिसादाचा अंदाज लावणे आव्हानात्मक होते.

जनरल दिवेदी यांनी स्पष्ट केले की, दि. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले होते. दि. 23 एप्रिल रोजी सैन्याने निर्णय घेतला की, ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. या ऑपरेशनमध्ये सैनिकांनी पाकिस्तानी प्रदेशात खोलवर घुसखोरी करून, दहशतवादी घेराबंद केले व त्यांना दणका दिला. त्यांनी सांगितले की, ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’, ‌‘उरी‌’ आणि ‌‘बालाकोट‌’ यंसारख्या आधीच्या हल्ल्यांपेक्षा, अधिक व्यापक आणि खोलवर हल्ले करण्यात आले. या ऑपरेशनची अंमलबजावणी अतिशय उत्तमरित्या करण्यात आली.

संपूर्ण ऑपरेशनमध्ये जनरल उपेंद्र द्विवेदींची धोरणात्मक नेतृत्व क्षमता, समन्वयासाठीची कौशल्ये आणि अनपेक्षित परिस्थिती हाताळण्याची तयारी हे महत्त्वपूर्ण ठरले. या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तंत्रांच्या प्रतिकारासाठी जनरल द्विवेदींच्या नेतृत्वात एक नवीन आणि प्रभावी रणनीतीचाही वापर केला.

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’मध्ये ‌‘चीफ ऑफ एअर स्टाफ‌’ यांचे योगदान

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’मध्ये ‌‘चीफ ऑफ एअर स्टाफ‌’ एयर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह/एपी सिंह यांनी महत्त्वाचा आणि निर्णायक वाटा उचलला. त्यांनी या ऑपरेशनमध्ये भारतीय वायुदलाच्या आधुनिक युद्धकला आणि निर्णायक हल्ल्याच्या क्षमतेसाठी तिन्ही सैन्य दलांच्या तसेच राष्ट्रीय सुरक्षा एजन्सींच्या समन्वयावरही विशेष भर दिला.

एयर चीफ मार्शल यांनी या ऑपरेशनमध्ये वापरलेल्या लांब रेंजच्या ‌‘LRASAM²‌’ आणि ‌‘एस-400‌’ मिसाईल सिस्टम्सचे गेम चेंजर म्हणून वर्णन केले. याच्या मदतीने शत्रूच्या हवाई प्रतिकाराला उत्तमरित्या नियंत्रित केल्याने, त्यांना प्रत्युत्तर देणे कठीण गेले. या ऑपरेशनच्या यशस्वी आणि निर्णायक ठरण्याची मुख्य कारणे म्हणजे, या उपकरणांचा प्रभावी वापर, समन्वित आणि एकत्रित सैन्य दलांची कार्यवाही, त्वरित निर्णायक धोरणात्मक निर्णय असेही एयर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह म्हणाले.

चार वायुसेना अधिकाऱ्यांना ऑपरेशनमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी, सर्वोत्तम युद्ध सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले, तर नऊ लढाऊ वैमानिकांना वीर चक्रांनीही गौरविण्यात आले. संपूर्ण ऑपरेशनमध्ये भारतीय वायुसेना प्रमुखांनी नेतृत्व करत, तिन्ही सैन्य दलांमध्ये असाधारण समन्वय साधला.

सेना मुख्यालय आणि डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांचे योगदान ‘डीजीएमओ‌’ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’मध्ये अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावली. ते या संपूर्ण ऑपरेशनचे मुख्य समन्वयक होते आणि संपूर्ण सैन्य कारवाईची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली.‘डीजीएमओ‌’ कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी लष्कर, वायुसेना आणि नौदल या तिन्ही दलांमध्ये परस्पर सहकार्य आणि समन्वय साधला. ऑपरेशनपूव आणि त्यादरम्यान, ‌‘डीजीएमओ‌’ यांनी रणनीती आखली. ऑपरेशनबाबतचे दिशा-निर्देश ठरवले आणि त्याची यशस्वी अंमलबजावणीही सुनिश्चित केली.

युद्धबंदी करण्यात निर्णायक भूमिका :

पाकिस्तानचे ‌‘डीजीएमओ‌’ मेजर जनरल कासिफ यांनी ‌‘डीजीएमओ‌’ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्यासोबत संघर्ष विरामासाठी संवाद साधला. यामुळेच दि. 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धबंदी शक्य झाली.

व्यापक कार्यक्षेत्र : ‌‘डीजीएमओ‌’ म्हणून त्यांचे कार्यक्षेत्र केवळ जमिनीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी दहशतवादाविरोधी अभियानांचे नियोजन, मंजुरी, तसेच संबंधित सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांशी संवाद साधून समन्वयही वाढवला.

सामरिक नियंत्रणात सहभाग : ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’च्या यशात त्यांचा ‌‘डेप्युटी चीफ ऑफ आम स्टाफ‌’ (स्ट्रॅटेजी) या महत्त्वाच्या नव्या पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. यामाध्यमातून त्यांनी सैन्याच्या सामरिक नियंत्रणही केले.

सेना मुख्यालयाचे योगदान

सेना मुख्यालयाचे योगदान ऑपरेशनमध्ये अत्यंत महत्त्वाचे होते. सेना मुख्यालयाने या कारवाईत भारतीय सैन्याच्या विविध विभागांमधील सूचनांचे आदानप्रदान, तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स आणि माहिती युद्धविषयक नियोजन तसेच, अंमलबजावणीवरही कठोर नियंत्रण ठेवले. यामुळे संपूर्ण ऑपरेशनच अत्यंत प्रभावीपणे पार पडले. या सर्व कारणांमुळे ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’च्या यशामध्ये सेना मुख्यालय आणि ‌‘डीजीएमओ‌’ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांचे योगदान निर्णायक ठरले.

थोडक्यात, ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’मध्ये परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, ‌‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ‌’ जनरल अनिल चौहान, ‌‘चीफ ऑफ आम स्टाफ जनरल‌’ उपेंद्र द्विवेदी, ‌‘चीफ ऑफ एअर स्टाफ‌’ अमरप्रीत सिंह आणि ‌‘डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स‌’ जनरल राजीव घई यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.