मुंबई : (Mumbai Press Club) ‘महाराष्ट्रात हेराफेरी’ या फिल्मच्या स्क्रिनिंगदरम्यान मुंबई प्रेस क्लबमध्ये चित्रपटाच्या शूटिंगवरून शनिवार, 25 ऑक्टोबर रोजी पत्रकारांमध्येच मोठा वाद झाला. हा काँग्रेसचा कार्यक्रम नसून प्रेस क्लबचा असल्याचे पत्रकारांना सांगण्यात आले. वादावादीनंतर सर्व पत्रकारांना बाहेर काढण्याचा प्रकार घडला.
मुंबई प्रेस क्लबमध्ये (Mumbai Press Club) शनिवारी ‘महाराष्ट्रात हेराफेरी, जितके मोठे राज्य तितकीच मोठी जनमताची चोरी’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. संबंधित कार्यक्रमाचे पोस्टर महाराष्ट्र काँग्रेस, खा. वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या सर्वांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले होते.
शिवाय गेल्या काही दिवसांत मतचोरीबाबत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवरून हा कार्यक्रम काँग्रेसनेच आयोजित केला आहे, असा पत्रकारांचा समज झाला. त्यामुळे सर्व टीव्ही चॅनेलचे पत्रकार चित्रपटाचे रेकॉर्डिंग करण्यासाठी प्रेस क्लबमध्ये (Mumbai Press Club) दाखल झाले. मात्र, प्रेस क्लबच्या लोकांनी त्यांना तुम्हाला इथे कुणी बोलवले? असा सवाल केला. त्यावर पत्रकारांनी काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील पोस्ट बघून इथे आलो असल्याचे सांगितले. शिवाय त्यात सर्वांना प्रवेश मोफत असल्याचे नमूद करण्यात आले होते.
परंतु, हा काँग्रेसचा कार्यक्रम नसून ‘प्रेस क्लब’चा (Mumbai Press Club) कार्यक्रम आहे, असे पत्रकारांना सांगण्यात आले. यावरून पत्रकार संघाचे सदस्य आणि टीव्ही चॅनेलच्या पत्रकारांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर प्रेस क्लबच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांनी लावलेले कॅमेरे आणि ट्रायपॉड बाहेर काढले. यावरून वाद आणखी चिघळला. दरम्यान, हा कार्यक्रम प्रेस क्लबचा असताना काँग्रेस पक्षाला त्याची प्रसिद्धी का करू दिली? असा सवालही पत्रकारांकडून यावेळी विचारण्यात आला.