मुंबई : ( Devendra Fadnavis ) शीख पंथाचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर यांचे हौतात्म्य हे केवळ शीख समाजापुरते मर्यादित नसून, ते संपूर्ण भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेच्या रक्षणाचे प्रतीक आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. गुरु तेग बहादुर यांच्या बलिदानाचा संदेश देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहेब’ यांच्या ३५०व्या शहिदी समागमानिमित्त दादर येथील योगी सभागृहात राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना गुरु तेग बहादुर यांच्या अद्वितीय त्यागाची आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली.
या कार्यक्रमास आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार बाबूसिंह महाराज, अल्पसंख्याक विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, संत ज्ञानी हरनाम सिंहजी (खालसा भिंदरनवाले, मुखी दमदमी टकसाल, प्रधान सत समाज), राज्यस्तरीय समितीचे सदस्य रामेश्वर नाईक, सरताज सतींदर, महंत सुनील महाराज, स्वामी हिरानंद तसेच प्रसिद्ध गायक सतिंदर सरताज आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : Mumbai Press Club : वादानंतर प्रेस क्लबमधून पत्रकारांनाच काढल बाहेर
कार्यक्रमादरम्यान ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहेब’ यांच्या ३५०व्या शहिदी समागमानिमित्त विशेष संकेतस्थळाचे उद्घाटन आणि गुरु तेग बहादुर यांच्या जीवनकार्य व बलिदानावर आधारित गीताचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी विविध धर्मगुरूंनी आणि संतांनी गुरु तेग बहादुर यांच्या शौर्य, सहिष्णुता आणि धर्मनिष्ठेचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “हिंद दी चादर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु तेग बहादुर साहेबांना भावपूर्ण अभिवादन अर्पण केले.