तो मोर्चा तो विरोध आणि समाजमंथन

26 Oct 2025 12:26:48

कायदा-सुव्यवस्था हातात घेऊन संघटनेची नोंदणी जबरदस्तीने बंद पाडणाऱ्या वंचित बहुजन आघाडी पक्षाचा कार्यकर्ता राहुल मकासरे आणि त्याच्या साथीदारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. मात्र, त्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने दि. 24 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा काढला. या मोर्चात रा. स्व. संघावर बंदी आणण्याची मागणी सुजात आंबेडकरांनी केली. या मोर्चाचे परिणाम आणि वास्तव काय आहे, याचा घेतलेला मागोवा...

मोठ्या आवेशात तो म्हणाला, “उमर खलिदला नाही, तर मोहन भागवतला तुरुंगात टाकायला हवे. ”हे सगळे कुठे सुरू होते, तर वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चामध्ये. दि. 24 ऑक्टोबर रोजी सुजात आंबेडकर यांनी, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला. त्यात सुजात यांच्या खांद्याला खांदा लावून, वंचितच्या नेता फारूख अहमद याने हे विधान केले. ‌‘भारत तेरे तुकडे होंगे हजार‌’ची इच्छा असणाऱ्या उमर खलिदचे समर्थन वंचितच्या मोर्चात का? याबाबत चर्चा केली असता, संभाजीनगर शहरातील समाजबांधवांचे म्हणणे होते की, “शुक्रवारी मोर्चा काढण्याचे कारण म्हणजे, ‌‘जुम्मे की नमाज‌’ झाल्यानंतर तिथले लोक मोर्चात येतील आणि मोर्चा मोठा दिसेल. त्यातल्या लोकांना खूश करण्यासाठीच त्या फारूकने असे म्हटले असावे.” असे असेल, तर हे सगळेच भयंकर आहे. सगळेच मुस्लीम ‌‘भारत तेरे तुकडे होंगे हजार‌’वाल्या उमर खलिदचे समर्थन करतात, असे वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे का? दुसरे असे की, ‌‘द थॉट्स ऑन पाकिस्तान‌’मध्ये कट्टर इस्लामी मानसिकतेबद्दल सत्य मांडणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या नातवाच्या पक्षाने मोर्चा काढून तिथे उमर खलिदचे समर्थन करणे म्हणजे, हा बाबासाहेबांचा अपमानच आहे.

दुसरीकडे रा. स्व. संघाविरोधात काढलेल्या या मोर्चाने, बाबासाहेबांना मानणारा समग्र समाज अस्वस्थ झाला आहे. कारण, समाजाला समजले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही रा. स्व. संघाला विरोध केला नव्हता. उलट ते म्हणाले होते की, “रा. स्व. संघाबद्दल मतभेद असले, तरी आपलेपणा वाटतो.” सध्या देशाचे पंतप्रधान मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे. त्यांच्याच सत्ता काळातच तथागत गौतम बुद्धांचे जगभरातील पवित्र पिप्रहवा अवशेष भारतात आणले गेले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या विकासासाठी, 500 कोटीही याच भाजपच्या राज्य आणि केंद्र सरकारच्या काळात मंजूर झाले. इंदू मिल असो की, बाबासाहेबांचे लंडनचे घर असो, अथवा बौद्ध धम्माच्या पवित्र तीर्थस्थळांचा विकास असू दे, या सगळ्यांसाठीच श्रद्धेने आणि राजकारण मध्ये न आणता काम झाले ते या भाजपच्या, रा. स्व. संघ विचारसरणीच्या सत्ताकाळातच. दुसरे असे की, डॉ. बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद हिंदूूंमधील मागास जातींसाठी केली होती. मात्र, बौद्धांनाही आरक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेतला गेला तोही भाजपसहयोगी सत्ताकाळातच. त्यामुळे तथागत बुद्धांना मानणारा सम्यक विचारांचा समाज, रा. स्व. संघाच्या विरोधात असूच शकत नाही. समाजाला विकास, प्रगती हवी आहे. नेत्यांच्या गब्बर झालेल्या कुटुंबानाच मोठे करण्यात समाजाच्या लोकांना अजिबात रस नाही. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे, वंचित बहुजन आघाडी पक्षच नव्हे, तर इतरही पक्ष जे केवळ बाबासाहेबांच्या नावाचा वापर करतात, त्यांना समाजाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दणकून हरवले. त्यामुळेच छत्रपती संभाजीनगरमधला मोर्चा सगळ्या समाजाचा मोर्चा होता, हे म्हणणे 100 टक्के चूकच आहे.

हा मोर्चा कशासाठी होता? तर छत्रपती संभाजीनगरच्या एका महाविद्यालयासमोर रा. स्व. संघाचे स्वयंसेवक सदस्य नोंदणी करत होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचा स्वयंघोषित नेता राहुल मकासरे आणि सहकाऱ्याने, नोंदणी करणाऱ्यांना शिवीगाळ करत नोंदणी बंद पाडली. यावरही समाजातल्या लोकांचे म्हणणे आहे की, “राहुल कोण होता, न्यायाधीश होता? पोलीस होता? की हुकूमशाह होता? सदस्य नोंदणीबद्दल आक्षेप होता, तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानुसार कार्यरत असलेल्या कायदाव्यवस्थेमध्ये, गेला बाजार प्रचारप्रसारमाध्यमांवर तो त्याचे मत व्यक्त करू शकत होता. पण, त्याने कायदा हातात घेऊन संविधानाचा अपमानच केला.” यावर संघ स्वयंसेवकांची कोणतीही तक्रार नसतानाही, पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेसाठी राहुल आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा नोंदवला. मग सुजात आंबेडकर यांनी मकासरेच्या समर्थनार्थ, छत्रपती संभाजीनगरच्या रा. स्व. संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चामध्ये त्यांनी रा.स्व संघावर बंदी घालण्याची मागणीही केली. सुजात यांना माहिती नाही का, भारतात संविधानयुक्त लोकशाहीचे राज्य आहे ते. आपली आवड म्हणून कुणावरही कुणी बंदी घालू शकत नाही, तसेच, रा. स्व. संघाबद्दल बोलताना, मनु वगैरेबद्दलही गळा काढला जातो. पण, वंचित आणि त्यांच्या समविचारी नेते हेच ‌‘मनु मनु‌’ म्हणत, त्यांचा राजकारणाचा धंदा चालवतात. आम्ही मनुवादी असून, आम्हाला मनुवादी समाजव्यवस्था सरकसकट लादायची आहे असे कोणत्याही रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकाने सार्वजनिक नव्हे, तर खासगीतही म्हटल्याचे एकीवात नाही. मात्र, तरीही काही लोक रा. स्व. संघाबद्दल समाजात विष कालवण्याचा प्रयत्न करतात. याबद्दल बाबासाहेबांच्या काही कट्टर अनुयायांचे म्हणणे आहे की, “रा. स्व. संघाची शतकोत्तरी वाटचाल सुरू आहे. रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी सगळ्या समाजाच्या विकासाची, प्रगतीची, एकतेची भूमिका घेतली. केवळ आणि केवळ बुद्धांच्या करुणेची, मैत्रीची साक्ष असलेल्या स्वयंसेवकांच्या भूमिकेचे, सच्चेपण शोषित-वंचित समाजाला उमगले. त्यामुळे समाजही रा. स्व. संघाच्या कार्यात सहभागी होत आहे. नेमकी याच गोष्टीची असुया आणि भीती, या रा. स्व. संघाला विरोध करणाऱ्यांमध्ये आहे.” यावर वामनराव कर्डक यांच्या काव्यपंक्तींची आठवण येते;

संघटना हजार झाल्या नेते हजार झाले
कोणा म्हणावे आपुले चेहरे हजार झाले

कर्डक यांनी म्हटल्याप्रमाणे, आता खरंच आपले कोण आणि स्वार्थासाठी आपला वापर करणारे कोण, याबद्दल समाजाने गांभीर्याने विचार करायला हवा. समाज काही मेंढर नाही, की कुणीही हाका आणि स्वतःचा राजकारणाचा धंदा सुरू करा.

विषयांतर होईल पण सांगायलाच हवे, ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुजात आंबेडकरांनी मोर्चा काढला, त्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. हेडगेवार रुग्णालय आहे. या व्यतिरिक्त रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांची असंख्य छोटी-मोठी सेवाकार्य शहरात नव्हे, देशभरात आहेत. ही सेवाकार्य समस्त समाजासाठी आहे. या उपक्रमातून गोर-गरीब, शोषित-वंचित, पीडित अशा कोट्यवधी लोकांची सेवा केली जाते. लाभाथ असणारे समाजबांधव, संघाचे स्वयंसेवक व्हावेत म्हणून काही हे उपक्रम राबवले जात नाहीत. (ंसंघाचे काम पाहता यानुसार मोजमाप केले, तर देशभरात 70 टक्के जनता संघ स्वयंसेवक किंवा समितीच्या भगिनी होतील.) तर डॉ. बाबासाहेब म्हणाले होते की, “या देशातील सगळा समाज, सगळे लोक एकाच वंशाचे आहेत.” त्यांनी सांगितलेल्या वंशबंधुत्वाचा आधार घेत बंधुभाव, समता, समरसता जपण्यासाठी स्वयंसेवक हे उपक्रम राबवतात. रा. स्व. संघाला विरोध करणाऱ्या नेत्यांनी आणि त्यांच्या चेल्यांनी, समाजासाठी असे उपक्रम स्थापन करण्याचा कधीतरी प्रयत्न केला आहे का? उत्तर नाही हेच आहे. कोरोना काळात मुंबईचे माता रमाबाईनगर असू दे की, छत्रपती संभाजीनगरची वस्ती असू दे, समाजासाठी रा. स्व. संघाचा स्वयंसेवकच 24 तास कार्यरत होता. पण, छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि रमाबाईनगरमध्येही काही मूठभर लोकांनी संघद्वेष केलाच. यावर असे वाटते की, मनवादी म्हणत हिंदूंना शिवीगाळ करणे, रा. स्व. संघाची बदनामी करणे, यातून हे समाजाचे स्वयंघोषित नेते कोणता सामाजिक न्याय प्रस्थापित करतात? यातून कोणता समाजविकास ते करत असतील, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक.

हे सगळे पाहून ‌‘डॉ बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी‌’ या पुस्तकात नानकचंद रत्तू यांनी शेवटचा संदेश शीर्षकाखाली, बाबासाहेबांशी झालेला संवाद लिहला आहे तो स्मरतो. त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, “जे काही मी मिळवू शकलो, त्याचा फायदा मूठभर सुशिक्षितांनी घेतला. पण, त्यांचे विश्वासघातकी वागणे आणि दलित, शोषित लोकांबद्दलची त्यांची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले, असेच म्हणावे लागते. ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे गेले आहेत. ते फक्त स्वतःसाठी आणि त्यांच्या व्यक्तिगत फायद्यांसाठीच जगतात. त्यांच्यापैकी एकही जण सामाजिक कार्य करायला तयार नसतो. ते आत्मघाताच्या वाटेने निघाले आहेत.” 1956 साली बाबासाहेबांचे अंतःकरण ज्या स्वाथ लोकांमुळे विदीर्ण झाले होते, ते लोक कोण होते? त्याबद्दल विचार केल्यावर वाटते की, तेच ते लोक आहेत जे समाजाच्या भोळेपणाचा फायदा घेत, समाजाला इतर समाजाविरोधात भडकवतात. यामुळे समाज इतर समाजापासून एकटा पडतो. समाजाला एकटे पाडण्याचा प्रयत्न करणारे हे तेच लोक आहेत, त्यांना बाबासाहेब नालायक आणि विश्वासघातकी म्हणाले होते. हे लोक बाबासाहेबांचे अनुयायी आहेत असे भासवतात, मात्र, प्रत्यक्षात बाबासाहेबांनी लिहलेल्या संविधानाविरोधी काम करणाऱ्यांचेच ते समर्थन करतात. हे तेच लोक आहेत, जे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी समाजाच्या युवकांना, संविधानयुक्त कायद्याविरोधात रस्त्यावर उतरवतात मात्र, त्याचवेळी स्वतःची लेकरं कशी नेता बनतील, याची तजवीज करतात. अर्थात कुणीही नेत्याने मोर्चाबिर्चा काढून त्यांच्या मुलाबाळांची राजकीय सोय करावी; पण समाजाचा त्यासाठी वापर का करावा? या पार्श्वभूमीवर असे वाटते की, रा. स्व. संघाचा द्वेष करणाऱ्या त्या मूठभर नेत्यांचे आणि त्यांच्या चेल्यांचे आभार मानायला हवेत. कारण, त्यांच्या विरोधाने, मोर्चाने समाजात मंथन सुरू झाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार कार्याचा वारसा नेमकेपणाने कोण चालवत आहे? स्वार्थासाठी समाजाला वेठीस धरणारे समाजाचे स्वयंघोषित मूठभर नेते की, समाज देशाच्या सर्वांगीण विकास आणि एकतेसाठी गेले 100 वर्षे निस्वाथपणे काम करणारा रा. स्व. संघ? एकंदर तो मोर्चा तो विरोध आणि समाजमंथन सुरू झाले आहे!
9594969638

Powered By Sangraha 9.0