मुंबई (अक्षय मांडवकर) – जगात केवळ भारतात सापडणाऱ्या ‘सह्याद्री फॉरेस्ट लिझर्ड’ (Monilesaurus rouxii) या सरड्याच्या संख्येवर सह्याद्रीतील एकसुरी लागवड पद्धतीचा विपरीत परिणाम पडत असल्याचे संशोधनामधून समोर आले आहे (endemic lizard). ‘नेचर कॅन्झर्वेशन फाऊंडेशन’च्या (एनसीएफ) संशोधकांनी कोकणात केलेल्या संशोधनाअंती निचांकी उंचीवरील जंगलांमध्ये (Low Elevation Forests) ‘सह्याद्री फॉरेस्ट लिझर्ड’ची संख्या सर्वाधिक आढळली (endemic lizard). मात्र दुर्दैवाने हाच भाग संरक्षित क्षेत्रांबाहेर असून हाच प्रदेश काजू आणि रबरसारख्या लागवडींसाठी वेगाने नष्ट केला जात आहे (endemic lizard).
भारताच्या पश्चिम घाटातील ओलसर उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांची आणि उभयचरांची विलक्षण विविधता आढळते. यापैकी अनेक प्रजाती या प्रदेशासाठीच प्रदेशनिष्ठ आहेत. याच जंगलात अधिवास करणाऱ्या ‘सह्याद्री फॉरेस्ट लिझर्ड’ या सरड्याला केंद्रस्थानी ठेवून एकसुरी लागवड पद्धतीचा परिणाम सरीसृपांच्या अधिवासावर आणि संख्येवर कशा पद्धतीने होतो, याचा अभ्यास संशोधकांनी केला. या संशोधकांमध्ये निनाद गोसावी, हिमांशू लाड, जिथीन विजयन आणि रोहित नानिवडेकर यांचा समावेश होता. या संबंधीचे संशोधन वृत्त ‘जर्नल आफ झूलाॅजी’ या नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे.
अॅग्रोफॉरेस्ट्री म्हणजेच जंगलांमध्ये अथवा जंगलांसारखीच दिसणारी वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड, उदा. कॉफी, रबर, पाम, काजू इत्यादी यांचा सरीसृपांवराती काय परिणाम होतो याचा अभ्यास फारसा झालेला नाही. सह्याद्री फॉरेस्ट लिझर्ड हा सरडा दिवसा सक्रिय असतो, तर रात्री झाडांच्या आणि लहान झुडुपांच्या फांद्यांवर झोपतो. विश्रांतीच्या या ठिकाणांमध्ये बारीक फांद्या, झुडुपांची पाने, छोट्या झुडुपांच्या फांद्या, झाडांवर चढलेल्या वेली यांची निवड केली जाते. सरड्याच्या झोपेच्या सवयींवरून आणि संख्येवरून आपण त्याच्या सुरक्षिततेबद्दल आणि परिसराच्या आरोग्याबद्दल बरेच काही समजू शकतो. त्यामुळे एकसूरी लागवडीचा परिणाम या सरड्याच्या संख्येवर कसा पडला आहे, याचा अभ्यास संशोधकांनी आंबोली आणि तिलारी अभ्यास जंगलात तसेच जंगलाजवळच्या काजू आणि रबर लागवडींमध्ये केला.
रात्रीचा अभ्यास
पूर्वीच्या काही संशोधनात झाडांवर राहणाऱ्या सरड्यांनी शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी अस्थिर, हलणाऱ्या फांद्यांवर झोपण्याची युक्ती वापरल्याचे आढळले आहे. दिवसा जरी हे सरडे मोजणे कठीण काम असले तरी रात्री मात्र ते झाडांच्या फांद्यांवर स्थिर झोपलेले आढळतात. त्यामुळे 'डिस्टन्स सॅम्पलिंग' ही पद्धत वापरून संशोधकांनी सरड्याची घनता मोजली. रात्री टॉर्चचा वापर करून सरड्यांच्या घनतेचा आणि झोपण्याच्या सवयीचा अभ्यास केला गेला.
अभ्यासाअंतीचे निष्कर्ष
निचांकी उंचीवरील जंगलांमध्ये (Low Elevation Forests) सह्याद्री फॉरेस्ट लिझर्डची संख्या सर्वाधिक आढळली. रबर लागवडींमध्ये सरड्यांची संख्या जंगलांसारखीच दिसली. परंतु काजू लागवडींमध्ये सरड्यांची संख्या खूपच कमी दिसली. काजूच्या आणि रबराच्या बागांमध्ये झाडांचे आवरण जरी असले तरी, झाडांची संरचना ही जंगलासारखी नाही. काजूच्या बागांमध्ये फांद्यांचा पसारा कमी आहे. शिवाय सरड्यांना बसण्यासाठी, वावरण्यासाठी लागणाऱ्या झुडुपांचा देखील अभाव आहे.