मुंबई : ( Devendra Fadnavis and Sharad Pawar ) मुंबई क्रिकेट असोसिएशन (एम सी ए) निवडणूक निमित्ताने पुन्हा एकदा पवार आणि फडणवीस यांच्यात सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. सामना रंगणार की दोन्ही नेते एकत्र येऊन मैदान मारणार हे सध्या गुलदस्त्यात आहे. या निवडणुकीसाठी २७ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची मुदत आहे.भारतातील सर्वात श्रीमंत राज्य क्रिकेट बोर्डापैकी एक असलेल्या एम सी ए ची निवडणूक येत्या १२ नोव्हेंबरला होणार आहे. विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांना ही निवडणूक लोढा समितीच्या शिफारशीनुसार लढविता येणार नाही आहे.
सध्या होणाऱ्या निवडणुकीत चर्चेत असलेली नावे म्हणजे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपा विधानपरिषद आमदार प्रसाद लाड, प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक ,राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे मिलिंद नार्वेकर. पण ज्यांच्या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताकद तोच यात बाजी मारू शकतो असे बोलले जात आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपला मुलगा विहंग सरनाईक त्याचबरोबर भाजपचे प्रसाद लाड यांनीही नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती. तर शुक्रवार दि. २४ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार, आशिष शेलार, अजिंक्य नाईक, मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड हे नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात काही काळ चर्चा झाली असल्याचे समजते. त्यानंतर त्याच दिवशी रात्री १० वाजताच्या सुमारास आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
एम सी ए अध्यक्ष, उपाध्यक्ष यांसह एकूण १६ पदांसाठी तीन वर्षे मुदतीची ही निवडणूक होणार आहे.भारतीय क्रिकेट मधील एक आर्थिक ताकद म्हणून या बोर्डाकडे पाहिले जाते.तेवढी प्रतिष्ठा पण या बोर्डाकडे आहे.सध्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीबाबत राजकारण मुंबईत अन महाराष्ट्रभर तापू लागलं आहे. त्यात या निवडणुकीची भर पडली आहे त्यामुळे नेत्यांची धावपळ अधिकच वाढली आहे.
क्रिकेट आणि राजकारणात एक साम्य आहे ते म्हणजे जनमानसात दोन्ही क्षेत्रांचं असलेले आकर्षण आणि महत्व. दोन्ही क्षेत्रातील एक फरक म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी चांगला खेळाडू असाव लागत ,पण क्रिकेट बोर्डावर जाण्यासाठी चांगला राजकारणी गरजेच असल्याचं मागील सर्व निवडीवरून सिद्ध झाले आहे. म्हणूनच तर स्व. मनोहर जोशी, स्व.विलासराव देशमुख आणि शरद पवार यांनी क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या मोठ्या क्रिकेटपटूंचा पराभव या निवडणुकीत केला आहे.
(मागील इतिहास पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांनी यात २०२२ साली बाजी मारली आहे ती पण शरद पवार यांच्या पाठिंब्यावर. मविआ सरकार गेल्यानंतर बुधवार दि.१९ ऑक्टोबर २०२२ रोजी देवेंद्र फडणवीस,शरद पवार,एकनाथ शिंदे, आशिष शेलार आणि अमोल काळे एकत्र स्टेज वर आले होते ते या निमित्तानेच. यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले होते की ," जेवढा पॉवरफूल हा मंच आहे तेवढ पॉवरफुल दुसर काही असू शकत नाही.क्रिकेटसाठी आम्हा सर्वांची एकत्र राष्ट्रीय क्रिकेट पार्टी आहे.आमच मनापासून क्रिकेट वर प्रेम आहे.बॅरिस्टर शेषराव वानखेडे आमच्या नागपूरचे ,एक लहानसा वाद झाल्यावर त्यांनी एवढ मोठ वानखेडे मैदान उभ केल." )
पण दुर्दैवाने अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नागपूरचे असलेले अमोल काळे हे देवेंद्र फडणवीस यांचे बालपणीचे मित्र आहेत.देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे महापौर होते, त्यावेळी अमोल काळे हे भाजपचे वार्ड अध्यक्ष होते.अमोल काळे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अजिंक्य नाईक अध्यक्षपदी निवडून आले होते. त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित ताकद होती तर विरोधी बाजूच्या संजय नाईक यांच्यामागे आशिष शेलार यांची ताकद होती असे समजते.
मात्र अजून एक चर्चेचा विषय म्हणजे एमसीएला संलग्न फ्रेंड्स क्रिकेट क्लबचे सचिव श्रीपाद हळबे यांनी 'एमसीएला संलग्न २१३ मैदान क्लब्सपैकी १५६ मैदान क्लब्सची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झाली नसल्यामुळे या १५६ क्लब्सचं सदस्यत्व रद्द करून त्यांना आगामी निवडणुकीत मतदान करण्यापासून किंवा निवडणूक लढवण्यापासून रोखावे, अशी मागणी केली आहे. हळबे यांनी निवडणूक अधिकारी जयेश सहारिया यांना पत्र पाठवून हे आक्षेप नोंदवले आहेत. त्यांनी मार्च महिन्यातील क्लब्स आणि त्यांच्या प्रतिनिधींची यादी ग्राह्य धरण्याची मागणी केली आहे. या दाव्यामुळे ऐन दिवाळीत एमसीएच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या.
या निवडणुकीत ' देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार' सामना पुन्हा रंगणार की नाही हे लौकरच समजेल.