
दिवाळीचे दिवस नुकतेच संपले आणि आपण सगळे कामावर रुजू झालो असू. श्रीरामाचे नाव घेतले नाही, अशी एकही दिवाळी आजवर गेली नसेल. सियावर रामचंद्रांच्या कथेत सर्वांत महत्त्वाच्या आहेत सीता माता. लंकेतपर्यंतचा सीतेचा प्रवास विलक्षण आहे. हा प्रवास सुरू होतो तो शूर्पणखेच्या येण्यापासून. ‘सियावर रामचंद्र की जय’ या बालमहानाट्यात दोघींची कामं महत्त्वाची. आजच्या लेखात शूर्पणखेची भूमिका निभावणारी इरा सेखों आणि सीतेच्या भूमिकेत बालमहानाट्यात झळकलेली आराध्या दुरेपाटील यांच्या रंगभूमीवरील अनुभवांचा पट उलगडणारा हा लेख...
इरा ही उंच, सडपातळ, भावनाशील, बुद्धिमान आणि आज्ञाधारक मुलगी आहे. माझ्याशी तिची भेट तीन वर्षांपूव प्रथमच झाली. त्यावेळी ती स्वतःच्या देखभालीविषयी पूर्णतः अनभिज्ञ होती. तिचे केस विस्कटलेले, वाकून बसणे आणि आवाज व देहबोली प्रभावीपणे वापरण्याची जाणच तिला नव्हती. तरीही इरामध्ये काहीतरी वेगळं होतं. तिच्या मनाच्या गाभाऱ्यात दडलेलं काहीतरी असं, ज्याने माझं लक्ष वेधले. ती स्वतःला ओळख करून देण्यासाठी मोकळी होती आणि तिच्या तेजस्वी चेहऱ्यामागे व्यक्त होण्याची शांत आतुरताही जाणवत होती. नाट्यवर्गात आम्ही कधीच मुलांना अभिव्यक्त होण्यासाठी जबरदस्ती करत नाही. आमच्यासाठी नाटक म्हणजे केवळ सादरीकरण नव्हे, तर भावनिक वाढ आणि आत्मशोधासाठी सुरक्षित जागा आहे. इराला बदलवणे हा उद्देश नव्हता, तर तिच्या अनुभवातून तिचा विकास होऊ देणे हाच हेतू होता.
सुरुवातीपासूनच मला जाणवलं की, इराला नाटकाची खूप आवड आहे. तिच्या डोळ्यांत राजकन्येसारखे सुंदर बनण्याचे स्वप्न झळकत होते. मात्र, तिच्या हालचाली मंद होत्या आणि लक्ष एकाग्र करणे कठीण जात होते. मुख्यतः तिच्या बसण्याच्या पद्धतीमुळेच. ती पंजाबी, मराठी आणि हिंदी मिसळून बोलायची, त्यामुळे इतर विद्याथ तिची खिल्ली उडवायचे. तरीही ती धैर्याने बोलत राहिली; पण गैरसमजुतींमुळे तिच्या चेहऱ्यावर दुःख दिसायचे.
तिच्या प्रवासाची सुरुवात मी तिच्या उच्चार आणि स्वतःबद्दलच्या दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करूनच केली. तिला इतर नाटकांमध्ये ‘राजकन्या’, ‘प्रेमळ मुलगी’ आणि ‘शिक्षिका’ अशा भूमिका दिल्या. यामुळे तिच्यात आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि सादरीकरणाचं महत्त्व निर्माण झालं. हळूहळू इराने नाटकातून शिकलेल्या गोष्टी रोजच्या जीवनात वापरायला सुरुवात केली. ती स्वतःकडे लक्ष देऊ लागली आणि तिच्या संवादकौशल्यातही लक्षणीय प्रगती झाली. ही बदललेली इरा सर्वांना दिसू लागली. मात्र, हा विकास आतल्या भावनिक ओढीवर काम केल्याशिवाय शक्य झाला नाही.
‘नवरस’ या उपक्रमात विद्यार्थ्यांना विविध भावना व्यक्त करण्यास प्रोत्साहित केले गेले, जेव्हा प्रत्येकाने आपली सर्वांत आनंदाची आणि सर्वांत दुःखी आठवण सांगायची वेळ आली, तेव्हा इरा रडू लागली. वर्ग स्तब्ध झाला पण, तिला ही वेळ येणार आहे, याची जाणीव आधीपासूनच होती. तिने आपल्या आयुष्यातील भयानक बस अपघात आणि वडिलांना गमावण्याच्या भीतीबद्दल सांगितलं. ती भीती तिच्या मनात खोलवर दडलेली होती आणि तिने कधीच ती व्यक्त केली नव्हती. नाट्यवर्गाच्या त्या सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणातच ती शेवटी मोकळी झाली. त्या दिवसाने तिच्या आयुष्यात खरा बदल घडवला.
त्यानंतर इराने आयुष्य अधिक उत्साहाने स्वीकारले. गेल्या काही वर्षांत नाटकातील विविध भूमिकांमधून ती प्रगल्भ, मोहक आणि भावनापूर्ण झाली आहे. तिची सर्जनशीलता खुलली, संवादकौशल्य विकसित झाले आणि आत्मविश्वास प्रचंड वाढला. आता ती मला नाट्यवर्गात साहाय्य करते, जशी एकेकाळी तिला मदत मिळाली होती. आज इरा व्लॉग आणि लेख लिहिते, प्रमुख भूमिका साकारते आणि नाट्यप्रवासात संपूर्ण मनाने पुढे चालली आहे. तिच्या हृदयात दडलेला प्रकाश आता इतरांना प्रेरणा देणारा झाला आहे.
इराचे अनुभव
इराने नाटकात सहभाग घेतला; कारण तिला नाटकाची खरी आवड आहे. ’सेल्फी’ हे नाटक सांगितले गेले, तेव्हा ती खूप उत्सुक व विचारशील होती आणि कथानकाची दिशा काय असेल, यावर विचार करत होती. ती स्वतःला ‘रेणुका दीदी’ या पात्राशी जोडते. शांत, प्रेमळ, काळजीवाहू आणि मदत करणारी, अशी ती स्वतःची ओळख करुन देते.
‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकातील शूर्पणखा ही भूमिका, तिच्यासाठी जरा आव्हानात्मकच होती. ती रात्री झोपण्यापूव बराच वेळ त्या पात्राच्या हालचाली व देहबोलीबद्दल चिंतन करीत असे.
इरा नाटकातून काय शिकली:
1) हिंदी शब्दसंग्रहात लक्षणीय सुधारणा झाली.
2) कथा व निबंधलेखनात प्रचंड प्रगती; नाटकातील अनुभवांमुळे तिने दोन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले.
3) रामायण व त्यातील पात्रांविषयी अधिक सखोल समज निर्माण झाली.
4) नाटकाने तिला नेतृत्व, सहानुभूती आणि मतभेद सोडवण्याची कला शिकवली.
5) तिने आपला चालण्याचा तोल, सौंदर्य आणि ग्रेसही वाढवली.
6) ती अधिक मनमिळावू आणि हसतमुख झाली.
7) ती नाटक आणि आपल्या नाट्यशिक्षिकेशी भावनिकरित्या जोडलेली आहे आणि ठामपणे सांगते, मी कधीही नाटक सोडणार नाही आणि माझ्या शिक्षिकेला कधीही सोडणार नाही.
इराच्या पालकांचा अभिप्राय
खरंच, इराच्या व्यक्तिमत्त्वात प्रचंड सकारात्मक बदल दिसून येतो. राधिका देशपांडे यांच्याकडे प्रवेश घेतल्यानंतर, ती अधिक मोकळी झाली आहे आणि आत्मविश्वासाने समाजात संवाद साधते. नाटकाने इराला अनेक स्तरांवर मदत केली आहे.
विविध भूमिका साकारताना तिची सर्जनशीलता खुलली. त्यामुळे तिच्या कल्पनाशक्तीचा विकास झाला. परिणामी तिने दोन स्वतंत्र कथा लिहिल्या आणि त्या दोन्हीला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.
राधिकाच्या नाट्यप्रकल्पांत सहभागी झाल्यामुळे, इरा विविध स्वभावांच्या व्यक्तींशी जुळवून घेऊ लागली. तिने संघभावना, शिस्त आणि अनेक मूल्ये शिकली. याचा परिणाम ती शाळेत व बाहेर दोन्हीकडे सहज नवीन मित्र बनवते, अभ्यास आणि नाटक यांमध्ये समतोल राखते आणि तिच्या संवाद कौशल्यात उल्लेखनीय सुधारणा झाली आहे.
आराध्या-सीतेच्या सौंदर्य व शांतीचे मूर्तिमंत प्रतीक
आराध्याने प्रथमच नाट्यवर्गात प्रवेश घेतला आणि त्यानंतर घडलेले सर्व काही विलक्षणच होते. तिला ‘सियावर रामचंद्र की जय’ या भव्य नाटकात मुख्य सीता मातेची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. बाहेरच्याला हे नशीब किंवा एखादा ‘जॅकपॉट रोल’ वाटू शकतो; पण वास्तव त्यापेक्षा खूपच वेगळे होते. या नाटकाच्या यशासाठी सीतेचं पात्र सर्वांत महत्त्वाचे ठरले होते. 75 कुशल विद्यार्थ्यांमधून मी योग्य सीता शोधत होते. अशी व्यक्ती मला हवी होती, जी त्या भूमिकेचे भावनिक आणि आध्यात्मिक ओझं शांततेत व सौंदर्याने सांभाळू शकेल. संपूर्ण कथा सीतेभोवती फिरत असल्याने निवड अतिशय निर्णायक होती.
प्रत्येकवेळी मी आराध्याकडे पाहिले, तेव्हा तिच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच शांतपणा जाणवायचा. तिच्या हास्यातील स्थैर्य आणि सौम्यता, इतरांपेक्षा वेगळी होती. ती संयमी, कोमल आहे. ऊर्जावान नाट्यखेळ किंवा शारीरिक अभिनयात ती फारशी गुंतत नसे; पण भावभावना आणि आवाजाद्वारे व्यक्त होण्याची तिची ताकद उठून दिसली. सीता हे पात्र म्हणजे फक्त एक भूमिका नव्हे, ती सन्मान, शांती, स्थैर्य आणि दैवी उपस्थितीचे प्रतीक आहे. आराध्याने या सर्व गुणांना सहजतेने आत्मसात केले. सीतेची भूमिका मिळाल्यावर ती आनंदित झालीच; पण थोडी शंकाही तिच्या मनात दिसली. मात्र, पहिल्या तालमीपासूनच मला तिच्यात फक्त सीताच दिसली.
आराध्याने पात्र लवकर आत्मसात केलं. नंतर समजलं की, आराध्याकडे आध्यात्मिक आधार आहे. ती नियमित ध्यानधारणा करते. तिने रंगमंचावर प्रवेश, निर्गमन व प्रॉप्स हाताळणं स्वतः ठरवलं. तिचं लक्ष नेहमी आतल्या भूमिकेवर आणि स्वतःच्या शोधावर केंद्रित असायचं. आराध्या नेहमी एकाग्र, आदरयुक्त आणि समर्पित कलाकार राहिली. तिने कधीही वर्तनाबद्दल मला तक्रारीची संधी दिली नाही. आजही मी डोळे मिटले की, सीतेचा चेहरा आराध्याचाच दिसतो.
आराध्याचा अनुभव
आराध्याने अभिनय आणि नाटकाविषयी आपली आवड व्यक्त केली. कथा सांगितल्याव ती विचारपूर्वक त्याचे विलेषण करत होती. जर सीतेने लक्ष्मणरेखा ओलांडली नसती, तर काय झालं असतं? असा प्रश्न विचारत शेवटी निष्कर्ष काढला की, रावणाचं आगमन नियतीने ठरवलं होतं. तिच्या आवडत्या सीता पात्राने तिला तिच्या सौम्य, प्रेमळ आणि सहनशील स्वभावामुळे प्रेरित केलं. आराध्या म्हणते की, ती स्वतः सीतेसारखीच आहे; पण अजूनही तिच्यात काही त्रुटी आहेत ज्या सीतेमध्ये नव्हत्या. भूमिकेच्या तयारीसाठी तिने चाल, चेहऱ्यावरील भाव आणि संवाद यावर काम केलं. तसेच, वडिलांनी दिलेलं पुस्तक वाचलं. तिचा शब्दसंग्रह विशेषतः संस्कृतमूल शब्दांमध्ये सुधारला. तिला वाटतं की, मेकअप आणि पोशाख हे पात्रात पूर्णपणे शिरण्यासाठी आवश्यक साधनं आहेत.
आराध्या विविध भावभावनांद्वारे व्यक्त होणं शिकली आणि इतरांनाही मदत केली. नाटकामुळे तिच्यात संयम आणि आत्मविश्वास वाढला. पूव ती चित्र नक्कल करून काढायची, आता ती स्वतःची मूळ रेखाटनं तयार करते. तिने क्रोशे काम शिकलं आणि या सर्जनशील विकासाचं श्रेय ती नाटकाला देते. अभिनयामुळे ती अधिक आनंदी आणि समाधानी झाली.
आराध्याच्या पालकांचा अभिप्राय
होय, आमच्या मुलीच्या जीवनात कौशल्यात झालेला लक्षणीय बदल अनुभवला आहे. आत्मविश्वास, सार्वजनिक संभाषण आणि संघभावना यात तिची प्रगती झाली आहे.
आम्ही लक्षात घेतलेली प्रगती :
1. सर्जनशील विचारशक्ती - तत्काळ परिस्थितीत विचार करून, कल्पकतेने प्रतिसाद देण्याची क्षमता वाढली.
2. आंतरवैयक्तिक कौशल्य: सहकार्याने काम करणं आणि सामूहिक उद्दिष्ट साध्य करणं शिकली. तसेच आव्हानांचा आनंदाने स्वीकार करणारा दृष्टिकोन विकसित झाला.
3. संवादकौशल्य : विचार आणि कल्पना स्पष्टपणे मांडण्याची क्षमता वाढली. स्वतःला आत्मविश्वासाने व्यक्त करण्याची सवय लागली आणि लक्षपूर्वक ऐकून प्रतिसाद देण्याची कला शिकली.
शूर्पणखा आणि सीताचा प्रवास रामायणात आपण पाहिला असेलंच पण, त्या भूमिका साकारताना मुलांनी केलेला प्रवास आज तुम्ही वाचला. भूमिका कोणतीही असो, मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता नाट्यकलेत आहे. भूमिका मोठी आहे म्हणून, कलाकार मोठा होतोच असं नाही. पण कलाकार मेहनती असला, तर ती भूमिका प्रभावीरित्या आपल्यापर्यंत पोहोचवतो. इरा आणि आराध्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांना मोठं करून गेला.
- रानी राधिका देशपांडे
[email protected]