महाराष्ट्रात प्रथमच 'व्हाईट लोर्ड-राखी कोतवाला'चे दर्शन; मुंबईतील या डोंगरावर झाले दर्शन

25 Oct 2025 09:21:37
white-lored ashy drongo



मुंबई (अक्षय मांडवकर) -
जगात प्रामुख्याने आग्नेय आशियात आढळणाऱ्या राखी कोतवाल पक्ष्याच्या एका उपप्रजातीचे महाराष्ट्रात प्रथमच दर्शन झाले आहे (white-lored ashy drongo). 'व्हाईट-लोर्ड' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपप्रजातीचे दर्शन गुरुवार दि. २३ आॅक्टोबर रोजी मुंबईतील मनोरी येथे झाले (white-lored ashy drongo). या नोंदीमुळे मुंबईमध्ये टिकून राहिलेल्या हिरवाईत अजूनही दुर्मीळ पक्षी अधिवासाला येत असल्याचे समोर आले आहे (white-lored ashy drongo).


कोतवाल म्हणजेच 'ब्लॅक ड्राॅंगो' हा पक्षी आपल्याला परिचित आहे. काळ्या रंगामुळे आणि दुभंग शेपटीमुळे आपल्याला हा पक्षी ओळखता येतो. या पक्ष्यामधील राखी कोतवाल म्हणजेच 'अॅशी ड्राॅंगो' ही प्रजात महाराष्ट्रात स्थलांतरी पक्ष्यांमध्ये येते. राखी कोतवाल हा पक्षी हिमालयाच्या पायथ्याशी प्रजनन करतो आणि हिवाळ्याच्या तोडांवर तो महाराष्ट्रात स्थलांतर करुन येतो. आॅक्टोबरमध्ये हे पक्षी महाराष्ट्रात दाखल होतात आणि मार्चमध्ये परत निघून जातात. हा पक्षी जंगलात आल्यावर काळ्या कोतवाल पक्ष्याला जंगलामधून हुसकावून लावतो. जगभरात राखी कोतवालाच्या १५ उपप्रजाती आढळतात. शरीरावरील विशिष्ट खुणा आणि रंगछटा यावरुन त्या उपप्रजाती ओळखता येतात. या उपप्रजाती वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये सापडतात. यामधील 'व्हाईट-लोर्ड' या नावाची आग्नेय आशियातील देशांमध्ये आढळणारी उपप्रजात मुंबईत गुरुवारी पक्षीनिरीक्षक दक्षेश आशरा यांना आढळून आली. ही उपप्रजात यापूर्वी मध्यप्रदेशात आढळून आली होती. मात्र महाराष्ट्रात ती पहिल्यांदाच आढळल्याची माहिती पक्षी अभ्यासक आदेश शिवकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.


'व्हाईट-लोर्ड' ही प्रजात नावाप्रमाणेच पांढरट राखाडी रंगाची असते. डोळे लालसर रंगाचे असतात. डोळ्यांभोवती पांढऱ्या वर्तुळाची झाक असते. त्यामुळे ही उपप्रजात राखी कोतवालाच्या इतर उपप्रजातींपेक्षा पटकन लक्षात येणारी असल्याचे शिवकर सांगतात. ही उपप्रजात आग्नेय चीनमध्ये विशेषतः यांग्त्झे नदीच्या दक्षिणेस फुजियान आणि ग्वांगडोंगच्या सीमेपर्यंत प्रजनन करते. तर हिवाळ्यात हेनान, दक्षिण इंडो-चायना, मध्य आणि दक्षिण थायलंड आणि मलय द्वीपकल्पात स्थलांतर करते. अशा परिस्थितीत भरकटलेल्या अवस्थेत ही उपप्रजात मुंबईत आल्याची शक्यता शिवकर यांनी वर्तवली आहे.


पश्चिम मुंबईमधील मनोरी येथे समुद्राला लागूनच असणाऱ्या मनोरी हिल्स परिसरात आम्ही २३ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता पक्षीनिरीक्षणासाठी गेलो होतो. त्यावेळी तिथल्या उघड्या माळावर आम्हाला एक पक्षी दिसला. सुरुवातीला तो राखी कोतवाल वाटला. मात्र, सूक्ष्म निरीक्षणाअंती तो पक्षी राखी कोतवालची उपप्रजात असल्याचे लक्षात आल्यावर त्याची छायाचित्र टिपली. त्यानंतर आदेश शिवकर यांच्याकडून या उपप्रजातीची ओळख पटवून ती 'व्हाईट-लोर्ड' उपप्रजात असून महाराष्ट्रात तिचे पहिल्यांदाच दर्शन झाल्याचे निदर्शनास आले. - दक्षेश आशरा, पक्षीनिरीक्षक
Powered By Sangraha 9.0