ग्रंथसेवकांची नाबाद शंभरी!

25 Oct 2025 14:11:48

Shridhar Vasudev Phatak Library
 
मुंबईच्या विलेपार्ले येथील ‘लोकमान्य सेवा संघ’ संचालित श्रीधर वासुदेव फाटक ग्रंथसंग्रहालयाने १००व्या वर्षात नुकतेच पदार्पण केले. शनिवार, दि. १८ ऑटोबर रोजी शताब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशनाचा सोहळासुद्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. काळाच्या ओघात वाचनसंस्कृतीमध्ये आलेले परिवर्तन लक्षात घेता, ‘श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालया’ने गाठलेला शंभरीचा टप्पा अनेक ग्रंथालयांसाठी, पुस्तकप्रेमींसाठी आशादायक तर आहेच, मात्र त्याचसोबत पुस्तकांच्या व्यापारविश्वामध्ये नवीन प्रयोग करणार्‍या अनेकांसाठी मार्गदर्शकसुद्धा आहे.
 
महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीला प्रबोधन परंपरेचा जाज्वल्य इतिहास लाभलेला. लोकहितवादी, नाना शंकरशेट यांच्यापासून ते लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे, समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे अशा अनेक विभूतींच्या शब्दाला प्रमाण मानून असंख्य लोकांनी समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. ब्रिटिश शासनकाळात एका बाजूला समाजाला अन्यायकारक व्यवस्थेच्या जाचातून मुक्त तर करायचे होतेच, परंतु त्याचबरोबर समाजाला साक्षर करत, राष्ट्रउभारणीसाठी तयारदेखील करायचे होते. अशा दोन्ही वाटांवर समाजाला घडवताना, एक वेगळी वैचारिक घुसळण महाराष्ट्रामध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येते. एखादे राष्ट्र जर सक्षम करायचे असेल, तर केवळ नागरिक घडवून चालत नाही, तर विचारी नागरिक घडवणे अत्यावश्यक असते. ही विचारी नागरिक घडवण्याची चळवळ २०व्या शतकाच्या सुरुवातीला भारतभर आपल्याला बघायला मिळाली.
 
अर्थात, या चळवळीचे केंद्रस्थान होते, महाराष्ट्र. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी भारावून गेलेल्या या भूमीने देशासाठी त्याग करणार्‍यांची पिढीच जन्माला घेतली. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित होऊन लोकजागृती आणि लोकहितासाठी दि. ११ मार्च १९२३ रोजी पार्ले येथे ‘लोकमान्य सेवा संघा’ची स्थापना करण्यात आली. सर्व स्तरांतील लोकांनी एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने सुरू झालेल्या या संस्थेने लोकसाक्षरतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. ज्या हेतूने ही संस्था स्थापन झाली, त्यात वाचनालय आणि व्यायामशाळा हे दोन महत्त्वाचे घटक. शारीरिक सामर्थ्यासाठी व्यायामशाळा महत्त्वाच्या आहेत; त्याचबरोबर नागरिकांचे रुपांतर विचार करणार्‍या नागरिकांमध्ये व्हावे, यासाठी ग्रंथसंग्रहालयेदेखील महत्त्वाची आहेत. यातूनच १९२५ साली श्रीधर वासुदेव फाटक ग्रंथसंग्रहलय वाचकांच्या सेवेसाठी सज्ज झाले. सुरुवातीला या ग्रंथालयाचे ५० वर्गणीदार होते व या ग्रंथसंग्रहालयात केवळ ७०० पुस्तके होती. मात्र, येणार्‍या काही दशकांमध्ये या ग्रंथसंग्रहालयाचा चेहरामोहरा तर बदललाच, परंतु त्याचबरोबर वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याचे कामदेखील या ग्रंथालयाने पार पाडले.
 
ग्रंथालय उभं राहतं, ते त्या ग्रंथचळवळीसाठी काम करणार्‍या माणसांमुळे. असे अनेक दिग्गज कार्यकर्ते, ग्रंथप्रेमी या ग्रंथसंग्रहालयाला लाभले, ज्यांमुळे पार्ल्याची ही सांस्कृतिक सृष्टी उभी राहिली. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. पुलंचे आजोबा वामन मंगेश दुभाषी, ज्यांचं टोपणनाव होतं ‘ऋग्वेदी.’ अशांच्या सहवासामुळे, सहकार्यामुळे श्री. वा. ग्रंथसंग्रहालयाने प्रगतीची नवीन शिखरं गाठली. रियासतकार सरदेसाई, पा. वा, काणे, मामा वरेरकर, न. रा. फाटक यांच्यापासून ते अगदी फिरोज रानडे, सुमेत्रा भावे, मधु मंगेश कर्णिक, विजय तेंडूलकर अशा दिग्गजांच्या मांदियाळीत या संस्थेचा वटवृक्ष बहरत राहिला.
 
अनेक दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह आपल्याला या वास्तूमध्ये बघायला आणि अनुभवायला मिळतो. महाराष्ट्राला जशी ग्रंथकारांची, ग्रंथांची समृद्ध परंपरा आहे, अगदी तशीच समृद्ध परंपरा आहे, मासिकांची, साप्ताहिकांची, दिवाळी अंकांची. आजसुद्धा दिवाळी अंकांच्या खरेदीसाठी बाजारात असलेली गर्दी आणि दर्दी याच गोष्टीचे द्योतक आहे. वाचकांपर्यंत दिवाळी अंक पोहोचवण्यासाठी स्वतंत्र हॉलमध्ये दिवाळी अंक मांडणारे हे बहुदा जगातील पहिलेच ग्रंथसंग्रहालय म्हणावे लागेल! दिवाळी अंक, वाचण्यासाठी नेणं असो किंवा दिग्गज लेखकांची पुस्तकं वाचण्यासाठी घरी नेणं असो. एकेकाळी या ग्रंथसंग्रहालयात या दोहोंसाठी रांग लागत असे. या ग्रंथालयाने अनेक वाचकांची तृष्णा भागवली आहे. दिवंगत लेखक मारुती चितमपल्ली यांच्या इतका वन्यजीवावर अभ्यास असलेला लेखक सापडणे कठीणच. तेसुद्धा जेव्हा एकदा रवींद्रनाथांची कविता शोधत होते, तेव्हा त्यांचा शोध याच ग्रंथसंग्रहालयात संपला.
 
या ग्रंथालयाचे वैशिष्ट्य म्हणजे, या ग्रंथालयात सर्वांना मुक्त प्रवेश आहे. वाचकांना जो ग्रंथ हवा आहे, त्यासाठी ते पुस्तकांच्या जगामध्ये अत्यंत मोकळेपणाने वावरू शकतात. या ग्रंथसंग्रहालयाला १९९८ या वर्षाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार मिळाला. मराठी, इंग्रजी, संस्कृत, हिंदी अशा चारही भाषांमध्ये हजारोंच्या संख्येने असलेले साहित्यसंचित आजदेखील वाचकांसाठी उपलब्ध आहे. ग्रंथ संग्रहालयाच्या समृद्ध वाटचालीमागे असंख्य राबणारे हात कार्यरत आहेत.
श्री. वा. ग्रंथ संग्रहालयाच्या ग्रंथपाल मंजिरी वैद्य यावर भाष्य करताना म्हणतात की, "आमच्याइथल्या कर्मचार्‍यांना एखादे पुस्तक सापडले नाही, तर ते ‘मला माहीत नाही,’ असे उत्तर कधीच देत नाहीत. पुस्तकाचा शोध सुरू होतो; वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही पुस्तक सभासदांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच वाचकांचं आणि आमच्या ग्रंथसंग्रहालयाचं नातं एका कुटुंबाप्रमाणे आहे.”
 
एखादी गोष्ट काळाचा इतका मोठा अवकाश व्यापून टिकून राहते, याचा अर्थ ती गोष्ट किंवा ती संस्था आपल्यामध्ये सातत्याने परिवर्तन घडवून आणते, हा होतो. सभासदांची सोय आणि काळाची गरज ओळखून नोव्हेंबर २००८ पासून ग्रंथालय संपूर्ण दिवस वाचकांसाठी खुले केले गेले. या बदलामुळे गृहिणी, अभ्यासक, विद्यार्थी तसेच पार्ले उपनगराच्या जवळपास राहणार्‍या वाचकांना सोयीचे झाले. काळानुसार यंत्रयुगाकडे वाटचाल करणे आवश्यक असल्यामुळे २००७ ग्रंथालयाचे संपूर्ण सांगणकीकरण करण्यात आले. त्याचबरोबर संपूर्ण ग्रंथालय वातानुकूलित करण्यात आले.
 
कुठलेही साहित्यविश्व वृद्धिंगत करण्याची जबाबदारी त्या त्या भाषिक समूहाची असते. ही जबाबदारीदेखील श्री. वा. ग्रंथसंग्रहालयाने अत्यंत चोखरित्या पार पाडली आहे. या ग्रंथसंग्रहालयामध्ये नियमितपणे पुस्तक प्रकाशनाचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचबरोबर नवकवींना उत्तेजन देण्यासाठी पुरस्कार दिले जातात. समाज म्हणून एकत्र येण्याची व सृजनाला बळ देण्याची ही प्रक्रिया आशादायक आहे.
 
भाषिक व्यवहार, ग्रंथालयांची नियमितता अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर समाजामध्ये घुसळण सुरू असताना, आज एका संस्थेने शंभरीचा टप्पा पूर्ण केला आहे. हा प्रवास सुसह्य झाला, तो वाचक आणि ग्रंथप्रेमींच्या सहयोगामुळे आणि वाचनसंस्कृतीवरच्या प्रेमामुळे. येणार्‍या काळातील मराठी वाङ्मय विश्वाच्या प्रवासासाठी, श्री. वा. ग्रंथसंग्रहालयाच्या उत्कर्षाचा आणि कार्यपद्धतीचा विचार सार्‍यांनीच करायला हवा.
Powered By Sangraha 9.0