नोकरी सांभाळून ग्रंथसंपदा अभ्यासून त्यांना रोजच्या जीवनात आचरणात आणणार्या सावळीराम तिदमे यांच्याविषयी...
एखादा मनुष्य स्वतःला चाकोरीबद्ध ढाच्यात बसवून त्यालाच आपले आयुष्य समजतो. अशा व्यक्ती समाजासाठी कधीच प्रेरणास्रोत ठरत नाहीत. पण, समाजात असेही काही लोक आहेत की, त्यांचे संपूर्ण आयुष्यच समाजासाठी कायमस्वरूपी प्रेरणास्रोत ठरतात. याच पठडीतल्या सावळीराम तिदमे यांना १९७८-७९ सालापासून विविध दैनिकांमध्ये पत्रलेखनाचा व वाचकांची मनोगतं वाचण्याचा छंद लागला. त्यामुळे वाचन, मनन, चिंतन, स्मरण व लेखन हे त्यांच्यासाठी सुहृद आत्मीय बनले. या सततच्या लेखनाने अंशवेळ वार्ताहर म्हणून त्यांना एका दैनिकात लिखाणाची संधी मिळाली. तसेच, दिग्गज साहित्यिकांचे वाड्मय वाचण्याचेही त्यांना वेड लागले.
१९७९ साली पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय कार्याचा त्यांना स्पर्श झाला. येथे नियमित जाण्यास सुरुवात केल्यानंतर संस्कृत भाषा शिकण्याची त्यांच्यामध्ये ओढ निर्माण होत भावभक्ती व कृतीभक्तीचे विशेष आकर्षण निर्माण झाले. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे विचार, उपासना व जीवनप्रणालीमुळे मेंदू, मन, बुद्धी, ज्ञानेंद्रिये व प्रतिभेला तिदमे यांनी कवेत घेतले. त्यातूनच स्वाध्याय कार्यावर स्तंभलेखनाचा श्रीगणेशा झाला. ग्रंथसंपदा अभ्यासायची व त्यावर स्मरण, मनन, चिंतन करून लिहायचे. पण, स्वाध्याय कार्यात कृतिशील बनून अनुभव घेतल्यानंतर हृदयंगम व अविस्मरणीय अनुभव अक्षरांकित करून प्रकाशित करण्याची सततची सवय वृद्धिंगत होत गेली. त्यातूनच विविध दैनिकांमध्ये प्रासंगिक लेख व लेखमाला सुरू झाल्या. स्वाध्यायामुळे इतरांचे सद्गुण शोधून आत्मसात करण्याचे कसब प्राप्त झाले. यातूनच स्वतःमधील दोष, दुर्गुण शोधून त्यांना बाहेर काढण्याचा उद्योग सुरू झाला. भावफेरी, भक्तिफेरी करताना सुसंवाद कौशल्य अवगत झाले. परिणामी चिंतन, व्याख्यान, प्रवचन देण्याचे कसब अंतरंगात पाझरत आणि भिनत गेले. वाणी व लेखणीला भक्तीचा रंग आणि सुगंध लाभला.
निःस्वार्थ आणि उदात्त भावाने काम करण्याचा ध्यास लागला. स्वाध्यायामुळेच दररोजचा सूर्योदय व सूर्यास्त बघत त्याचे रसग्रहण करून शब्दबद्ध करणे हा छंद विकसित होत गेला. ब्रह्ममुहूर्ताला उठून अंतर्मुख व्हायचे, श्वासदेवाच्या रथात मनोदेवतेला स्थानापन्न करून देह मंदिरात अंतर्यात्रा करायची, ही अंतरंगी साधना केल्याने स्रवलेले अक्षरधन अंतर्नाद स्वरूपात दररोज सूर्योदयाच्या अगोदर असंख्य सुहृदांना पाठवायचे, या छंदाची सहा वर्षे नुकतीच पूर्ण झाली. मनःशांती, प्रसन्नता, उत्साह, आनंद व समाधान या अमृतशलाका केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या घटना, प्रसंग, अनुभवांचा यात समावेश असतो. नाशिकच्या रामकुंडाजवळील वसंत व्याख्यानमालेचे ते दहा वर्षे पदाधिकारी होते. प्रारंभी निवेदन व वक्ता आला नाही, तर व्याख्यान देण्याची समयसूचकता साधली. रांगोळी निरीक्षणाचा छंद जोपासला. वर्षभर विविध सण, समारंभ, उत्सव, कार्यक्रमाप्रसंगी काढलेल्या रांगोळीचे बारकाईने निरिक्षण, त्यातील सौंदर्यस्थळांचे व कलात्मकतेचे रसग्रहण करण्यास त्यांना आवडते.
यासोबतच आकाशातील चांदण्या मोजण्याचा खेळही त्यांना आवडतो. पाऊस बघणे, अनुभवणे म्हणजे मनाला आनंद देणारी बाब असल्याचे ते म्हणतात. रिमझिम, मुसळधार, कोसळधार, गारांचा पाऊस, ढगांच्या गडगडाटासह धावणार्या जलधारा, दवबिंदूप्रमाणे अत्यंत बारीक थेंबांचा पाऊस, केसांप्रमाणे बारीक तुषारांचा शिडकावा करणारा पाऊस अशा पावसाची अनेक रूपे ते अनुभवतात. अंदमानला बोटीने जाताना दोन रात्री समुद्रातून आकाश निरीक्षणाचा त्यांनी भरभरून आनंद घेतला. चंद्रप्रकाशातील, सूर्यप्रकाशातील, सूर्योदयापूर्वीचा आणि सूर्योदयानंतरच्या समुद्राच्या रूपातील सौंदर्य, माधुर्य मनाला शांती देणारे असल्याचे ते म्हणतात. लेखनाच्या छंदाने त्यांच्यावर पूर्ण ताबा मिळविल्याने ते आता लिहिल्याशिवाय जगू शकत नसल्याचे म्हणतात. आतापर्यंत त्यांची दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील चार स्वाध्याय कार्यातील अनुभवांची तर इतर संतचरित्रे आहेत.
तसेच अप्रकाशित अक्षरसंपदादेखील भरपूर शिल्लक आहेत. यासोबतच स्वच्छता करणे, वृक्षलागवड करून संगोपन करत त्यांनी ४०० झाडे वाढविली. तसेच, शॉपिंग ग्राऊंड, जुने सिडको येथे वृक्षदेवांना जलाभिषेक करणे त्यावेळी गीता अध्याय, त्रिकाल संध्या, हरिपाठ, मनाचे श्लोक म्हणणे, अभंग, गाणे हादेखील त्यांचा विलक्षण प्रेरणादायी छंद आहे. तसेच, साहित्यिक कार्यक्रमांचा आस्वाद घेणे, माणसं जोडणे, संमेलनास हजर राहून प्रत्येक घटकाशी वैयक्तिक सुसंवाद करून त्यावर लेखन करायला त्यांना फार छान वाटते. दिवाळी अंक वाचनाचा छंद आतून अक्षरसमृद्ध करत असल्याचे ते म्हणतात. ‘एचएएल’ येथील सेवेत असताना ३३ वर्षे सुविचार फलक लेखनाचा संस्कार त्यांनी जोपासला. वाचन, चिंतन व लेखनातून त्यांनी स्वतः तयार केलेला आठ ते दहा ओळींचा सुविचार अशी त्यांची पद्धत होती. निवृत्तीच्या काळात निःस्वार्थ सेवा यावर ते एकाग्र आहेत. स्वाध्याय कार्य हा त्यांचा श्वास आणि ध्यास आहे. ज्ञान, कर्म व भक्तीच्या प्रकाशात जगण्याची मौज काही औरच असल्याचेही ते मानतात. २०२० साली समृद्धी प्रकाशन संस्थेच्यावतीने देण्यात येणार्या ‘संत नामदेव’ या साहित्याला राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. अशा या अनेक गोष्टी एकाच आयुष्यात पूर्ण करणारे तपस्वी सावळीराम तिदमे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
- विराम गांगुर्डे