‘प्रेमाची गोष्ट 2.0’ Review : दुसर्‍या संधीच्या ‘प्रेमाची गोष्ट’

25 Oct 2025 14:21:44

 
जर आपल्याला देवाने आयुष्यात दुसरी संधी दिली तर... असा विचार प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी नक्कीच डोकावून जातो. कारण, आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात केलेली कोणती ना चूक सुधारावी, असे वाटत असते. पण, खरंच हे कल्पनेतलं, ‘जर-तर’चं स्वगत सत्यात उतरलं तर... हाच विषय आहे ‘प्रेमाची गोष्ट २’ या मराठी चित्रपटाचा.
 
दिग्दर्शक सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘प्रेमाची गोष्ट १’ हा चित्रपट अनेकांनी पाहिलेला असेल आणि त्यामुळेच या दुसर्‍या भागाचीही चाहत्यांना उत्सुकता होती. दिवाळीत दि. २१ ऑटोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या भागातील अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे यांची जोडी आणि गोड प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. यावेळी अभिनेता ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिद्धिमा पंडित यांची प्रेमाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. तेव्हा हा चित्रपट नक्की कसा आहे, ते पाहूया...
 
बरेचदा आपण चित्रपटात पाहतो की, सुरुवातीला अनोळखी नायक आणि नायिका एकमेकांना भेटतात; मग ते प्रेमात पडतात आणि शेवटी त्यांचं लग्न होतं. पण, ‘प्रेमाची गोष्ट २’ मध्ये एक ट्विस्ट आहे. इथे सुरुवातीलाच नायिका नायकाला लग्नासाठी विचारते आणि लग्न होतंदेखील. पण, प्रेमाची गोष्ट अधुरीच राहते. गोष्ट आहे, अर्जुन मापुस्कर (ललित प्रभाकर), मेरी डिसुजा (ऋचा वैद्य) आणि प्रिया कारखानीस (रिद्धिमा पंडित) यांची.
 
अर्जुन, मेरी आणि प्रिया हे एकाच शाळेतील बालपणीचे मित्र. प्रिया ही फारशी संपर्कात नव्हती, पण एक दिवस अचानक तिची या दोघांशी भेट होते. मेरीच्या घरी तिच्या लग्नाची बोलणी सुरू असतात. पण, तिला अर्जुनशी लग्न करायचं असतं. प्रिया ही अर्जुनची बालपणीची ‘क्रश’ असते. अशा प्रकारे सुरुवातीलाच कथेत एक ‘ट्विस्ट’ आहे. मैत्रीण ही प्रेयसी आणि बायको होते, तेव्हा अर्जुनची झालेली द्विधा मनस्थिती पुढे चित्रपटात पाहायला मिळते. महाविद्यालयीन जीवन आणि प्रत्यक्षात वैवाहिक जीवन यात प्रचंड विरोधाभास असतो. तेव्हा अर्जुनला नक्की काय चूक सुधारायची आहे? आणि तो कशासाठी दुसरी संधी मागतोय, हे सगळं तुम्हाला चित्रपटातच पाहावं लागेल.
 
पण, या परिस्थितीत अर्जुनला मदत करण्यासाठी स्वतः देवालाच यावं लागतं. यासाठी देव त्याच्या खास दूतांना पाठवतो. ते म्हणजे, अभिनेता स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम. पुढे अर्जुनला त्याच्या खर्‍या प्रेमापर्यंत पोहोचवण्यासाठी ते मदत करतात. प्रिया की मेरी? अर्जुनचं खरं प्रेम कोणावर आहे, याची जाणीव ते अर्जुनला करून देतात आणि त्यामुळे देवाचं ‘प्लॅनिंग’ कधीच चुकत नाही याची प्रचिती पुन्हा एकदा होते.
 
पहिल्या भागाप्रमाणेच याही भागाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी केले आहे. पहिल्या भागात दोन घटस्फोटितांच्या प्रेमाची गोष्ट दाखवण्यात आली होती, तर यावेळी प्रेमाच्या दुहेरी मनस्थितीत अडकलेल्या अर्जुनची गोष्ट आहे. पण, चित्रपटाच्या पूर्वार्धात गोष्ट समजून घेताना नक्कीच अनेकांची धांदल उडू शकते. नेहमीच्या धाटणीतील नायक-नायिका असले, तरी त्यांची गोष्ट फार निराळी. सतीश राजवाडे हे प्रेमकथांसाठी प्रसिद्ध आहेतच. मग ‘मुंबई-पुणे-मुंबई’ असो किंवा ‘प्रेमाची गोष्ट’; त्यांचे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांनी उचलून धरले आहेत. पण, तरीही ‘प्रेमाची गोष्ट २’मध्ये बर्‍याच गोष्टी या काहीशा हरवलेल्या जाणवतात. बरेच संवाद आणि दृश्य ही रटाळ वाटू शकतात. पण, उत्तरार्धात या गोष्टींचा समतोल राखण्यात चित्रपटाला यश येतं आणि गोष्ट वेगाने पुढे जाते.मैत्री, नाती, प्रेम आणि भावभावना यांची गुंतागुंत दिग्दर्शकाने लीलया मोठ्या पडद्यावर साकारली आहे.आजच्या काळातील नात्यांची बदलती समीकरणंही मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.
  
चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिद्धिमा पंडित, स्वप्नील जोशी, भाऊ कदम या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. ललितचा अर्जुन प्रेक्षकांना नक्कीच भावतो. ऋचा वैद्यचा निरागसपणा प्रेक्षकांनाही भुरळ घालणारा असा. स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम या जोडीने वेगळीच मजा आणली आहे. एकंदरीतच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. चित्रपटात ‘ओल्या सांजवेळी’ हे सुपरहिट गाणं रोडट्रिपवेळी ऐकायला मिळतं; जे पहिल्या भागातील प्रचंड गाजलेलं गाणं होतं, त्याला नव्याने पुन्हा एकदा सादर केलं आहे. पुन्हा पुन्हा ऐकावं, असं हे गाणं. याशिवाय, ‘ये ना पुन्हा’ हे गाणंही तितकच सुंदर आहे. चित्रीकरणासाठी छान लोकेशन्सचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे चित्रपट मोेठ्या पडद्यावर अधिकच खुललेला दिसतो.
 
पहिल्या चित्रपटाचे काही पूर्वग्रह घेऊन हा चित्रपट पाहायला जात असाल, तर नक्कीच तुमची निराशा होऊ शकते. पहिल्या भागापेक्षा हा चित्रपट फार वेगळा आहे. एका दाक्षिणात्य चित्रपटाचा हा ‘रिमेक’ असल्याचंही म्हटलं जातं. पण, निर्माते आणि दिग्दर्शकांनी यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तेव्हा मराठीत एखादी सुंदर प्रेमकहाणी पाहायची असेल, तर हा चित्रपट तुम्ही नक्की पाहायला जाऊ शकता.
 
दिग्दर्शक : सतीश राजवाडे
निर्माते : संजय छाब्रिया, अमित भानुशाली
सादरकर्ते : एव्हरेस्ट एन्टर्टेन्मेंट
कलाकार : ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिद्धिमा पंडित, स्वप्नील जोशी, भाऊ कदम
पटकथा लेखक : अभिजीत गुरू

- अपर्णा कड
 
 
Powered By Sangraha 9.0