मुंबई : (Prashant Bankar) साताऱ्यातील फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आरोप केलेल्या प्रशांत बनकर याला पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. शनिवारी पहाटे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहित “माझ्या मरणास पोलीस निरिक्षक गोपाल बदने जबाबदार आहे, ज्याने ४ वेळा माझ्यावर अत्याचार केले. तसेच, प्रशांत बनकर यानेही मागच्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला," असा आरोप केला होता. त्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले होते.
त्यानंतर प्रशांत बनकर (Prashant Bankar) याला पुण्यातून पहाटे अटक करण्यात आली आहे. तो त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसमध्ये लपून बसल्याची माहिती आहे. त्याला शोधण्याकरिता पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. सध्या त्याला फलटण पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी पोलीस निरीक्षक गोपाल बदने अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
डॉक्टरच्या हातावर नाव कुणी लिहिले?
प्रशांत बनकर (Prashant Bankar) याच्या आई-वडिलांनी त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. "माझा मुलगा हा पुण्याला असतो. दिवाळीनिमित्त तो चार पाच दिवस घरी आला होता. मॅडम आमच्या मुलावर असा अन्याय करतील असे वाटलेच नव्हते. पण त्यांनी मुद्दाम असे करून आमच्या मुलावर अन्याय केला आहे. त्या महिलेनेच हातावर नाव लिहिले की, दुसऱ्या कुणी मुद्दाम नाव लिहिले? आमच्या मुलाचा रेकॉर्ड चांगला आहे. कुणाच्यातरी दबावाखाली हे नाव लिहिले का? याचा शासनाने तपास करावा," बनकर यांच्या आईवडीलांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला डॉक्टर प्रशांत बनकर यांच्या घरी भाड्याने राहत होत्या. "डॉक्टर तरुणी मानसिक तणावात असायच्या आणि त्यांच्या वागणुकीतून ते दिसत होते. त्या आमच्या घरात अगदी घरच्यांसारख्या राहत होत्या. त्या नोकरीतील त्रासाबद्दलही आमच्या घरात सांगायच्या. त्या खूप टेन्शनमध्ये असायच्या. त्या वारंवार प्रशांतला फोन करत होत्या," असा दावा प्रशांत बनकर यांच्या बहिणीने केला आहे.
चार दिवसांची पोलिस कोठडी
प्रशांत बनकर याच्या अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी ७ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. दरम्यान, आता त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....