मुंबई : (Piyush Pandey ) भारतीय जाहिरात विश्वामध्ये आपल्या सर्जनशीलतेची छाप सोडणारे प्रतिभावंत शिल्पकार पियुष पांडे यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवार दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे जाहिरात विश्वार शोककळा पसरली असून अनेक दिग्गजांनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
भारतीय जाहिरात विश्वाला कलाटणी देणाऱ्या पियुष पांडे यांचा जन्म १९५५ साली जयपूर येथे झाला. तरुणपणी क्रिकेट खेळणाऱ्या पियुष पांडे (Piyush Pandey ) यांनी काही काळ बांधकाम मजूर म्हणून देखील काम केले होते. १९८२ साली, वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी ओगिलवी या संस्थेमध्ये प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश भारतीय जाहिरात विश्वामध्ये आमूलाग्र बदल घडवणारा ठरला. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी ओगिलवी इंडियामध्ये अधिकाराची पदं सांभाळली. आपल्या या कारकीर्दीमध्ये त्यांनी पाश्चिमात्य केंद्रीत जाहीरातींपासून जाहीरात विश्वाला दूर नेत, भारतीय दृष्टी आणि भावनिक आशय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या जाहीराती अत्यंत साध्या, सोप्पया मात्र तरीही कोट्यावधी भारतीयां च्या मनाला स्पर्श करणाऱ्या होत्या. एशियन पेंट्ससाठी ' हर खुशी मे रंग लाए ' कॅडबरीसाठी ' कुछ खास है', ठंडा मतलब कोका कोला, फेव्हीकोल का जोड, या आणि अशा असंख्या जाहीरातींच्या निर्मितीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या याच कार्यासाठी २०१६ साली पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
शब्दांचा किमयागार, साक्षेपी व्यक्तिमत्वाला मुकलो
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ लेखक पियुष पांडे (Piyush Pandey ) यांना श्रद्धांजली
'अबकी बार, मोदी सरकार! या चारच शब्दांत दिवंगत पांडे यांनी जगातील एका मोठ्या लोकशाही राष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकीत आगळी किमया साधली. अनेक कंपन्यांच्या उत्पादनांना त्यांनी समर्पक अशा ओळींनी ओळख मिळवून दिली. त्यांच्या जाहिरातींनी भारतीय जाहिरात क्षेत्रात बदल आणले. ज्या काळात केवळ मुद्रित माध्यमासाठी जाहिरात बनवली जायची, त्याकाळातही त्यांनी दूरचित्रवाणीसारख्या माध्यमासाठी प्रभावी लेखन केले. भारतीय भाषांच्या सौष्ठवाचा पूर्ण वापर आणि एका वाक्यात दिला जाणारा संदेश त्यांच्या जाहिरातींचे वैशिष्ट्य ठरले. पांडे यांच्या निधनामुळे प्रतिभावान लेखक, कला, संस्कृती आणि विविध क्षेत्रांची समज असलेल्या व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत. त्यांच्या निधनामुळे पांडे कुटुंबीयावर दुःखाचा आघात झाला आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो आणि ज्येष्ठ लेखक पियुष पांडे (Piyush Pandey ) यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.