मुंबई : ( Chhath Puja ) छट पूजा स्थळांवर योग्य सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश मुंबई उपनगराचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई परिसरात होणाऱ्या छट पूजा उत्सवानिमित्त मंत्री लोढा आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमित साटम यांनी शुक्रवारी छट पूजा स्थळांचा पाहणी दौरा केला.
या पाहणी दौऱ्यात वरिष्ठ अधिकारी तसेच छट पूजा समन्वयक दिवाकर मिश्रा आणि जितेंद्र झा सहभागी होते. त्याचबरोबर विश्वजित चंदे आणि साक्षी सावंत हे भाजप मंडळ अध्यक्ष उपस्थित होते.यावेळी मंत्री लोढा यांनी पूजा स्थळांवरील अपुऱ्या सुविधांबाबत पालिका अधिकाऱ्यांना जाबही विचारला. मुंबई परिसरात येत्या २७ आणि २८ ऑक्टोबर दरम्यान छट पूजा उत्सव होणार आहे. यानिमित्ताने पूजा स्थळांवर त्वरित आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मंत्री लोढा आणि आ. अमित साटम यांनी जुहू चौपाटी, वरळी जांबोरी मैदान या परिसरात महापालिकेडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. जुहू चौपाटी इथे छट पूजा समित्यांच्या प्रतिनिधींनी महिलांना पूजेनंतर कपडे बदलण्यासाठी ७५ स्वतंत्र खोल्यांची मागणी केली होती. मात्र, महापालिकेडून अद्याप केवळ ३० खोल्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच इतर ठिकाणीही पुरेशा सुविधा दिसून न आल्याने छट पूजा समितीच्या प्रतिनिधींनी यावेळी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात मंत्री लोढा यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर आयुक्तांनी आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनीही पूजा समितीचे म्हणणे ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना पूजा स्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....