सागरी वाहतुकीसंबंधी शिक्षण आणि प्रशिक्षण : उद्योगासाठी क्षमतानिर्मिती

25 Oct 2025 12:00:06
India Maritime Week 2025 
 
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वतीने सोमवार, दि. २७ ते ३१ ऑटोबर दरम्यान मुंबईतील नेस्को सेंटर येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक (खचथ) २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात १०० हून अधिक देश आणि दहा हजारांहून अधिक व्यावसायिक, अधिकारी आणि गुंतवणूकदार संवाद, सहकार्य आणि धोरणात्मक चर्चेसाठी एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. त्यानिमित्ताने सागरी वाहतुकीसंबंधी शिक्षण आणि प्रशिक्षणातून उद्योगनिर्मितीच्या संधीचा आढावा घेणारा हा विशेष लेख...
 
बाजारपेठांना लोकांशी जोडणारा आणि जगातील एकूण वाहतुकीपैकी ८० टक्के योगदान असलेला जलवाहतूक उद्योग ही जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी आहे. जसजशी जहाजे भव्य आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत होत आहेत आणि आंतरराष्ट्रीय नियम अधिक कठोर होत आहेत, तसतसे अत्यंत कुशल आणि सक्षम कार्यबळ हा एक महत्त्वाचा घटक होत आहे. ‘सागरी शिक्षण आणि प्रशिक्षण’ (एमईटी) संस्था या महत्त्वाच्या क्षेत्राला आधार देणारा मजबूत पाया म्हणून कार्यरत आहे. जागतिक स्तरावर एकसमानता असावी, या उद्देशाने ‘आंतरराष्ट्रीय सागरी संघटने’ने (आयएमओ) ‘एसटीसीडब्लू अधिवेशन’ (नाविकांसाठी प्रशिक्षण, प्रमाणन आणि टेहळणी मानके)द्वारे प्रशिक्षण प्रक्रियेचे प्रमाणीकरण केले आहे. ‘आंतरराष्ट्रीय एसटीसीडब्लू अधिवेशन’ प्रथम १९७८ साली स्थापन करण्यात आले आणि त्यानंतर १९९५ तसेच २०१० साली त्यात सुधारणा करण्यात आल्या. हे अधिवेशन समुद्री शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी किमान आवश्यकतांची रूपरेषा ठरवते आणि नौकानयन क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी शैक्षणिक प्रक्रियांचे प्रमाणीकरण करते.
 
नवनवीन तंत्रज्ञानामुळे जलवाहतूक क्षेत्र सातत्याने समृद्ध होत असून, पर्यावरणीय नियमदेखील वाढत आहेत, त्याबरोबरच जागतिक व्यापार भागीदारीतील पद्धतीदेखील बदलत आहेत. अशा परिस्थितीत उच्च गुणवत्ता असलेल्या सागरी शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज आतापर्यंतची सर्वाधिक आहे. खोलवर पाहिले, तर एखाद्या संस्थेतील सागरी शिक्षण संस्थांमध्ये मूलतः सैद्धांतिक ज्ञानासोबतच व्यावहारिक प्रशिक्षणाद्वारे नौवहन, सागरी अभियांत्रिकी, मालवाहतूक हाताळणी, सागरी कायदा, सुरक्षा प्रक्रिया, पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांमध्ये कौशल्य विकसित करणे समाविष्ट असते. हा अभ्यासक्रम ‘आंतरराष्ट्रीय समुद्री संघटना’ (आयएमओ)च्या ‘एसटीसीडब्लू’ अधिवेशनानुसार तयार केला जातो.
 
समुद्री संस्थांमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण, वर्गातील शिक्षण, ‘सिम्युलेटर’द्वारे सराव आणि प्रत्यक्ष जहाजावर प्रशिक्षण दिले जाते. ‘सिम्युलेटर’द्वारे सराव केल्यामुळे प्रशिक्षणार्थींना नियंत्रित वातावरणात प्रत्यक्ष जीवनातील परिस्थितींचा अनुभव मिळतो, निर्णय घेण्याची क्षमता आणि कार्यपद्धती कौशल्ये विकसित होण्यास साहाय्य होते. दुसर्‍या बाजूला समुद्रावरील प्रत्यक्ष सेवा, प्रशिक्षणार्थींना त्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष परिस्थितींमध्ये करण्याची संधी देते आणि हे सर्व अनुभवी मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली घडते. डिजिटायझेशन आणि हरित तंत्रज्ञानाच्या जलद अंगीकारामुळे ‘सागरी शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थे’ने आता सायबर सुरक्षा, पर्यावरणीय नियम, दूरवरील मोहिमा, डेटा विश्लेषण आणि पर्यायी इंधन (मिथेनॉल, हायड्रोजन आणि अमोनिया) इत्यादी विविध विषयांवरील अभ्यासक्रमांचादेखील समावेश केला आहे.
 
‘आंतरराष्ट्रीय सागरी संघटना’, हरित नौवहन आणि कार्बन उत्सर्जनात घट करण्यासाठी प्रयत्न करत असून शाश्वततेच्या दिशेने वाटचाल करत असताना, नौकानयन कर्मचार्‍यांना कमी कार्बन उत्सर्जनासाठी सज्ज भविष्यनिर्मितीसाठी स्क्रबर्स, ‘एलएनजी’ (लिक्वीफाईड नॅचरल गॅस) इंधनयुक्त इंजिन्स, ऊर्जा कार्यक्षम जहाजांची रचना असे नवनवीन तंत्रज्ञान अवगत असणे आवश्यक झाले आहे. याशिवाय ‘सागरी शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थे’त नेतृत्वगुण, संवाद कौशल्य, आपत्ती व्यवस्थापन आणि लिंग समानतेचा आदर अशा ‘सॉफ्टस्किल्स’चे प्रशिक्षणदेखील दिले जाते. जहाजावरील क्रू सदस्यांमध्ये समन्वय साधणे, सांस्कृतिक विविधतेतही कार्यसंस्कृती टिकवणे, समुद्रात उद्भवणारी अत्यंत धोकादायक स्थिती हाताळणे यासाठी ही कौशल्ये नितांत आवश्यक आहेत. आजच्या तणउअ (तेश्ररींळश्रश, णपलशीींरळप, उेाश्रिशु, आलळर्र्सीेीी म्हणजेच अस्थिर, अनिश्चित, गुंतागुंतीचे, अस्पष्ट) जगात, जागतिक सागरी व्यावसायिक घडवणे हे ‘सागरी शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थे’चे उद्दिष्ट आहे.
 
सागरी उद्योगाचे जागतिक स्वरूप पाहता, ते इतर देशांमधील मानकीकरण आणि प्रमाणपत्रांना परस्पर मान्यता देण्याची मागणी करते. यामुळे विविध देशांमधील नौकानयन कर्मचारी एकत्रितरित्या कार्यक्षमतेने आणि सुरक्षितपणे कार्य करू शकतील, याची खात्री होते. विशेषतः फिलिपाईन्स, भारत आणि ग्रीस यांसारख्या जलवाहतुकीचे प्राबल्य अधिक असलेल्या देशांमधील ‘सागरी प्रशिक्षण संस्था’ आंतरराष्ट्रीय स्तरावर जहाजांवरील कर्मचारी पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
 
परंपरेनुसार जलवाहतूक या क्षेत्रावर पुरुषांचे वर्चस्व असायचे. जागतिक नौवहन कर्मचार्‍यांमध्ये महिलांचे प्रमाण अगदी दोन टक्क्यांपेक्षाही कमी होते, त्यांपैकी बहुतेकजणी क्रूझ आणि सेवा क्षेत्रांत कार्य करीत असत. मात्र, सागरी क्षेत्रात काम करताना महिलांना येणार्‍या अडचणींचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, सामाजिक अडथळे, शैक्षणिक अडथळे, करिअर विकासात आलेल्या समस्या, मानसिक आणि भावनिक समस्या अशी अनेक कारणे सागरी क्षेत्रातील महिला कामगारांच्या संख्येवर गंभीर परिणाम करतात. सागरी क्षेत्रात काम करताना महिलांसमोर येणार्‍या अडथळ्यांना दूर करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकारी पातळीवर आणि संस्थात्मक पातळीवर अधिकारप्राप्त व्यक्ती आणि उद्योग प्रमुखांचा हस्तक्षेप आवश्यक आहे. अशाप्रकारे सागरी शिक्षण हे केवळ कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यापुरते मर्यादित नसून, त्यांच्यावर सर्वसमावेशकतेला चालना देण्याची जबाबदारीदेखील आहे.
 
सागरी अभ्यासक्रमातील पात्रता ही समुद्र आणि किनारा अशा दोन्ही ठिकाणी एका समृद्ध आणि उत्तम उत्पन्न देणार्‍या करिअरचा मार्ग दाखवते. समुद्रात काम करताना पदवीधरांना ‘डेक अधिकारी’सारख्या परवानाधारी अधिकारिपदावर स्थान मिळू शकते, जो जहाजाचे दिशादर्शन आणि मालवाहतूक व्यवस्थापन या दोन्हीसाठी जबाबदार असतो किंवा त्यांना ‘सागरी अभियांत्रिकी अधिकारी’ या पदावरदेखील कार्य करता येते. हे अधिकारी जहाजाच्या इंजिन, प्रणोदन प्रणाली ( Propulsion Systems ) आणि यंत्रणांची देखभाल करतात. अनुभवाच्या बळावर ते कॅप्टन किंवा मुख्य अभियंता पदापर्यंत पोहोचू शकतात. सागरी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये किनार्‍यावरील कामकाजातही उपयोगी होतात. बंदर व्यवस्थापन, शिपिंग लॉजिस्टिस, सागरी विमा, सागरी सल्लागार सेवा, जहाज भाड्याने देणे-घेणे, करार करणे इत्यादी व्यवहार, नौदल स्थापत्यशास्त्र आणि सागरी कायदा यांमध्ये ते आपल्या कौशल्यांचा वापर करू शकतात.
 
सागरी उद्योग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, नियम आणि आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे सागरी वाहतूक उद्योगात सुरक्षितता, कार्यक्षमता आणि शाश्वतता टिकवून ठेवण्याबरोबरच बाजारपेठेच्या मागणीनुसार अत्यंत कुशल व्यावसायिक घडवण्यासाठी ‘सागरी शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थां’ना अद्ययावत अभ्यासक्रम तसेच, प्रशिक्षण प्रक्रियेद्वारे विकसित आणि नावीन्यपूर्णतेचा अंतर्भाव करणे अत्यावश्यक झाले आहे. जागतिक सागरी मानवी संसाधन विकासाच्या दृष्टीने, भविष्यासाठी सज्ज सागरी शैक्षणिक उपक्रमांना शैक्षणिक सामग्री नियमितपणे अद्ययावत करणे, संशोधनात सक्रिय सहभाग घेणे आणि शैक्षणिक संस्था, उद्योगजगत आणि नियामक यांच्यात एक दुवा साधणे अनिवार्य झाले आहे.
 
- कॅप्टन सोम राज 
(लेखक ‘द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’चे संचालक (कार्मिक आणि प्रशासन) आहेत.)
 
 
Powered By Sangraha 9.0