नवी दिल्ली : (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेतली. बिहारच्या निवडणूकीमुळे त्यांचे व्यस्त दौरे होते. त्यामुळे त्यांनी मला आज भेटीची वेळ दिली होती. मी त्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या असून ही सदिच्छा भेट होती."
"मी दिल्लीत आलो तरी चर्चा होते आणि गावी गेलो तरी चर्चा होते. त्यामुळे चर्चा करणारे चर्चा करतात. पण मी माझे काम करत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या प्रगतीसाठी जे काम करतात त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे मी त्यांची सदिच्छा भेट घेतली. जेव्हा जेव्हा मी पंतप्रधान मोदीजींना भेटतो तेव्हा ते विकासावरच बोलत असतात. या चर्चेमुळे मला आनंद होतो आणि प्रेरणा मिळते. आम्ही एनडीएचे घटक पक्ष असून मोदीजींकडून शिवसेनेला नेहमीच आदराचे स्थान मिळत आले आहे. त्यांच्याबद्दल कुटुंबप्रमुख अशी भावना आमच्या मनात आहे. या भेटीत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला," असेही त्यांनी सांगितले.
"एनडीए आणि महायूतीबद्दल पंतप्रधान मोदी यांचे मत स्पष्ट आहे. या गठबंधनातून आपण एक विचारधारा घेऊन पुढे जातो. नेहमी विकासाचा अजेंडा राबवण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे महायूती आणि एनडीए प्रत्येक कामात एकत्र राहावी, अशीच भूमिका त्यांनी घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या तळागाळातील लोकांच्या निवडणूका असून या निवडणूका लढल्या पाहिजे असे कार्यकर्त्यांना वाटत असते. पण शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ घेतात आणि कार्यकर्ते त्याचे अनुसरण करतात," असेही त्यांनी स्पष्ट केले.
महायूतीत मिठाचा खडा पाडू नका
"रवींद्र धंगेकर यांना माझा निरोप गेला आहे. महायूतीमध्ये मिठाचा खडा पडू नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने महायूती जपली पाहिजे. महायूतीत बेबनाव होईल असे वक्तव्य करू नये. धंगेकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मी त्यांच्याशी बोलणार आहे," असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
बिहारमध्ये एनडीएच जिंकणार
"बिहारच्या निवडणूकांमध्ये एनडीए जिकेल. डबल इंजिन सरकार विकास करू शकते हा विश्वास महाराष्ट्राप्रमाणेच बिहारच्या लोकांनाही आहे. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएचाच विजय होईल," असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....