सोंगाडे

    25-Oct-2025
Total Views |

Diwali
 
यंदा दीपोत्सव धुमधडायात पार पडला. ‘जीएसटी’ कपातीमुळे अनेक वस्तूंंचे दर कमी झाल्याने ग्राहकांनी गृहपयोगी वस्तूंपासून ते वाहनांपर्यंत विविध प्रकारच्या वस्तू खरेदीला पसंती दर्शविल्याचे निदर्शनास आले. यात आणखी एक उल्लेखनीय म्हणजे, सोने आणि चांदीचे दर वाढलेले असतानादेखील, सराफाच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. एकंदरीतच महागाई आणि सण यांचा ताळमेळ आपला भारतीय नागरिक कोणतीही कुरकुर न करता बसवित असतो, हे आजतागायत दिसून आले.
 
काळ बदलला असला, तरी या मोठ्या सणाचे महत्त्व अधिकाधिक उजळ होत आहे. अत्याधुनिक काळात तर विदेशातदेखील हा उत्सव आता आनंदाने साजरा केला जातो आणि ही मानसिकता तेथे रूजत आहे, हे अधोरेखित करावेच लागेल. भारतात सणांच्या नावे धर्माच्या नावावर बोटे मोडणार्‍यांसाठी ही मुस्काटात देण्याजोगी बाब आहे. मात्र, आपल्या देशात काही निर्लज्ज सदासुखी वावरणारे लोक आहेत आणि ते काही ना काही रिकामे उपद्व्याप करीत असतात. मात्र, असे असले तरी भारतीय नागरिक त्यांच्या या उपद्व्यापाला भीक घालत नाहीत, हीच काय ती जमेची बाजू.
 
भारतीय संस्कृतीचे संवर्धन करण्याचा संदेश देणारा हा सण खरेतर भारतीय संस्काराचेदेखील महत्त्व अधोरेखित करीत असतो. कुटुंब प्रबोधन आणि संस्कृती संवर्धनाला चालना देणार्‍या या सणाची परंपरा आपल्या देशात कित्येक वर्षांपासून सुरू आहे. आज गरज आहे ती यातून संस्कार टिकवण्याची आणि कुटुंबे एकत्र येण्याची. खरेतर काळाच्या मागणीनुसार कुटुंबे वेगळी झाली आहेत, ही वस्तुस्थितीदेखील नाकारता येत नाही.
 
मात्र, तरीही हे सण त्यानिमित्ताने ही गरज अधोरेखित करतात, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात आजकाल खोटे नॅरेटिव्ह पसरविणे आणि सत्तेत व समाजात चांगले काम करणार्‍यांना खोटे ठरविणारे कंपू निर्माण झाले आहेत. भारतातील चांगल्या कामांना केवळ विरोध करायचा, कुणाच्या जातीवर, धर्मावर आणि चारित्र्यावर बोलत राहायचे, असे यांचे उद्योग चाललेले असतात. हळूहळू हे सोंग आता भारतीयांच्या अस्मितेपर्यंत येणार नाही, त्यासाठी अशा सोंगाड्यांपासून सावध राहायला हवे, हे सर्वांनी ओळखले पाहिजे.
 
बहुरूपी
 
महाराष्ट्रातील काही नेते आजकाल केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये भांडणं कशी लागतील, मतभेद कसे निर्माण होतील आणि ते अधिकाधिक किती बदनाम होईल, असेच डावपेच आखत असल्याचे दिसून येते. खरेतर विरोधकांकडे या दोन्ही सरकारच्या कामगिरीला विरोध करण्यासारखे ठोस तथ्य असणारी कोणतीही कारणे नाहीत. मुंबईत सुरू झालेल्या मेट्रोतील दररोजची प्रवाशांची वाढती संख्या आणि मुंबईकरांचा कमी होत असलेला त्रास, यांवर कोणताही विरोधक बोलत नाही; मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांसोबत कसे मतभेद आहेत, मुख्यमंत्री त्यांच्या खात्यांतील निधीला कशी कात्री लावत आहेत, हे चित्र रंगविण्यातच ते मश्गुल असतात. आरक्षणावरून हे सरकार दोन समाजात कशी भांडणे लावत आहेत, अशा सुरसकथा हे विरोधी पक्षातील लोक रंगवून सांगत सुटले आहेत. वस्तूतः सरकारची अनेक कामे जनहिताची आहेत.यातून तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहेत.
 
अनेक ठिकाणी दोन्ही सरकारांनी रोजगार मेळावे आयोजित करून थेट नोकर्‍या दिल्या आहेत आणि देत आहेत. आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात मदतनिधी जमा होत आहे.े वंचित, वृद्ध, निराधार आणि दिव्यांग नागरिक आहेत, त्या गरजूंच्या संबंधित योजनांची रक्कम त्यांच्या बँकखात्यात नियमित येत असल्याने कोणत्याही तक्रारींना वाव नसल्याने, अमराठी-मराठी वाद, गुजरातींच्या घशात राज्य, मतदारयादीत घोळ असे जनतेला नको असणारे विषय समोर आणण्यात धन्यता मानायची, असे उद्योग या लोकांनी चालविलेले दिसतात.
 
आता तर आगामी काळात निवडणुकांचा माहोल आहे. सरकारला येनकेन प्रकारे बदनाम करीत राहायचे आणि ते निष्क्रीय असल्याचे भासवून जेवढ्या मिळतील तेवढ्या जागा या निवडणुकीत बळकावयाच्या, असाच होरा तूर्तास तरी या विरोधकांचा दिसून येतो. हा डाव जनतेने ओळखला आहे. मात्र, ते स्वप्नांचे मनोरे रचतात आणि लोकांची दिशाभूल करतात आणि लोक मात्र आजकाल याला मनोरंजनाचा किंवा हास्यजत्रेचा पुढचा भाग म्हणून घेतात, हीदेखील वस्तुस्थिती. त्यामुळे अशा बहुरूप्यांना कसा धडा शिकवायचा आणि त्यांना त्यांची जागा दाखवायची, हे सुज्ञांनी ठरविले असल्यास नवल ते कसले?
- अतुल तांदळीकर