चीनने पुन्हा एकदा जगाला आपल्या तंत्रज्ञान कौशल्याचा नमुना दाखवला आहे. देशाच्या पुढील पिढीतील बुलेट ट्रेन ‘सीआर४५०’ने चाचणी धावांदरम्यान तब्बल ४५३ किमी प्रतितास इतका वेग गाठत, जागतिक विक्रम प्रस्थापित केला. ही कामगिरी शांघाय-चेंगदू या बुलेट ट्रेन मार्गावर करण्यात आली असून, चीनच्या हाय-स्पीड रेल्वे कार्यक्रमासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.
ही ट्रेन चीनच्या प्रसिद्ध ‘फुशिंग’ ( Fuxing ) या मालिकेचा पुढचा टप्पा आहे. ही ट्रेन चीनच्या ‘चीन स्टेट रेल्वे ग्रुप कंपनी’ने विकसित केली असून, ही ट्रेन फक्त गतीसाठीच नव्हे, तर कार्यक्षमता, सुरक्षितता आणि प्रवासी सुविधांमध्येही क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे.
‘सीआर४५०’ ही तिच्या मागील मॉडेल ‘सीआर४००’पेक्षा उल्लेखनीय प्रगती करते आहे. ‘सीआर४००’ची कमाल गती ३५० किमी/ताशी होती, तर ‘सीआर४५०’चा चाचणी वेगच ४५० किमी/ताशी आहे. व्यावसायिक सेवेत तिचा ४०० किमी/ताशी वेग असणार आहे. याशिवाय, नवीन मॉडेल १२ टक्के हलके, २० टक्के कमी ऊर्जा वापर असणारे आणि ब्रेकिंग कार्यक्षमता २० टक्के अधिक आहे. यामुळे ही ट्रेन प्रवास अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करते. ‘सीआर४५०’ची एरोडायनामिक डिझाईन, हलया मिश्र-धातूंचे साहित्य आणि नवीन तंत्रज्ञान यांमुळे रनिंग रेसिस्टन्स २२ टक्के कमी झाला आहे. वजनात दहा टक्के घट झाल्यामुळे, ही ट्रेन जास्त वेगाने चालताना ऊर्जा बचत करत आहे. त्यामुळे ‘सीआर४५०’ फक्त वेगवानच नाही, तर पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम रेल्वे म्हणूनही ओळखली जाते.
अभियंत्यांच्या म्हणण्यानुसार, या ट्रेनमध्ये प्रवासी अनुभवाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुषंगाने इंटिरियर डिझाईनदेखील सुधारण्यात आली असून, कॅबिन स्पेस चार टक्क्यांनी वाढवले आहे. तसेच, आवाज कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तसेच, वेगवान धाव घेत असतानादेखील प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ‘सीआर४५०’मध्ये अत्याधुनिक ब्रेकिंग प्रणाली वापरली आहे. यामध्ये चार हजारांहून अधिक सेन्सर्स आहेत, जे ट्रेन नियंत्रण आणि अग्निशोध यांसारख्या महत्त्वाच्या प्रणालींचे सतत निरीक्षण करतात.
मल्टी-लेव्हल इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम हे या ट्रेनचे आणखी एक सुरक्षा वैशिष्ट्य आहे, जे गती कमी करताना प्रवाशांचा सुरक्षित अनुभव सुनिश्चित करते. ‘सीआर४५०’मध्ये प्रवाशांसाठी ‘अॅडजस्टेबल लगेज रॅस’, विविध संग्रहण क्षेत्र, सायकल आणि व्हीलचेअरसाठी जागा अशा सुविधा आहे. प्रवाशांचा आराम आणि सुविधा या ट्रेनच्या डिझाईनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
व्यावसायिक सेवेत जाण्यापूर्वी ‘सीआर४५०’ला सहा लाख किमी इतकी अखंड आणि दोषमुक्त धाव पूर्ण करावी लागेल. हा चीनच्या रेल्वे मानकांनुसार विश्वासार्हतेचा मापदंड आहे. एकदा सेवा सुरू झाल्यानंतर, ही ट्रेन बीजिंग-शांघाय प्रवास सुमारे अडीच तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करेल, असा अंदाज आहे.
सध्या चीनकडे जगातील सर्वांत विस्तृत बुलेट ट्रेनचे जाळे आहे. हे जाळे तब्बल ४५ हजार किमीपेक्षा अधिक आहे. ‘सीआर४५०’च्या समावेशाने हे जाळे केवळ वेगवानच नव्हे, तर अधिक पर्यावरणपूरक आणि ऊर्जाक्षम बनणार आहे.
त्यामुळे ‘सीआर४५०’ फक्त चीनच्या रेल्वे नेटवर्कसाठी नव्हे, तर जागतिक बुलेट ट्रेन प्रवास बदलण्याची क्षमता ठेवते, असे चीनचे म्हणणे आहे. शांघायची थरारक नाईटलाईफ किंवा ग्रेट वॉल ऑफ चायना यांसारख्या पर्यटन स्थळांमध्ये प्रवास आता जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. ही प्रोटोटाईप ट्रेन पहिल्या चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे आणि तिचा व्यावसायिक सेवा प्रवेश झाल्यानंतर, ‘सीआर४५०’ जगातील रेल्वे प्रवासाची व्याख्या बदलून टाकेल. चीनच्या या नवीन बुलेट ट्रेनमुळे विमान सेवा आणि इतर प्रवास माध्यमांसमोरही स्पर्धात्मक आव्हान निर्माण होईल, असे चीनचे म्हणणे आहे. त्यामुळे आपल्याकडे अजूनही ‘बुलेट ट्रेनची भारताला गरजच काय?’ असा प्रश्न उपस्थित करणार्यांनी चीन असेल किंवा अन्य देशांमधील बुलेट ट्रेन प्रकल्पांची उपयुक्तता समजून घ्यायला हवी.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.