मुंबई : ( Diwali ) बोरिवलीच्या शुभ सरिता को-ऑप. हौसिंग सोसायटीमध्ये यंदा दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि एकात्मतेच्या भावनेत साजरा करण्यात आला. दिवाळीच्या तयारीची सुरुवात सजावटीच्या साहित्य कार्यशाळेने झाली. या कार्यशाळेचा उद्देश मुलांना सणांचे महत्त्व समजावणे, त्यांची सर्जनशीलता वाढवणे आणि सामूहिक सहभागातून आनंद मिळवणे हा होता. या कार्यशाळेत कु. दिव्यांगना आणि जिमी कोरिया यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेनंतर तयार झालेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री यांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे मुलांचा उत्साह आणि आत्मविश्वास दोन्ही वाढले.
किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्याच्या संकल्पनेचे बीज माजी सचिव जव्हारकर यांनी रोवले. सांस्कृतिक समितीचे प्रमुख प्रसाद आरोस्कर यांनी मुलांच्या सहकार्याने “माझा प्रतापगड” या विषयावर मातीची आकर्षक प्रतिकृती साकारली. किल्ल्याच्या रंगकामाचे आणि सजावटीचे मार्गदर्शन सौ. विद्या मावळणकर यांनी प्रेमपूर्वक केले. या संपूर्ण उपक्रमात सोसायटीचे अध्यक्ष पंढरीनाथ गीते, अमर परब तसेच सर्व समिती सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी किल्ल्याच्या प्रतिकृतीचे अनावरण अध्यक्ष गीते यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सर्व उपस्थितांनी प्रसादाचा आस्वाद घेतला आणि आनंद व्यक्त केला.
हेही वाचा : फराळ - दिवाळीचा, कलेचा आणि साहित्याचा!
यानंतर शिवशंभू विचार मंच, मुंबई महानगर संयोजक प्रमोद धोंडीराम काटे यांच्या मार्गदर्शनाखाली “छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आजचे समाजजीवन” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या वक्तव्यात शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, युद्ध कौशल्य, नियोजन, संवाद, आत्मविश्वास, आत्मसंरक्षण, व्यापार दृष्टिकोन..इ.विषय उदाहरणे देऊन सहजपणे मांडला.
सद्यस्थितीत शिवाजी महाराजांना समजून आपल्या जिवनशैलीत परिवर्तन करणे. समाजात जागृती निर्माण करणे. हिंदुत्व व संस्कृती जतनासाठी प्रयत्न करणे. शास्त्र व शस्त्र अवगत असणे, अशा अनेक पैलूंवर भाष्य केले. मंत्रमुग्ध होऊन, लहान थोर मंडळी दिड तासांपेक्षा जागेवर खिळवून राहिली होती. या कार्यक्रमात सहकार भारती मुंबई विभागाचे संघटक प्रमुख संतोष सुर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.