नागपूर : ( Chandrashekhar Bawankule ) भाजपच्या बूथप्रमुखांचे एक लाख व्हॉटसअॅप ग्रुप पक्षाच्या वॉररूमशी जोडला असून त्याद्वारे कुठला कार्यकर्ता कुठली योजना कशापद्धतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो ते बघितले जाते. आमच्या व्हॉटसअॅप गृपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांसोबत रोज संवाद होत असतो, असे स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
भंडारा येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या दिवाळी मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानावर संजय राऊत यांनी टीका केली. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आमच्या पक्षाच्या १ लाख व्हॉटसअॅप गृपच्या माध्यमातून कोण कसा व्यक्त होतो, समाजाच्या काय प्रतिक्रिया आहेत यावर आम्ही रोज बसून काम करतो. निवडणूकीच्या काळात कधीकधी निगेटिव्ह, पॉझिटिव्ह बातम्या येत असतात. आमच्या कार्यकर्त्यांच्या कमेंट तपासण्याचे काम आमची यंत्रणा करत असते. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे एक लाख ग्रुप पक्षाने तयार केले असून ते सर्व वॉर रूमसोबत जोडले आहेत. आमचा पक्ष कसा चालवावा हे सांगणारे संजय राऊत नाहीत. त्यांना मिरच्या का झोंबल्या?" असा सवाल त्यांनी केला.
विदर्भातील काँग्रेस नेते भाजपमध्ये येण्यास इच्छूक
"विदर्भात काँग्रेसचे अनेक नेते आणि पदाधिकारी नेहमीच भाजपमध्ये येण्याची ईच्छा व्यक्त करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये येण्याचा विचार करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास असून काँग्रेसमध्ये राहून आपले राजकीय नुकसान करण्यापेक्षा भाजपसोबत गेल्यास किमान समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देऊ शकू, हे त्यांना कळले आहे," असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.
विरोधक कोण ते ओळखा
"महायूतीत मतभेद आणि मनभेद तयार होतील असे कुठलेही वक्तव्य करू नये, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील त्यांच्या प्रमुख नेत्यांना अशा सूचना देणार आहेत. परंतू, काही लोक आपल्या मतदारसंघात स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी महायूतीच्याच व्यक्तीला विरोधक समजत आहेत. पण आपला विरोधक कोण, हे महायूतीतील प्रत्येक नेत्याला कळले पाहिजे," असे ते म्हणाले.
विधानसभेपेक्षा जास्त मते घेऊन जिंकणार
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकारणासाठीच वेगळे झाले होते आणि आता राजकारणासाठी एकत्र आले आहेत. पण कुणी कितीही एकत्र आले तरी भाजप महायूती ५१ टक्के मते घेऊन जिंकेल. विधानसभा निवडणूकीपेक्षाही जास्त मते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये मिळतील. काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गटाला एकही जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका जिंकता येणार नाही," असा विश्वासही मंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी व्यक्त केला.