अमरावती : (Andhra Pradesh) कुर्नूल जिल्ह्यातील चिन्नाटेकुरु गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग ४४ वर हैदराबादहून बेंगळुरूला जाणाऱ्या एसी स्लीपर बसला आग लागल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दि. २४ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ च्या सुमारास घडली. यात दोन मुलांसह १९ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.
वेमुरी कावेरी ट्रॅव्हल्सची बस पहाटे ३ वाजताच्या सुमारास एका मोटारसायकलला धडकली, त्यामुळे बस काही अंतरापर्यंत ओढत गेली आणि याच वेळी बसच्या इंधन टाकीने पेट घेतला. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचाही मृत्यू झाला, ज्यामुळे मृतांचा आकडा २० वर पोहोचला.
अपघाताच्या वेळी, बसमध्ये एकूण ४६ जण होते. ज्यात चार चिमुरडे आणि दोन चालकांचा समावेश होता. आग वेगाने पसरल्याने प्रवासी जळत्या वाहनात अडकले होते. स्थानिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेक प्रवाशांना वाचवण्यात यश आले. बचावकार्य तासांतास सुरू राहिले आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलिस, महसूल आणि वैद्यकीय पथकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली आणि जखमींना कुर्नूल जीजीएच रुग्णालयात हलविण्यात आले.
आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) मुख्यमंत्र्यांकडून, ५ लाख रुपयांची मदत जाहीर...
गृहमंत्री वंगलापुडी अनिता यांनी सांगितले की, १९ बळींपैकी सहा जण आंध्र प्रदेशचे रहिवासी असून, प्रत्येकी दोन तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यातील होते. तर एक ओडिशा आणि एक बिहारचा रहिवासी होता. दरम्यान या अपघातातील एका व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. काही मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले होते, त्यामुळे अधिकाऱ्यांनी मृतांचे डीएनए नमुने गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथके तैनात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल अत्यंत दुःख व्यक्त केले ते म्हणाले, "आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झाले. या कठीण काळात माझ्या भावना बाधित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर जखमींना ५०,००० रुपये दिले जातील,"
आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, जे सध्या युएईच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत, त्यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर, त्यांनी मुख्य सचिवांशी चर्चा केली आणि उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांना अपघातस्थळी धाव घेण्याचे आणि बचाव आणि मदत कार्यांचे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी आंध्र प्रदेशातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि जखमींना २ लाख रुपये मदत जाहीर केली.