अभंग तुकाराम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नुकतीच दै. ‘मुंबई तरुण भारत’शी खास बातचीत केली. यावेळी चित्रपटातील मुख्य अभिनेते आणि लेखक योगेश सोमण यांनी त्यांना आलेले अनेक अनुभव सांगितले. दरम्यान, या चित्रपटापूर्वी योगेश सोमण हे अनेक वर्षे ‘आनंद डोह’ हे एकलनाट्य सादर करीत आहेत.
संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेतून लीन भाव मिळाल्याचे सोमण सांगतात. ते म्हणाले की, "या भूमिकेमुळे मला शरणागत भाव काय असतो, ते कळलं. मी अगदी माझ्या सद्गुरूंच्यादेखील शरणात नव्हतो. जेव्हा ते माझ्या संपर्कात आले तेव्हा आणि आपण ज्याला ‘लीन भाव’ म्हणतो, म्हणजे एखाद्याच्या पायी लीन होणं, संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेने माझ्यात हा लीन भाव आला. याला खोटा नम्रपणा म्हणता येणार नाही. प्रसंगी मी कणखरही आहे. आपण फक्त ‘मम’ म्हणायला असतो. दुसरा कोणी आपल्याकडून सगळं करून घेत असतो. माझी तर खरी भावना अशी आहे की, तुकाराम महाराजच माझ्याकडून सगळं काही करून घेतात, अन्यथा माझ्याकडून ते होऊच शकलं नसतं.” याशिवाय, योगेश सोमण यांनी संत तुकाराम यांच्यावर आधारित नाटक करत असताना आलेला अद्भुत अनुभवदेखील सांगितला, जो ऐकून सारेच भारावून गेले.
ते म्हणाले की, "पुण्याच्या भरत नाट्यमंदिरमध्ये ‘आनंद डोह’चा प्रयोग होता. तेव्हा वारीदेखील सुरू होती. प्रयोग संपल्यानंतर मी स्टेजवरून खाली आलो. नेहमी महाराजांच्या वेशभूषेत असल्याने नमस्कार वगैरे अनुभव माहीत होते. मीही त्यांना हात जोडून पुढे जायचो. पण, त्यादिवशी एक ६५ ते ७० वर्षांच्या आजी होत्या, ज्या खाली वाकल्या आणि बराच वेळ वर उठेना. तेव्हा त्यांनी जमिनीवर त्यांचे तळहात उघडे ठेवले होते आणि त्यांनी सांगितलं की, "मी हात ठेवले आहेत; यावरून तुम्ही जा.” त्यामुळे कोणत्या कलाकृतीतून प्रेक्षक काय घेऊन जातील, हे त्यांचं त्यांनाच माहीत!”