रायगडमध्ये पहिल्यांदाच दिसला 'हा' पक्षी; आफ्रिकेत जाणारा पक्षी फणसाड अभयारण्यात

24 Oct 2025 18:03:25
spotted flycatcher



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
रायगड जिल्ह्यात ठिपकेवाला माशीमार (स्पोटेड फ्लायकॅचर) या पक्ष्याचे प्रथमच दर्शन झाले आहे (spotted flycatcher). जिल्ह्यातील फणसाड वन्यजीव अभयारण्यामध्ये पक्षीनिरीक्षकांना हा पक्षी बुधवार दि. २२ आॅक्टोबर रोजी दिसला (spotted flycatcher). हा पक्षी भारतामध्ये स्थलांतर करत नसून तो याठिकाणी थांबा घेऊन आफ्रिकेत हिवाळ्यात स्थलांतर करतो. या नोंदीमुळे रायगड जिल्ह्यात सापडणाऱ्या पक्ष्यांची संख्या ४३२ झाली आहे (spotted flycatcher).
 
 
महाराष्ट्रात हिवाळ्याच्या पूर्वी दिसणारे अनेक पक्षी हे प्रवासी पक्षी असतात. म्हणजेच ते हिवाळी स्थलांतर करण्यासाठी महाराष्ट्रातून प्रवास करुन विहीत ठिकाणी पोहोचतात. अशा पक्ष्यांना 'पेसेज मायग्रंट', असे म्हटले जाते. यामधीलच एक पक्षी म्हणजे ठिपकेवाला माशीमार. या पक्ष्याचे दर्शन पक्षीनिरीक्षक वैभव पाटील आणि कल्याणी कापडी यांना फणसाड वन्यजीव अभयारण्यामध्ये २२ आॅक्टोबर रोजी घडले. रायगड जिल्ह्यातील या पक्ष्याची ही पहिलीच नोंद ठरली. ठिपकेवाला माशीमार पक्ष्याचा प्रजननाचा प्रदेश हा पश्चिम युरोप ते मंगोलियाच्या पूर्वेपर्यंत विस्तारलेला आहे. हा पक्षी हिवाळ्यात आफ्रिकेत स्थलांतर करतो. या स्थलांतरासाठी हे पक्षी पश्चिम आणि पूर्व अशा दोन मार्गांचा अवलंब करतात.
 
 
पश्चिम युरोपातील ठिपकेवाले माशीमार पक्षी हे जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीजवळ भूमध्य समुद्र ओलांडून दक्षिणेकडे जातात. त्यानंतर ते आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरून अंगोला आणि नामिबियात हिवाळी स्थलांतर करतात. तर मंगोलियाच्या पूर्वेकडील पक्षी वायव्य आणि पश्चिम भारतामधून प्रवास करत आफ्रिका गाठतात. अशा वेळी त्यामधील मोजकेच पक्षी हे महाराष्ट्रात प्रवेश करतात. अशाच पद्धतीने आफ्रिकेतील प्रवासादरम्यान फणसाड वन्यजीव अभयारण्यात ठिपकेवाला माशीमार थांबल्याची शक्यता आहे. यापूर्वी हा पक्षी मनोरी, पुणे आणि रत्नागिरीत दिसल्याच्या नोंदी आहेत. हा पक्षी एक सडपातळ पक्षी असून त्याची लांबी सुमारे ५.७ इंच आणि वजन १४ ते २० ग्रॅम असते.
Powered By Sangraha 9.0